________________
साक्षात् जैन आगमांमध्ये डोकावले असता असे दिसते की -
भगवतीसूत्रात तेजोलेश्या व शीतलेश्येचा वापर, अंतगडसूत्रात यक्षाने अर्जुनाच्या शरीरात केलेला प्रवेश, छेदसूत्रातील साधूंची अंतर्धान पावण्याची अथवा अदृश्य होण्याची विद्या, गौतम गणधरांच्या अणिमा, गरिमा इ. अनेक सिद्धी तथा क्षीर इ. लब्धी, सनत्कुमार चक्रवर्तीचे स्वत:च्या थुकीने अनेक रोग दूर होण्याचा उल्लेख, स्थूलिभद्रांनी आपल्या बहिणींना ज्ञानाचा चमत्कार दाखविण्यासाठी घेतलेले सिंहाचे रूप, अचलाराणीने दृष्टी फिरविली व महामारी रोग दूर झाला इत्यादी इत्यादी ---
इतकेच नव्हे तर सर्वच कथाग्रंथ विद्या-सिद्धी, अद्भुतता व चमत्कारांनी भरलेले आहेत. भक्तामरस्तोत्राची अद्भुतता तर सर्वज्ञातच आहे. कुंदकुंदाचार्य, कालकाचार्य, पादलिप्ताचार्य, खपुटाचार्य, नागार्जुनाचार्य इ. आचार्यांच्या चरित्रात अनेक अद्भुत विद्यांचा निर्देश व इतकेच नव्हे तर त्यांनी त्याचा प्रत्यक्ष उपयोगही केलेला दिसून येतो. 'कुमारपालप्रतिबोध'सारख्या ग्रंथात ‘इंद्रजाल' प्रयोग, अंतर्धान पावण्याची विद्या, चारणविद्या अशा अनेक विद्या आढळतात.
प्रत्यक्ष आगमात व त्यानंतरच्या अनेक ग्रंथात पापश्रुतातील या विद्यांचा व चमत्कारांचा प्रत्यक्षात केलेला वापर पण, त्याचबरोबर सूत्रकृतांग, उत्तराध्ययन, आवश्यकसूत्र तथा आवश्यकचूर्णि इ. ग्रंथात याच विद्यांना ‘पापश्रुत' म्हणणे असे दुहेरी परस्परविरूद्ध वर्णन का आढळते ? आदर्श तर दाखवून दिला आहे की या विद्या शिकूही नयेत व प्रत्यक्ष त्याचा वापरही करू नये. परंतु वस्तुस्थिती याच्या बरोबर विरुद्धच दिसते. तर त्याची कारणमीमांसा देण्याचा प्रयत्न केला आहे -
१६३