________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
७७
आणि अशुभाला दोष म्हटले, पण ते आत्मभाषेत तसे नाही. आत्मभाषेत दोष किंवा गुण असे काही नसतेच. ही लोकभाषेची गोष्ट आहे, भ्रांत भाषेची गोष्ट आहे. आत्मभाषेत तर दोष नावाची वस्तूच नाही.
महावीर भगवंतांना कोणी दोषी दिसतच नव्हते. खिसा कापणारा सुद्धा दोषी दिसत नव्हता. ज्याने त्यांच्या कानात खिळे ठोकले, त्याचाही दोष दिसला नव्हता. उलट त्याच्यावर करुणा आली की या बिचाऱ्याचे काय होईल! त्याच्यावर जोखीमदारी तर आलीच ना, कारण तो स्वत:चे स्वरुप जाणत नाही. स्वतःचे स्वरुप जाणत असेल आणि त्याने खिळे ठोकले असते तर भगवंतांना त्याच्यावर करुणा आली नसती, कारण तो मग ज्ञानी आहे. पण तो स्वरुप जाणत नव्हता म्हणून तो (खिळे मारणारा) कर्ता झाला. आणि स्वरुप जाणत असता तर तो अकर्ता राहिला असता, मग काही हरकत नव्हती. म्हणून गोष्ट थोडक्यात समजून घ्यायची.
लॉगकट (लांबचा रस्ता) नसतोच. हा शॉर्टकट (छोटा रस्ता) आहे. तुम्हाला आत्म्याची जागृती आली, सुरुवात झाली, हे सर्वात मोठे महत्त्वाचे कार्य झाले. एक क्षण सुद्धा 'मी आत्मा आहे' असे कुणाला लक्ष्य बसत नाही, तेव्हा लक्ष्य बसले ही तर खूप मोठी गोष्ट घडली. त्या दिवशी पापंही धुतली जातात. त्यामुळे मग ते निरंतर तुमच्या लक्षातच राहते, विसर पडत नाही.
आता कर्माचा उदय जर जोरदार असेल तर ते तुम्हाला बैचेन करुन टाकते, थोडी घुसमट होते पण ते तुम्हाला बाधक होत नाही, तुमचा आत्मा निघून गेलेला नाही, पण त्यावेळी आत्म्याचे सुख येणे बंद होते. आणि आमचे सुख येणे कधीच बंद होत नाही, निरंतर असते. उलट सुख उसळत असते. आमच्या, सोबत असणाऱ्याला सुद्धा सुख वाटते. आमच्या जवळ बसलेला असेल त्यालाही सुख वाटते. सुख उफाळत असते. इतके सारे आत्म्याचे सुख आहे, हा देह असून सुद्धा, हे कलियुग असून सुद्धा!
तुम्हाला आता चूक होते ती दिसते का? समजते का सर्व?