________________
कर्माचे विज्ञान
म्हणून बिघडवू नका भाव कधी प्रश्नकर्ता : पुण्यकर्म आणि पापकर्म कसे बांधले जातात?
दादाश्री : दुसऱ्यांना सुख देण्याचा भाव केल्यामुळे पुण्य बांधले जाते आणि दुःख देण्याचा भाव केल्यामुळे पाप बांधले जाते. मात्र भाव केल्यामुळेच कर्म बांधले जाते, क्रिया केल्याने नाही. क्रियेत तसे असेल किंवा नसेलही, पण आत जसे भाव असतील तसे कर्म बांधले जाते. म्हणून भाव बिघडवू नका.
कोणतेही कार्य स्वार्थ भावनेने केले तर पापकर्म बांधले जाते आणि निःस्वार्थ भावनेने केल्यावर पुण्यकर्म बांधले जाते. पण दोन्हीही कर्मच आहेत ना! पुण्य कर्माचे जे फळ आहे ते म्हणजे सोन्याची बेडी आणि पाप कर्माचे फळ आहे ते म्हणजे लोखंडाची बेडी. पण दोन्ही सुद्धा बेड्याच आहेत ना?
स्थूळकर्म : सुक्ष्मकर्म एका शेठने पन्नास हजार रूपयांचे दान दिले. तेव्हा त्याच्या मित्राने शेठजींना विचारले, 'एवढे पैसे देऊन टाकलेत?' तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसाही देईल असा नाही. हे तर त्या मेयरच्या दबावामुळे द्यावे लागले.' तर हयाचे फळ तिथे काय मिळेल? पन्नास हजार दान दिले ते स्थूळकर्म. त्याचे फळ त्याला इथल्या इथे मिळून जाते. ते म्हणजे लोक त्या शेठची 'वाह वाह' करून स्तुती करतात. किर्तीचे गुणगान गातात. परंतु शेठने आत, सूक्ष्मकर्मात काय चार्ज केले? तर, 'एक पैसाही देईल असा मी नाही.' त्याचे फळ त्याला पुढील जन्मात मिळेल, तेव्हा पुढील जन्मात शेठ एका पैशाचेही दान देऊ शकणार नाही. आता एवढी सुक्ष्म गोष्ट कोणाला समजेल?
त्या ठिकाणी दुसरा कोणी गरीब असेल, त्याच्याकडे सुद्धा हेच लोक दान मागण्यास गेले असतील, तेव्हा तो गरीब माणूस काय म्हणतो की, 'माझ्या जवळ आता पाचच रूपये आहेत ते सगळेच तुम्ही घ्या. पण आता जर माझ्या जवळ पाच लाख रूपये असते तर ते सर्वच दिले असते.' असे