________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
४९
शंका काढून टाकली तर किती फायदा होईल? विनाकारण घाबरत राहण्यात काय अर्थ आहे? एका जन्मात काही फेरफार होणार नाही. त्या मुलींना विनाकारण दुःख देऊ नका, मुलांना दु:ख द्यायचे नाही. मात्र एवढे अवश्य सांगायचे की, 'बाळ, तू बाहेर जातेस परंतु उशीर करु नकोस. आपण खानदानी लोक आहोत, आपल्याला हे शोभत नाही, म्हणून जास्त उशीर करु नकोस.' या प्रकारे सर्व समजावून सांगायचे. परंतु शंका घेणे योग्य ठरणार नाही, 'कोणासोबत फिरत असेल, काय करत असेल?' आणि कधी रात्री बारा वाजता आली, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सांगायचे की, 'बाळ, असे व्हायला नको.' तिला जर घराबाहेर काढले तर ती कोणाकडे जाणार त्याचा काही ठिकाण नाही. फायदा कशात आहे? कमीतकमी नुकसान होईल त्यातच फायदा आहे ना? त्यासाठी मी सर्वांना सांगितले आहे की, 'रात्री मुलगी उशीरा घरी आली तरी तिला घरात घ्यायचे.' तिला बाहेर घालवू नका. नाहीतर बाहेरच्या बाहेर घालवतात, असे कडक स्वभावाचे लोक असतात! काळ केवढा विचित्र आहे! किती दुःखदायी काळ आहे !! आणि ते ही कलियुगात, म्हणून घरामध्ये बसवून तिला समजवायचे.
प्रश्नकर्ता : समोरचा जर कोणी आपल्यावर संशय घेत असेल तर आपण त्याचे निरसन कसे करावे?
दादाश्री : तो संशय घेत आहे, हे आपल्याला असलेले ज्ञानच विसरून जायचे.
प्रश्नकर्ता : त्याला जर आपल्यावर संशय आला, तर आपण त्याला विचारायला हवे की, कसला संशय आला आहे?
दादाश्री : विचारण्यात काही मजा नाही आहे, असे विचारायचे पण नाही. आपण लगेचच समजून घ्यायचे की, आपली काहीतरी चुक झाली आहे, नाहीतर त्याला शंका का यावी?
‘भोगतो त्याचीच चुक' हे सूत्र वापरले की निरसन होते. शंका करणारा भोगतो आहे की ज्याच्यावर शंका होत आहे, तो भोगतो आहे ? ते पाहून घ्यायचे.