________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
७१
'सच्चिदानंद, सच्चिदानंद' म्हटले तर त्यामुळे सर्व बंद होऊन जाईल. बिचाऱ्या दोघांना लाज वाटेल! धोक्याची घंटा वाजवली तर त्वरित बंद होऊन जाते.
आता तुझ्यामुळे घरातील सर्व लोकांना आनंद होईल असे वागायचे. तुला त्यांच्यामुळे दुःख झाले तर समभावाने निकाल करायचा. आणि तुझ्यामुळे सर्वांना आनंद होईल असे वागायचे. मग तू त्या लोकांचे प्रेम पहा, कसे प्रेम आहे ते पहा! हे तर तू त्यांच्या प्रेमाला ब्रेकडाउन करतो, तोडून टाकतो. त्या लोकांचे प्रेम आहे आणि तू मात्र त्यावर दगड टाकत राहिलास तर सर्व प्रेम तुटून जाईल.
प्रश्नकर्ता : तर वृद्धच का जास्त गरम होत असतात ?
दादाश्री : ही तर खटारा गाडी होऊन गेली आहे, जर गाडी जुनी झाली असेल तर नेहमी गरम होते. पण नवीन गाडी असेल ना तर ती गरम होत नाही. म्हणून वृद्धांचे बिचाऱ्यांचे काय...(वय झाल्यामुळे नवीनपिढीसोबत एडजस्टमेन्ट घेऊ शकत नाही आणि त्यामुळे संघर्ष होत राहतो.)
आणि गाडी गरम झाली तर आपण तिला थंड करायला नको का? बाहेर कोणाबरोबर काही भानगड झाली असेल, रस्त्यात पोलीसांसोबत, तेव्हा चेहरा इमोशनल (भावूक) झालेला असतो. त्यावेळी तुम्ही असा चेहरा पाहिला तर काय म्हणाल? 'जेव्हा पहावे तेव्हा तुमचा चेहरा उतरलेलाच दिसतो, नेहमीच लटकलेला.' असे नाही बोलायचे. आपण समजून घ्यायला हवे की कुठल्या तरी अडचणीत सापडलेले आहेत. तेव्हा मग आपण गाडी थंड होण्यासाठी थांबवतो. नाही का ?
ह्या वडीलधाऱ्यांची सेवा करणे हा तर सर्वात मोठा धर्म आहे. तरूणपिढीचा धर्म काय? तर सांगतात, वडीलधाऱ्यांची सेवा करणे. जुन्या गाडीला ढकलून घेऊन जाणे, तरच मग आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपल्याला ढकलणारे मिळतील. हे तर देऊन घ्यायचे आहे. जर आपण वडीलधाऱ्यांची सेवा केली तर आपली सेवा करणारे येऊन मिळतील. आपण जर वडीलधाऱ्यांना धमकावत राहिलो तर आपल्याला पण धमकावणारे भेटतील. तर मग तुम्हाला जसे करायचे असेल, तसे करायची सुट आहे.