________________
३८
कर्माचे विज्ञान
अजाणतेपणी केलेल्या कर्माचे फळ मिळते का?
प्रश्नकर्ता : जाणून-बुजून केलेल्या गुन्ह्यांचा दोष किती लागतो? आणि अजाणतेपणी केलेल्या चूकांचा दोष किती लागत असेल? अजाणतेपणी केलेल्या चूकांना माफी मिळते ना?
दादाश्री : कोणी असा वेडा नाही की जो असेच माफ करून टाकेल. तुमच्या अजाणतेपणी एखादा व्यक्ति मारला गेला तर कोणी काही रिकामा बसलेला नाही की जो माफ करण्यास येईल. अजाणतेपणी जर विस्तवावर हात पडला तर काय होईल?
प्रश्नकर्ता : जळून जाईल. दादाश्री : ताबडतोब फळ, अजाणतेपणी करा किंवा जाणून बुजून
करा.
प्रश्नकर्ता : अजाणतेपणी केलेल्या दोषांना अशाप्रकारे भोगावे लागते, तर जाणून-बुजून केल्यानंतर किती भोगावे लागेल?
दादाश्री : हो, म्हणून हेच मी तुम्हाला समजवू इच्छितो की, अजाणतेपणी केलेले कर्म, ते कशाप्रकारे भोगायचे? तेव्हा म्हणे, एका माणसाने खूप पुण्यकर्म केले असतील. राजा बनण्याचे पुण्य कर्म केले असतील, पण ते अजाणतेपणी केले होते, समजपुर्वक केलेले नव्हते. लोकांचे पाहून-पाहून त्याने सुद्धा असे कर्म केले. त्यामुळे तो समजल्या शिवाय राजा बनेल, असे कर्म बांधतो. आता तो पाच वर्षाच्या वयात राजगादीवर बसतो. वडील वारले म्हणून, आणि वयाच्या ११ व्या वर्षापर्यंत, म्हणजे सहा वर्षांपर्यंत त्याला राज्य करायचे होते, म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी तो गादीवरून उतरला. आणि दुसरा माणूस जो वयाच्या २८ व्या वर्षी राजा बनला आणि वयाच्या ३४ व्या वर्षी राज्य सुटले. त्यांच्यापैकी कुणी अधिक सुख उपभोगले? सहा वर्ष दोघांनी राज्य केले.
प्रश्नकर्ता : जो वयाच्या २८ व्या वर्षी आला आणि ३४ व्या वर्षी गेला त्याने.