________________
संपादकीय जीवन तर सगळेच जगतात, पण खऱ्या अर्थाने जीवन जगणे त्यास म्हटले जाईल की जे जीवन क्लेश रहित असेल!
सध्याच्या या कलियुगात घरोघरी सकाळच्या चहा-नाश्त्याची सुरुवातच क्लेशाने होते. मग उरलेले दिवसभरातील क्लेशाचेच जेवण आणि येता-जाता चघळत राहणे याबद्दल काय बोलावे? अरे, सतयुग द्वापर युग आणि त्रेता युगात देखील मोठमोठ्या पुरुषांच्या जीवनातही क्लेश होतच असत. पांडव सात्विक होते परंतु त्यांचे संपूर्ण आयुष्य कौरवांशी लढाई कशी करावी याची व्युहरचना करण्यातच गेले! प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा वनवास सोसावा लागला आणि मग सीताहरणापासून ते थेट अश्वमेध यज्ञापर्यंतचा हा सर्व काळ संघर्षमयच गेला. तथापि आध्यात्मिक समज असल्यामुळे ते या साऱ्या प्रसंगातून समताभावाने पार पडले. तेव्हा ही त्यांची खूप मोठी सिद्धी म्हणावी लागेल!
_हे जीवन क्लेशमय बनते याचे मुख्य कारण अज्ञानताच आहे. 'तुझ्या सर्व दुःखांचे मूळ कारण तू स्वत:च आहेस!' परम पूज्य दादाश्रींचे हे विधान सर्व दुःखांच्या मूळ कारणाचे सखोल विश्लेषण करते. इतके सुस्पष्ट यापूर्वी कोणालाच समजले नव्हते!
जीवन नैया कुठल्या गावी न्यायची आहे हे निश्चित केल्याशिवाय, दिशा जाणल्याशिवाय ती चालवतच राहिलो तर मुक्कामावर कसे पोहोचू? होडी चालवून वल्ही वल्हवून आपले हात पाय थकून जातील आणि अखेरीस आपण समुद्रात बुडून जाऊ! म्हणून जीवनाचे ध्येय ठरविणे अत्यंत आवश्यक आहे. ध्येय ठरविल्याशिवाय आयुष्य व्यतीत करणे म्हणजे पट्टा न लावता इंजिन चालविण्यासारखे आहे ! जर अंतिम ध्येय हवे असेल तर ते मोक्ष प्राप्तीचेच आहे आणि मधले ध्येय हवे असेल तर जीवन सुखमय नसले तरी चालेल पण क्लेशमय तर नसावेच.