________________
४०
आणि कमी झाले तरीही आसक्ती म्हटली जाते, आणि आसक्तीमध्ये राग-द्वेष होतच असतात. आसक्तीलाच प्रेम मानतात, ही लोकभाषा आहे ना! दुसरे सर्व सुद्धा असेच म्हणतात, त्यालाच प्रेम म्हणतात. अशीच लोकभाषा झाली आहे!
प्रश्नकर्ता : प्रेम आणि आसक्तीमधील फरक समजवाना!
दादाश्री : जे विकृत प्रेम आहे, त्यालाच म्हणतात आसक्ती, हे जग विकृत आहे. यात आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते विकृत प्रेम म्हटले जाते आणि त्यालाच आसक्ती म्हटली जाते.
म्हणजे संपूर्ण जग आसक्तीतच गुंतलेले आहे. अरे, आपल्या आत बसले आहेत ना, ते अनासक्त आहेत, शिवाय ते अकामीही आहेत आणि हे सर्व कामनावाले. आसक्ती आहे तिथे कामना आहे. लोक म्हणतात की 'मी निष्काम झालो आहे.' पण जे आसक्तीत राहतात त्यांना निष्काम म्हटले जात नाही. आसक्तीसोबत कामना असतेच. बरेच लोक म्हणतात की 'मी निष्काम भक्ती करतो.' मी म्हणालो 'कर ना, तू आणि तुझी बायको दोघेही (!) करा. परंतु आसक्ती गेली नाही, तोपर्यंत तू निष्काम भक्ती करशील तरी कशी?'
आसक्ती तर इथपर्यंत चिकटते की चांगल्या कप-बशा असतील ना, तर त्यातही आसक्ती चिकटते, अरे, कप-बशा काय जिवंत आहेत?! एका लाकडाच्या व्यापाऱ्याकडे मी गेलो होतो तो व्यापारी दिवसातून पाच वेळा जाऊन लाकूड पाहून यायचा तेव्हाच त्याला समाधान होत असे! लाकूड इतके सुंदर रेशमासारखे मऊ, आणि गोल!! आणि तो हाताने असा कुरवाळीत असे, तेव्हाच त्याला संतुष्टी व्हायची. तेव्हा या लाकडावर किती आसक्ती आहे! फक्त स्त्रीवरच आसक्ती असेल असे काही नाही. विकृत प्रेम जिथे चिकटले तिथे आसक्ती!
आसक्तीपासून मुक्तीचा मार्ग प्रश्नकर्ता : आसक्तीचे सूक्ष्म स्वरूप आपण समजाविले. तर आता या आसक्तीपासून मुक्ती कशी मिळवायची?