________________
पुढील उपलब्ध ओंव्यांत गुरुभक्तीचे माहात्म्य व गुरुद्रोहाचे दोष वर्णन केले आहेत. चांगदेवाने सांगितलेली गुरुसेवा सामान्य नसून पूर्णपणे स्वत्वास विसरणा-या अनन्यपणाची आहे. गुरु दिसल्या बरोबर तर लोटांगण घातलेंच पाहिजे पण गुरु ज्या दिशेस असेल तिकडेही नमस्कार केला पाहिजे. गुरूचें वृथा अनुकरण तर करूंच नये पण गुरू ज्या आसनावर बसत असतील त्या वरही बसू नये. उलट गुरूच्या घराची किंवा आसनाचीही चित्तशुद्धिसाठी पूजा केली पाहिजे . गुरुत्याग किंवा गुरुद्रोहाच्या पातकास तर सीमाच नाही. एक गुरू सोडून दुसरा करणारास तर चांगदेवाने 'पुंश्चली' ची उपमा दिली आहे. जसे कन्या बरावयापूर्वीच कुळाचा विचार केला पाहिजे तसेंच येथेही आहे. शिवाय चांगदेवाच्या मताने गुरुपासून मिळणारी सिद्धि पुष्कळशी स्वतःवरच अवलंबून आहे. मातीच्या केलेल्या द्रोणाचार्यापासूनहि जर एक लव्यास सिद्धि मिळवितां आली तर मग असिद्ध कोण राहूं शकतो? गुरुद्रोह चुकून घडल्यास त्याचा निस्तार कसा करावा हा भाग पुन्हा गहाळ झाला आहे.
सरते शेवटी संवादात्मक ग्रंथाच्या अंती असणारा 'पूर्णपणे समजले ना?' असा प्रश्न असावासे वाटते. श्रीमद्भगवद्गीतेंत 'कच्चिदज्ञानसंमोहः प्रणष्टस्ते धनंजय' असा प्रश्न विचारून 'स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव' असे उत्तर आहे. पण येथील उत्तर फारच बहारीचे आहे. येथे शिष्य गुरूसच असें उत्तर देतो की 'आतां समजावयाचे कोणी व काय ? समजणारा, जे समजावयाचें तें व समजण्याची क्रिया ही त्रिपुटीच नाहींशी झाल्यावर मौनाशिवाय उत्तरच काय ? गुरूनेही पण शिष्य इतका तयार झाल्यावर आपणापेक्षां निराळा ठेवण्याचे कारण नाही असे समजून त्यास स्वस्वरूपी मेळविलें. ही मिळणी चांगदेवाने फारच मौजेची वर्णिली आहे. गुरूने आ पसरिला व शिष्याने गुरूचे मुखांत प्रवेश केला व याप्रमाणे गुरु शिष्य एकस्वरूप झाले. तत्वसाराचा शेवट याहून चांगला कसा असू शकणार? सद्गुरूनें जें आपलें निजस्वरूप शिष्यास समजाविले, ते पूर्णपणे समजून शिष्य व गुरु हा द्वैतभाव सुटून दोघेहि एकच ब्रह्मस्वरूप झाले की सर्व तत्वांचे सार प्राप्तच झाले. हाच खरा तत्वसाराचा गर्भितार्थ.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com