________________
दादाश्री : 'मी अनासक्त आहे,' असे जर 'त्याला' भान झाले तर मुक्ती मिळेल. आसक्ती काढायची नाही, 'अनासक्त आहे' याचे भान व्हायला हवे. बाकी, आसक्ती काही निघत नाही. आता तुम्ही जिलेबी खाल्यानंतर चहा प्याल तर काय होईल?
प्रश्नकर्ता : चहा अगोड लागेल.
दादाश्री : हो, तसेच स्वत:चे स्वरूप प्राप्त झाल्यावर हा संसार ही अगोड वाटतो. तेव्हा मग आसक्ती निघून जाते. 'स्वतःचे स्वरूप' प्राप्त झाल्यावर जर त्यास जपून ठेवेल आणि आम्ही सांगू त्या प्रमाणे आज्ञापूर्वक राहील तर त्याला हा संसार अगोड लागेल.
आसक्ती काढल्याने जात नाही. जसे हे लोहचुंबक आणि टाचणी दोघांना जी आसक्ती आहे ती जात नाही. त्याचप्रमाणे या माणसांचीही आसक्ती जात नाही, कमी होते, प्रमाण कमी होते परंतु जात नाही, आसक्ती केव्हा जाईल? 'स्वतः' अनासक्त होईल तेव्हा. 'स्वतः' आसक्तच झाला आहे. नामधारी अर्थात आसक्त! नावावर आसक्ती, सर्वांवर आसक्ती! पती झालात म्हणून आसक्त, बाप झालात म्हणून आसक्त!!
प्रश्नकर्ता : तर या संयोगांचा परिणाम होत नाही तीच खरी अनासक्ती आहे का?
दादाश्री : नाही, अहंकाराचा लोप झाल्यानंतर अनासक्त होतो. म्हणजे अहंकार आणि ममता दोन्हीही जातील तेव्हा अनासक्ती! पण असा कोणीच नसतो.
प्रश्नकर्ता : म्हणजे हे सर्व करायचे, पण त्यात आसक्ती नसावी, कर्म लेपायमान व्हायला नकोत...
दादाश्री : पण लोकांमध्ये आसक्ती स्वाभाविक रित्या राहतेच. कारण त्याची स्वत:ची मूळ चूक गेलेली नाही. 'रूट कॉज' (मूळ कारण) नष्ट झाले पाहिजे. रूटकॉज काय आहे? तर त्याला 'मी चंदुभाऊ आहे' ही बिलिफ (मान्यता) बसली आहे. म्हणून चंदुभाऊसाठी कोणी म्हणेल की 'चंदुभाऊ' चे असे केले जात आहे, त्याने असे नुकसान केले आहे.'