________________
वाटते. जास्वंदीच्या फुलांचे दिवस होते. निरीक्षणानंतर असे लक्षात आले की, फांदीला १-२ फुले येणार असतील तर १०-१२ पाने गळूनच पडतात. फुले येण्यासाठी पानांना आपला प्राण त्याग करावा लागतो. 'परस्परोपग्रहो जीवानाम्' या जैनग्रंथात नमूद केलेल्या सूत्राप्रमाणे प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडतच असतो. विशेष म्हणजे फांदीला ज्या क्रमाने पाने येतात, त्या क्रमाने गळत नाहीत. अनुभव असा आहे की, कित्येकदा जून पान तसेच राहते व नवीन, छोटे, कोवळे पान गळून जाते. त्याअर्थी जैनग्रंथात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पानात स्वतंत्र जीव आहे व त्यामुळे प्रत्येक पानाचा जीवनकाळही त्याच्या त्याच्या आयुष्यकर्मानुसार वेगवेगळा आहे. म्हणूनच प्रत्येक पाना-फुलाला वेगवेगळ्या प्रकारे कर्मसिद्धांत लागू होतो.
प्रत्येक झाडाचे जीवनचक्र वेगळे असते. प्रत्येक झाडाची पानगळती वेगळी असते. पद्धत वेगळी, वेळ वेगळी, क्रम वेगळा व गळणाऱ्या पानांची संख्याही वेगळी. चिंच, आवळा इ. संयुक्त पाने असणाऱ्या झाडांची पाने संपूर्णपणे गळतात. झाड अगदी खराट्यासारखे होते. काहींची पानगळ वर्षभर चालू असते तर काहींची ऋतुनुसार. बांबूच्या झाडाला १०-१२ वर्षातून एक फूल येते व फूल आले तर बांबूचे झाड हळूहळू नष्ट होते. सृष्टि निरीक्षणावर आधारित असलेल्या जैनग्रंथात (दशवैकालिकात) अविनयी शिष्य, गुरुकडे अनेक वर्ष शिकूनही स्वत:च्या दुर्गुणामुळे, स्वत:च्याच विनाशास कसा कारणीभूत होतो हे बांबूच्या उदाहरणाद्वारे सांगितले आहे.
१७५