________________
कर्माचे विज्ञान
४३
फळ मिळते. रागाचे (मोह-आसक्तीचे) फळ सुख आणि द्वेषाचे फळ दुःख मिळेल.
प्रश्नकर्ता : हे जे आपण सांगितले की रागाचे फळ सुख आणि द्वेषाचे फळ दु:ख तर ही परोक्ष फळाची गोष्ट आहे की प्रत्यक्ष फळाची?
दादाश्री : निव्वळ प्रत्यक्ष. असे आहे की, रागाने पुण्य बांधले जाते आणि पुण्याने लक्ष्मी मिळाली. आता लक्ष्मी मिळाली परंतु वापरताना पुन्हा दुःख देऊन जाते. म्हणजे हे सगळे सुख जे तुम्ही उपभोगता, हे लोन वर घेतलेले सुख आहे. म्हणून जर परत पेमेन्ट करणार असाल तरच हे सुख घ्या. हो, तरच ह्या सुखाचा स्वाद घ्या नाहीतर स्वाद घेऊ नका. आता तुमची फेडण्याची, पुन्हा पेमेन्ट करण्याची शक्ती नाही म्हणून स्वाद घेणे बंद करून टाका. हे तर सर्व लोनने घेतलेले सुख आहे. कोणत्याही प्रकारचे सुख हे लोनवर घेतलेले सुख आहे.
पुण्याचे फळ सुख, पण सुखही लोनवरचे आणि पापाचे फळ दुःख, दुःखही लोनवरचे. अर्थात् हे सर्व लोनवरील आहे. म्हणून सौदा करायचा नसेल तर करू नका. म्हणून तर पाप आणि पुण्य हेय अर्थात (त्याग करण्या योग्य) मानले आहे.
प्रश्नकर्ता : ह्या अगोदर दिलेले आहे आणि आता परत घेतले, म्हणजे हिशोब चुकता झाला. म्हणून त्याला तर लोनवर घेतलेले असे म्हटले जाणार नाही ना?
दादाश्री : आता जे सुख उपभोगत आहात, ते सर्व परत आलेले नाहीत, तरीही उपभोगत आहात, तर पेमेन्ट करावे लागेल. आता पेमेन्ट कशाप्रकारे करावे लागेल? आंब्यांचा छान रस खाल्ला त्या दिवशी आपल्याला आनंद झाला आणि सुख उत्पन्न झाले. दिवस आनंदात गेला. पण दुसऱ्या वेळी आंबा खराब निघाला, तर तेव्हा तेवढेच दुःख होईल. पण जर यात सुख घेतले नाही, तर ते दुःख येणार नाही.
प्रश्नकर्ता : यात मूर्छा नसेल तर? दादाश्री : तर मग आंबा खाण्यात हरकत नाही.