________________
प्रेम
दादाश्री : प्रेम कुठेच नाही. प्रेमासारखी वस्तूच या जगात नाही. ही सगळी आसक्तीच आहे. काहीतरी उलट-सुलट बोलल्यावर लगेच कळते.
समजा, आज आपला भाऊ परदेशातून आला, तेव्हा आज तर अगदी त्याच्याचसोबत बसून राहायला आवडते. त्याच्यासोबत जेवायलाफिरायला खूप आवडते.
आणि जर दुसऱ्या दिवशी तो आपल्याला म्हणाला की, 'तुम्ही नोनसेन्स आहात' तर मग झाले ! आणि 'ज्ञानी' पुरुषास तर सात वेळा नोनसेन्स म्हटले तरीही ते म्हणतील 'हो भाऊ, तू बैस ना, इथे बैस. ' कारण 'ज्ञानी' जाणतात की हा बोलतच नाही. ही तर रेकॉर्ड बोलत आहे.
खरे प्रेम तर कसे असते की ज्याच्या मागे कधी द्वेष नसतो. जिथे प्रेमात, प्रेमामागे द्वेष आहे, त्या प्रेमाला प्रेम कसे म्हणता येईल ? एकसमान प्रेम असले पाहिजे.
'प्रेम, ' तिथेच परमात्मा
प्रश्नकर्ता : तर खरे प्रेम म्हणजे कधी कमी - जास्त होत नाही ?
दादाश्री : खरे प्रेम कधीही कमी-जास्त होत नाही. हे तर प्रेम जडले असेल, पण जर कधी त्याला शिव्या दिल्या तर त्याच्याशी भांडण होते आणि हार-तुरे घातले तर तो परत आपल्याला चिकटतो.
प्रश्नकर्ता : व्यवहारात तर कमी-जास्त होतच असते.
दादाश्री : या लोकांचे प्रेम तर दिवसभर कमी-जास्त होतच राहते ना! मुला-मुलींवर, सर्वांवर कमी-जास्त होतच राहते ना ! नातेवाईक, सर्व ठिकाणी कमी-जास्त होतच राहते ! अरे, स्वत: वर सुद्धा कमी - जास्त होत राहते! घटक्यात आरशात पाहिले की म्हणेल, 'आता मी सुंदर दिसत आहे.' आणि घटक्यात म्हणेल की 'नाही, बरोबर नाही.' म्हणजे स्वत:वरचे प्रेम देखील कमी-जास्त होते. हे सर्व जबाबदारी न समजल्यामुळेच होत असते ना! केवढी मोठी जबाबदारी !