________________
१७४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ प्रश्न-आचार्यांचे उत्कृष्ट स्मारक कोणते असू शकेल ? विविध ठिकाणी त्यांची वेगवेगळी स्मारके होत आहेत. याबाबतीत आपले मत काय आहे ?
उत्तर-स्वतः शांतिसागर बनणे हेच त्यांचे उत्कृष्ट स्मारक असणार. महाराजांनी जीवनभर जे केले, बहुमोल मानव जीवन ज्याकरिता खर्ची घातले व ज्या मार्गाने त्यांनी आपले जीवन सफल केले असे समजतो, ते चारित्र्य, तो संयम आचार्य महाराजांप्रमाणे स्वतः पाळणे व इतरांनाही प्रसंगोपात्त धर्मप्रेरणा करीत राहणे या गोष्टींनीच त्यांचे जीवितकार्य सुरू ठेवल्यासारखे होणार आहे. आचार्यश्री समंतभद्रांनी 'न धर्मो धार्मिकैर्विना' हा धर्म जिवंत राहण्याचा अमोघ उपाय सांगितला आहे. तो अगदी यथार्थ आहे. धर्ममंदिराची भव्य इमारत धार्मिक पुरुषांच्या जीवितावरच निर्भर आहे. विवेकपूर्ण त्यागचारित्रसंपन्न जीवन हाच धर्माचा खरा आधार आहे. आचार्यकल्प पं. आशाधरांनी सुद्धा सागरधर्मामृतामध्ये सांगितलेले तुम्हास माहितच आहे
'जिनधर्म जगबंधुमनुबधुमपत्यवत् ।
यती जनयितुं यस्येत् तथोत्कर्षयितुं गुणैः ॥' कुलपरंपरा टिकविण्यासाठी सद्गृहस्थ ज्याप्रमाणे पुत्र निर्माण करतो व त्याच्या ठिकाणी गुणांची वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे धर्माची परंपरा अविच्छिन्न रूपाने चालत राहावी यासाठी त्यागी-व्रती-संयमी-मुनि निर्माण करण्याचा व असलेल्यांच्या ठिकाणी गुणांचा उत्कर्ष व्हावा असा कसोशीने प्रयत्न व्हावयास पाहिजे. हे सर्व 'जिनधर्म हा जगबंधु आहे' अशी दृढ श्रद्धा असली. तरच होऊ शकते.
या समाजधारणेच्या सूत्रामधील प्रत्येक शब्दन् शब्द अत्यंत महत्वाचा व मोलाचा आहे. पं.. आशाधरांनी समाजधारणा व्हावी यासाठी हा मौलिक दृष्टिकोण आपणापुढे ठेवला आहे. लोकांवर जो प्रभाव पडतो तो तक्त, तिजोरी व तलवार यांचा पडतो अशी सर्वसाधारण लोकांची समजूत आहे. ती अगदीच काही खोटी नाही; तथापि तक्त, तिजोरी व तलवार यापेक्षाही त्यागाचा परिणाम जनसामान्यावर फार मोठा पडतो. एवढेच नाही तर तक्त, तिजोरी व तलवारीवर देखील पडला तर त्यागाचाच परिणाम पडू शकतो हे इतिहास सूक्ष्म रीतीने पाहिले तर आपल्या सहजी लक्षात येईल. एका खऱ्या त्यागी माणसाचा जो प्रभाव पडतो तितका शेकडो विद्वानांचा पडू शकत नाही. जी गोष्ट विद्वान माणसांची तीच गोष्ट ग्रंथ-निर्माणाची. व्याख्यानांची, प्रवचनोपदेशांची व कथा-कीर्तनांची ! याचा अर्थ असा नाही की ही धर्म-प्रभावनेची साधने नव्हेत ? परंतु जड आणि चैतन्यामध्ये जसा फरक आहे, शब्द आणि कृती यामध्ये जसे अंतर आहे, त्याचप्रमाणे इतर साधने व त्याग यामध्येही फार मोठे अंतर आहे.
प्राचीनकाळी- इतिहासपूर्वकालामध्ये पुराणावरून ज्याप्रमाणे त्यागाचा प्रभाव असलेली व्याख्याने पहावयास मिळतात, त्याचप्रमाणे ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतील.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org