________________
भ. महावीरांनी त्या काळच्या समाजाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेले हे चित्र, तिन्ही काळात लागू होईल असे आहे. यात वाढत्या गुन्हेगारीचे १२ आयाम असून प्रत्येक अपप्रवृत्तीचा फोकस हा वेगळा आहे. जणूकाही हे 'सत्यमेव जयते'चेच १३ एपिसोड आहेत. सामाजिक वातावरणात जा, राजकारणात जा, असंस्कृत समाजात जा, घरात जा, मित्रमंडळी जा किंवा अध्यात्मात जा - निष्पाप सूक्ष्म क्रियेपासून ते जन्मजन्मांतरीच्या तीव्र बंधापर्यंत, वरपासून ते खालपर्यंत, सर्व स्तराचे चांगले-वाईट दर्शन करविले. आदर्शवाद कसा असावा हे महावीरांना माहीत आहे पण 'पूर्ण आदर्शवाद' जगात असणार नाही, हेही त्यांना माहीत आहे. 'सर्व जगत् आर्य, सुसंस्कृत असावे', अशा भोळ्या भाबड्या आदर्शवादात किंवा चुकीच्या धारणेत भ. महावीर मुळीच नाहीत. जैनांचे कोणतेही तीर्थंकर अशा भ्रमात मुळीच नाहीत की आम्ही उपदेश दिला की जगात जादूच्या कांडीसारखे सर्वत्र सुखद, शांततामय वातावरण निर्माण होईल व तसे असतेच तर देव-मनुष्य या दोनच गती असत्या. नरक-तिर्यंच या दुर्गति अस्तित्वातच नसत्या. अनादिकाळापासून मोक्ष जेवढा सत्य आहे तेवढीच गुन्हेगारीचे हे १२ आयामही आधी, आता व नंतरसुद्धा सत्यच राहणार आहेत. सद्विचार जेवढे खरे तेवढेच दुर्विचारसुद्धा.
गौतम बुद्धासारखे ‘सर्वं दुःखं' अशा दृष्टीने जगाकडे पाहणे ठीक नाही. चार्वाकासारखे ‘ऋणं कृत्वा घृतं पिवेत्' असेही जगाकडे पाहणे योग्य नाही, वैदिकांप्रमाणे, 'दुष्ट खूप झाले म्हणून अवतार घेऊन त्यांचे निवारण करणेही शक्य नाही.' जैन परंपरेनुसार जग हे सुख-दुःखांचे संमिश्रण आहे व राहणार. चांगल्या-वाईट प्रवृत्ती आधी होत्या व नंतरही
१५८