________________
(८)
भावनायोगाने आत्म्याची शुद्ध अवस्था प्राप्त होते. भावनायोगाने शुद्ध चेतनेची अनुभूती होते. भावना योग हा भवरोगाला दूर करण्याचा रामबाण उपाय (औषध) आहे. शुद्ध भावनेचा एक क्षण अमृत बिंदूसारखा आहे.
आत्मकल्याण करण्यासाठी आत्मस्वरूपाच्या चिंतनाची आणि शरीर, धन, परिजनांच्या अनित्यत्व, अशरणत्व इत्यादींच्या चिंतनाची अत्यंत आवश्यकता आहे. ह्या चिंतनात प्रमाद केला तर जन्म-मरण दुःख इत्यादी भयंकर शत्रू आक्रमण करतील. झोपलेला सैनिक एखाद्या वेळेस शत्रूच्या शस्त्रातून वाचू शकतो. पण अध्यात्मभावनेत, धर्मयुद्धात क्षणाचा प्रमाद केला तर आंतरिक्ष शत्रू आत्म्याला घेरून टाकतात. मिळवलेले आत्मधनपण शत्रूच्या ताब्यात जाते. म्हणून आत्म्याला सतत जागृत ठेवण्यासाठी ह्या भावना अत्यंत चिंतन करण्यायोग्य आहेत.
मोहाधीन बुद्धीने जे काही घडते ते प्रमाद आहे, आणि मोहाविहिन बुद्धीने जे काही घडते ते अप्रमाद आहे. क्षणाचा प्रमाद न करता सतत शुभ आणि शुद्धभावनेचे चिंतन करण्यासाठी बारा भावना आलंबनरूप आहेत. प्रस्तुत प्रकरणात बारा भावनांचे विवेचन केले आहे. प्रकरण ६ : 'वैराग्यातून योग भावनेच्या दिशेने साधकाचा विकास'
सहाव्या प्रकरणात मैत्री इत्यादी चार योग भावनांचे विवेचन आहे. वैराग्यवर्धक बारा भावनांच्या व्यतिरिक्त साधकाला परमशांती परमसुखाचा उत्तम अनुभव करून देणाऱ्या आणि योग अथवा ध्यानाचा उत्कर्ष साधणाऱ्या अशा चार महत्त्वाच्या भावनांचे निरूपण केले आहे.
ह्या चार भावनांच्या चिंतनाचा मुख्य उद्देश्य हा आहे की व्यक्तीमध्ये मात्र वैराग्यभावना जागृत होणे इतकेच पर्याप्त नाही, परंतु त्या भावना आचरणात याच्यात इंद्रियसंयमाबरोबर मनाचा संयम घडावा आणि देहासक्तीतून मुक्त होऊन योग आणि ध्यानाद्वारा चित्तनिरोध करून परमशांती प्राप्त करावी. अशा उत्तम आदर्शाने वैरग्य आणि योगपोषक चार भावनांचे विवेचन केले आहे.
अनित्यादी भावनांच्या चिंतनाने स्वरूपबोध झाल्यावर निर्वेदभाव अर्थात संसारावर अनादी काळापासून जो राग आहे त्याच्या वर उद्वेग येतो, उदासिनता येते.