________________
दान
आनंद प्राप्तीचे उपाय प्रश्नकर्ता : मानसिक शांति मिळवण्यासाठी माणसाने एखाद्या गरीबाची, एखाद्या अशक्त माणसाची सेवा करावी की देवाची भजना करावी किंवा मग कोणाला दान द्यावे? काय केले पाहिजे?
दादाश्री : मानसिक शांती हवी असेल तर आपली वस्तू दुसऱ्यास खाऊ घालावी. उद्या आईस्क्रीमचे पिंप भरुन आण आणि या सर्वांना खायला घाल. मग त्यावेळी तुला किती आनंद होतो, ते तू मला सांग. ह्या लोकांना आईस्क्रीम खायचे नाही पण तू तुझ्या शांतीचा प्रयोग करुन बघ. या थंडीत कोणी रिकामा नाही आईस्क्रीम खायला. या प्रमाणे तू जिथे असशील तिथे जी जनावरे असतील, ही माकडे असतात, त्यांना चणे दिले तर ते खुश होऊन उड्या मारतात. तेव्हा तुझ्या आनंदाची सीमा राहणार नाही. ते खात राहतील आणि तुझ्या आनंदाची सीमा राहणार नाही. या कबुतरांना तू दाणे टाकशील त्या आधीच ते खुश होऊन उड्या मारु लागतात. आणि तू टाकले, तुझी वस्तू दुसऱ्यास दिली की आतून आनंद वाटू लागतो. आता एखादा मनुष्य जर रस्त्यात पडला आणि त्याचा पाय मोडला आणि रक्त वाहत असेल, तेव्हा तू स्वतःचे धोतर फाडून तिथे बांधतो त्यावेळी तुला आनंद वाटतो. ते धोतर जरी शंभर रुपयाचे असले, ते फाडून तू बांधलेस, पण त्यावेळी तुला खूप आनंद होईल.
दान कुठे द्यावे? प्रश्नकर्ता : काही धर्मात असे सांगितले जाते की जे काही तुम्ही कमावता, त्यातून काही टक्के दान करा, पाच-दहा टक्के दान करा, तर ते कसे आहे?
दादाश्री : धर्मामध्ये दान करण्यास हरकत नाही, पण ज्या धार्मिक संस्थामध्ये लक्ष्मीचा धर्मासाठी सदुपयोग होत असेल तेथे द्या. जेथे दुरुपयोग होत असेल तेथे देऊ नका, दुसरीकडे द्या.