________________
१७६
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ 'त्यांचे जीवितकार्य म्हणजे साधु-संस्थेचे पुनरुज्जीवन व त्याद्वारे केलेली धर्मप्रभावना' हे होते हे आपणाला विसरून चालणार नाही.
त्यांनी त्यागाच्या द्वारेच निश्चेष्ट जैनसमाजामध्ये 'चैतन्य ओतले ना ? भारतामध्ये त्यांनी गावोगावी विहार करून जागृती केली ना ? साधुसंस्था खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित केली ना ? शास्त्रशुद्ध आचार कसा असावयास पाहिजे हे आपल्या आचरणाने लोकांच्या पुढे ठेवले ना ? हे खरे कार्य पुढे चालू राहावयास पाहिजे असे खरोखरी किती जणांना वाटते ? 'तेही एक कार्य आहे, कठिण असले तरी शक्य आहे.' ही कल्पना तरी आपल्या मनाला शिवते काय ? त्या दिशेने विचार करणारी मंडळी तरी किती सांपडतील ? आपला समाज वैश्यवृत्तिप्रधान आहे. पैशाने जे जे होईल ते ते करून आपण मोकळे होतो. पण पुतळे उभे करून किंवा मंदिरे बांधून जर विश्वकल्याण खरोखरीच झालेच असते तर आपल्या धर्माचा प्रसार कितीतरी अधिक प्रमाणावर व्हावयास पाहिजे होता. परंतु तसे होत असलेले दिसून येत नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने खरा धर्म खऱ्या स्वरूपात पसरावा असे वाटत असले तर त्यागी संस्था पुनरुज्जीवित करणे, ती व्यवस्थित करणे व खरोखरी आत्माभिमुख बनलेल्यांनी आत्मकल्याणाबरोबर लोककल्याणासाठीही निःस्वार्थ भावनांनी बाहेर पडणे-विहार करणे जरूर आहे. या योगे ज्ञान व त्यागाचा उत्तरोत्तर प्रसार होईल, धार्मिक भावनांची बीजे जनतेच्या अंतरंगामध्ये खोलवर रुजतील. ज्ञान व त्यागाची जी आज फारकत झालेली दिसते ते अंतर कमी झाले व ते परस्परांना पूरक झाले म्हणजे खऱ्या संयमी व त्यागी समाज कार्यकर्त्यांची निर्मिती होईल. त्यायोगेच खरी धर्मप्रभावना होईल.
प्रश्न-महाराज ! आपण म्हणता हे खरे व पटतेही. पण हे फार कठीण आहे.
उत्तर- बाब सोपी का कठीण हा प्रश्न अलाहिदा ! अशक्य नाही हेही तितकेच खरे ना ? अत्यंत प्रतिकूल काळामध्ये ज्यावेळी ज्ञान व सेवेची साधने अत्यंत दुर्लभ होती अशा काळातदेखील साधुसंघाने जे केले ते आपण आज करू शकत नाही असे म्हणणे पर्यायाने आपला नामर्दपणाच व्यक्त करणे होय. हे म्हणजे कितपत बरोबर आहे याचाही काही विचार व्हावयास नको का ? आचार्यश्रींचे स्मारक करावयाचे म्हणावयाचे व वरपांगी विचार करून मोकळे व्हावयाचे, असे करून काय होणार !
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org