________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१०३
'केवळज्ञान' प्राप्त झाले तो काळ आणि स्वतःचे दोष दिसणे बंद होण्याचा काळ एकच होता! दोन्हीही समकालीन होते! एकीकडे शेवटचा दोष दिसण्याचे बंद होणे आणि दुसरीकडे केवळज्ञान प्राप्त होणे, असा नियम आहे. जागृती तर निरंतर असली पाहिजे. इथे तर दिवसाही आत्म्याला गोणीत बंद करुन ठेवतात, हे कसे चालेल?! स्वत:च्या दोषांना पाहून ते धूत गेल्याने आपण पुढे जातो, प्रगती होते, नाही तरी शेवटी आज्ञेत राहिल्याने लाभ तर आहेच. त्यामुळे आत्मा जोपासला जातो. जागृतीसाठी सत्संग आणि पुरुषार्थाची गरज आहे. सत्संगात राहण्यासाठी प्रथम आज्ञेत राहिले पाहिजे.
अंधारातील चुका अरे, मनात दिलेल्या शिव्या किंवा अंधारात केलेली कृत्ये भयंकर आहेत! तो असे समजतो की, 'मला कोण पाहणारा आहे आणि हे कुणाला कळणार आहे ?! अरे, ही काही अंधेरनगरी नाही! हा तर भयंकर गुन्हा आहे! या सर्वांना अंधारातील चुकाच त्रास देतात!
'मी जाणतो' ही अंधारातील चूक तर भयंकर मोठी चूक आणि परत 'आता काही हरकत नाही' ही चूक तर मारुनच टाकते. असे तर ज्ञानी पुरुषांशिवाय कुणी बोलूच शकत नाही की, 'माझ्यात एक सुद्धा चूक शिल्लक राहिलेली नाही.' प्रत्येक चुकांना पाहून त्या संपवायच्या आहेत. आपण 'शुद्धात्मा' आणि बाहेरच्या बाबतीत 'मी काहीच जाणत नाही' असे ठेवावे, त्यामुळे मग काही हरकत येत नाही. पण 'मी जाणतो' हा रोग तर शिरायलाच नको. आपण तर 'शुद्धात्मा'. शुद्धात्म्यात एकही दोष नसतो. पण चंदुलालमध्ये जे-जे दोष दिसतील त्यांचा निकाल करावा. अंधारातील चुका आणि अंधारात दाबल्या गेलेल्या चुका दिसत नाहीत. जसजशी जागृती वाढते तसतसे जास्तीत जास्त चुका दिसतात. स्थूल चुका जरी संपल्या तरीही डोळ्यांचे तेज बदलून जाते! अंधारात केलेल्या चुका अंधारात कशा दिसतील? जसजसा चुका निघत जातात, तसतशी वाणीही अशी निघत जाते की, कुणी दोन तास ऐकतच राहिल!