________________
उपाध्याय ज्ञान , ध्यान , तपातच लीन राहतात. ते बहुतांश वेळ तपश्चर्येत घालवितात . णमो लोए सव्वसाहूणं :
साधू सम्यक् श्रद्धेच्या रूपाने , ज्ञानाने व चारित्र्याने ते जीवन जगतात . निर्दोष व्यवहार हेच त्यांचे तंत्र असते . २८ मूलगुणांचे पालन करून ते धन्य होतात . (पाच महाव्रते , पाच समिती , पाच इंद्रियविजय , सहा आवश्यक क्रिया, सात शेष गुण मिळून २८ मूलगुण होतात .) शीलव्रताच्या बळावर ते मोक्षमार्ग क्रमाने सुरू करतात . काम-विकार-राग-द्वेष यावर विजय मिळवून ते दोषांना दूर करतात . साधूच्या अवस्थेतच आत्मकल्याण शक्य आहे.
___ याप्रमाणे आचार्य, उपाध्याय , साधू हे मुक्तिमार्गाचे तसेच रत्नत्रयाचे साधक आहेत; तर अर्हत-सिद्ध आमचे आदर्श आहेत , साध्य आहेत . या णमोकार मंत्रात एका विशिष्ट व्यक्तीला नमस्कार नसून गुणांना वंदन आहे. हा मंत्र अनादि आहे. हा मंत्र पापांचे क्षालन करणारा आहे. हा मंगलमय आहे. हा णमोकार मंत्र स्वतः सिद्ध, स्वयंप्रकाशी आहे. सर्व पापांना क्षणात भस्म करणारा आहे. हा मंत्र आम्ही कुठल्याही क्षेत्री व समयी म्हणू शकतो. तरीपण द्रव्य-क्षेत्र-काल-भावाची विशुद्धी मंत्राचे फळ-सामर्थ्य वाढविते.
प्रतिदिनी १०८ वेळा बोटांवर , मण्यांच्या माळेच्या साहाय्याने , पुष्पाने , लवंगाने , तांदळाने आम्ही हा मंत्रजप करू शकतो. धवल ग्रंथाच्या प्रारंभी ‘णमो अरिहंताणं' तसेच भगवतीसूत्रात या मंत्राचा उल्लेख आहे. हा महामंत्र आम्हास शक्ती , मती व अध्यात्माची किल्ली जरूर देतो. कुठल्याही बिकट परिस्थितीत हा मंत्र आम्हास मार्ग दाखवितो. णमोकार मंत्राचे व्रत-विधान पण आहे. ३५ दिवस उपोषण करून अभिषेक, पूजा-मंत्रजप करणे. मंत्राच्या उच्चाराने विद्युतशक्ती निर्माण होऊन भूत-पिशाच्च बाधा , जल-अग्नीचे भय, रोगपीडांचे निर्मूलन होऊन मनास शांती प्राप्त होते. या मंत्रामध्ये संपूर्ण शास्त्राचे सार साठलेले आहे .
जैन धर्माची ओळख / ३
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org