________________
(३) आजची जैन जीवनपद्धती व वनस्पतिसृष्टी
व्याख्यान : डॉ. नलिनी जोशी शब्दांकन : डॉ. अनीता बोथरा
सूत्रकृतांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधातील तिसऱ्या अध्ययनाचे नाव आहे ‘आहारपरिज्ञा’. विश्वातील सर्व जीवजाती कोणकोणत्या प्रकारचा आहार घेतात ते या अध्ययनात विस्ताराने सांगितले आहे. एकेंद्रियांपासून सुरवात केली असली तरी वनस्पतिसृष्टीचा विचार सर्वात प्रथम केला आहे. अध्ययनाचे एकंदर प्रतिपाद्य पहात असताना, अध्ययनाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने जे विचारमंथन झाले, त्याचा सारांश या लेखात प्रस्तुत केला आहे. आचारांग, सूत्रकृतांग, प्रज्ञापना, जीवाभिगम इ. अर्धमागधी प्राकृत ग्रंथात व मूलाचार, गोम्मटसार ( जीवकांड) इ. शौरसेनी ग्रंथात वनस्पतींचे विवेचन सूक्ष्मतेने व विस्ताराने आढळते. वनस्पतींना एकेंद्रिय जीव मानल्यामुळे, वनस्पतींकडे पाहण्याची दृष्टीच अतिशय भावनात्मक आहे. वनस्पतींचा गति, जाति, योनि, लिंग, जन्म, इंद्रिय, शरीर इ. अनेक दृष्टींनी, खोलवर विचार केला आहे आणि म्हणूनच वनस्पतींकडे पाहताना हिंसा-अहिंसेची दृष्टी केंद्रस्थानी ठेवली आहे. ‘सर्वजीवसमानतावाद' या तत्त्वानुसार, 'वनस्पती कनिष्ठ व मनुष्य श्रेष्ठ' असेही पाहण्याची जैनांची दृष्टी नाही. परिणामी आचारांगात वनस्पती व मनुष्यांची तुलना करून दोघांना समान पातळीवर आणून ठेवले आहे.
‘जीवो जीवस्य जीवनम्' व 'परस्परोपग्रहो जीवनाम्' या सूत्रांनुसार निसर्गातील प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाच्या आधारावर जगत असतो. जगण्यासाठी प्रत्येक जीवाला कोणता ना कोणता आहार घ्यावाच लागतो. जैन परंपरेत मांसाहार तर १६६