________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
महावीर भगवंतांनी हे सर्व स्पष्ट केले होते! महावीर भगवंतांना माहित होते की आता कोणी अरिहंत तर नाहीत, तेव्हा हे लोक कोणाची भक्ति करतील? म्हणून त्यांनी हे स्पष्ट केले की महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर आहेत आणि त्यांच्यात सीमंधर स्वामी सुद्धा आहेत. हे स्पष्ट केले म्हणून मग ते मान्य झाले. मार्गदर्शन महावीर भगवानांचे होते, नंतर कुंदकुंदाचार्यांनाही तसा योग जुळून आला. अरिहंत म्हणजे वर्तमानात अस्तित्व असले पाहिजे. ज्यांचा निर्वाण होऊन गेला, त्यांना तर सिद्ध म्हटले जाते. निर्वाण झाल्यानंतर त्यांना अरिहंत म्हटले जात नाही.
नवकार मंत्र केव्हा फळ देतो? म्हणनच सांगावे लागले की, 'अरिहंताना नमस्कार करा.' तेव्हा विचारतात की, 'अरिहंत कुठे आहेत आता?' तेव्हा मी सांगितले की 'सीमंधर स्वामींना नमस्कार करा. सीमंधर स्वामी ह्या ब्रह्मांडात आहेत. ते आज अरिहंत आहेत, म्हणून त्यांना नमस्कार करा! ते आज हजर आहेत. अरिहंत रुपात असायला हवे, तेव्हा आपल्याला फळ मिळते.' अतः संपूर्ण ब्रह्मांडात 'अरिहंत जिथे कुठे पण असतील, त्यांना मी नमस्कार करतो.' असे समजून बोलले, तर त्याचे खूप सुंदर फळ मिळते.
प्रश्नकर्ता : परंतु वर्तमानात विहरमान वीस तीर्थंकर तर आहेतच ना?
दादाश्री : हो, त्या वर्तमानातील वीसांना अरिहंत मानले तर तुमचा नवकार मंत्र फळ देईल, नाहीतर फळ मिळणार नाही. म्हणून ह्या सीमंधर स्वामींची भक्ति आवश्यक आहे. आणि तेव्हा मंत्र फळ देईल. कित्येक लोक ह्या वीस तीर्थंकरांना जाणत नसल्यामुळे, किंवा मग 'त्यांचे आणि आमचे काय घेणे-देणे?' असे समजून चोवीस तीर्थंकर (जे आपल्या या भरतक्षेत्रात होऊन गेलेत) त्यांनाच 'हे अरिहंत आहेत' असे मानतात, आज वर्तमानात असायला पाहिजे, तेव्हाच फळ प्राप्त होईल! अशा तर कितीतरी चूका होत असल्यामुळे हे नुकसान होत राहिले आहे.