________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
संयति पुरुष चौवीस तीर्थंकरांना काय म्हणत होते? भूतपूर्व तीर्थंकर म्हणत होते. अर्थात जे भूतकाळात होऊन गेले ते! आपण वर्तमान तीर्थंकरांना शोधून काढले पाहिजे. कारण भूतकाळातील तीर्थंकरांची भक्ति केल्याने संसारात आपली प्रगती होईल, परंतु मोक्षफळ प्राप्त होत नाही. मोक्षफळ तर आज जे हजर आहेत, तेच देतात.
'नमो अरिहंताणं' आज कोण? आपले लोक जे नवकार मंत्र बोलतात, ते कोणत्या समजुतीने बोलतात? मी त्या लोकांना विचारले, तेव्हा ते मला म्हणाले, 'चोवीस तीर्थंकर हेच अरिहंत आहेत ना!' त्यावर मी म्हणालो, 'तुम्ही जर त्यांना अरिहंत म्हणाल तर मग सिद्ध कोणाला म्हणाल?' ते अरिहंत होते, पण आता तर ते सिद्ध होऊन गेले, मग आता अरिहंत कोण? जे लोक अरिहंतला मानतात, ते 'अरिहंत' कोणाला मानतात? 'नमो अरिहंताणं' बोलतात ना?
हे चोवीस तीर्थंकर आहेत ना, ते अरिहंत म्हटले जात होते, परंतु जोपर्यंत ते जीवंत होते तोपर्यंत. आता तर ते निर्वाण होऊन मोक्षाला गेले, म्हणून ते सिद्ध म्हटले जातात. अर्थात् आता ते 'नमो सिद्धाणं' पदामध्ये आले. यांना अरिहंताणं म्हणत नाही. जे चोवीस तीर्थंकरांना अरिहंत मानतात, त्यांना माहित नाही की ते तर 'सिद्ध' होऊन गेले, म्हणजे हे असे चुकीचे चालले आहे. म्हणून नवकार मंत्र फळ देत नाही. मग मी त्यांना समजावले की अरिहंत हे आता सीमंधर स्वामी आहेत. जे हजर आहे, जीवंत आहेत तेच अरिहंत..
जे तीर्थंकर झाले ते सांगून गेले की, 'आता भरतक्षेत्रात चोवीसी बंद होत आहे, आता येथे तीर्थंकर होणार नाहीत. म्हणून महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर आहेत, त्यांची भक्ति करा! तीथे वर्तमान तीर्थंकर आहेत.' पण आता हे तर लोकांच्या लक्षातच राहिले नाही आणि त्या भूतकाळातील चोवीस तीर्थंकरांनाच तीर्थंकर मानतात!! बाकी भगवंत तर सर्वकाही सांगून गेले आहेत.