________________
स्मृति-मंजूषा त्यांच्या दर्शनास जात असे. गावातील मुलीही बऱ्याच ओळखीच्या झाल्या होत्या. त्यांच्याबरोबर दर्शनास जात असताना एका शेतातील भुईमुगाच्या शेंगा आम्ही मुली खात असू. एके दिवशी शेतकऱ्याने ते पाहिल्यावर त्याने आचार्य शांतिसागर महाराज यांचेकडे आमच्याविरुद्ध तक्रार केली. तेव्हा महाराजांनी आम्हाला बोलावून घेतले व शेंगा खायच्या होत्या तर विचारायला पाहिजे होते. तुम्ही चोरून शेंगा खाल्ल्या त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागेल असे सांगितले. पुन्हा कधीही चोरून शेंगा खाऊ नका म्हणून त्यांनी उपदेश केला.
आचार्य महाराजांनी बऱ्याच गावी चातुर्मासानिमित्त मुक्काम केला. एकदा त्यांचा मुक्काम नांदणी येथे होता. दरवर्षी आम्ही त्यांच्या दर्शनास जात होतो. आम्ही गुजर जैन असल्यामुळे तेथील जैन समाज महाराजांच्या आहाराचा लाभ आम्हाला देताना दुरून पदार्थ टाकीत. ते आम्हाला शिवू देत नसत. आहार दुरून वाढीत असत. महाराजांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांनी याविषयी जैन समाजास यथोचित उपदेश करून जागृत केले.
नवस करणे मिथ्या आहे महाराजांच्या शांतिमय उपदेशाचा व पुनीत सहवासाचा लाभ आम्हाला वारंवार मिळत असे. मनावर त्याचा ठसा अजूनही कायम आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या दर्शनाला जात असू त्या त्या ठिकाणी मिथ्यात्व, अज्ञान, खोट्या रूढी, देवदेवतांना भोळ्या भाबड्या जनांनी केलेले नवस वगैरे गोष्टी त्याकाळी
खूपच प्रचारात होत्या. महाराज त्यांना उपदेश करीत की खरा धर्म काय आहे, खरा देव कसा आहे, याचा विचार करीत चला. अडाणीपणा सोडून गुरूपदेश घ्या म्हणत.
प्रत्येक बाबीला मर्यादा असते खेडोपाडी महाराज जात तेथे तेथे सर्व ज्ञातींचा समाज महाराजांची तपःपुनीत मुद्रा व शांतवृत्ती पाहून पूज्य भावाने त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असे. महाराज मानवतावादी होते, मनुष्य मग तो श्रेष्ठ वर्णाचा असो वा क्षुद्र वर्णाचा, महाराज सर्वांना पावन करीत. हरिजन, चांभार यांनाही महाराज प्रेमाने वागवून आपुलकीने त्यांची चौकशी करीत. मांसाहार करू नये, दारू पिऊ नये, चोरी वगैरे दुष्कृत्ये करू नयेत म्हणून महाराज त्यांच्याकडून प्रतिज्ञा घेववीत व मानवामधील मानव्य जागृत व्हावे असे सांगून त्यांना पुनीत करीत असत. याप्रमाणे त्यांचे नित्याचे प्रतिपादन असे.
एके प्रसंगी आचार्य शांतिसागर महाराजांचा सोलापुरास मुक्काम असताना ते श्रात्रिकाश्रमात आले होते. त्यावेळी आम्ही एक संवाद बसविला होता. तो अर्थात सुधारक मताचा होता. महाराजांनी उपदेश देताना म्हटले की पवित्र, त्यागी, सत्त्वशील वातावरण निर्माण व्हावे म्हणून येथे धार्मिक शिक्षण प्राचीन आश्रमीय पद्धतीने देण्यात यावे. आश्रमातून साधु-साध्वी निर्माण व्हाव्यात, शीलाचे संवर्धन व्हावे व आदर्श श्रावक श्राविका येथून निर्माण व्हाव्यात अशी महाराजांनी इच्छा प्रकट केली.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org