________________
दान
दान कशासाठी ?
प्रश्नकर्ता: दान कशासाठी के55ले जाते ?
दादाश्री : असे आहे की दान देऊन तो स्वतः काही घेऊ इच्छीतो. सुख देऊन सुख प्राप्त करु इच्छीतो. मोक्षासाठी दान देत नाही. लोकांना तुम्ही सुख दिले तर तुम्हाला सुख मिळेल. जे तुम्ही देता ते तुम्ही मिळवता. म्हणजे हा तर नियम आहे, दिल्याने आपल्याला मिळते, प्राप्त होते, आणि घेतल्याने ते निघून जाते.
प्रश्नकर्ता : उपवास करणे चांगले की काही दान करणे चांगले ?
दादाश्री : दान देणे म्हणजे शेतात पेरणे. शेतात पेरले म्हणजे मग त्याचे फळ मिळेल. आणि उपवास केल्याने आतील जागृती वाढेल. परंतु शक्तिनुसार उपवास करायला देवाने सांगितले आहे.
दान म्हणजेच सुख देणे
दान म्हणजे दुसऱ्या कोणत्याही जीवाला, मग ते मनुष्य असो किंवा दुसरे प्राणी असो, त्यांना सुख देणे, याचे नाव दान. आणि सर्वांना सुख दिले तर त्याच्या ‘रिएक्शन' ने आम्हाला सुखच मिळते. सुख दिले तर लगेचच तुम्हाला घरी बसल्या सुख मिळेल. तुम्ही दान देता, तेव्हा तुम्हाला आतुन सुख वाटते. स्वत:च्या घरचे पैसे काढून देता तरी सुख वाटते. कारण चांगले काम केले. चांगले काम केले म्हणजे सुख वाटते आणि वाईट काम केले तेव्हा दुःख वाटते. या वरुन आम्हाला कळते की कोणते काम चांगले व कोणते वाईट ?