________________
‘मूकमाटी’: ग्रंथ परिचय
प्रदीप शहा
'मूकमाटी' हा ग्रंथ ४८८ पानांचा असून तो आचार्य विद्यासागर महाराजांनी लिहिलेला आहे आणि त्याचे प्रकाशन भारतीय ज्ञानपीठ, दिल्ली तर्फे झाले असून त्याची किंमत रू. ५० आहे.
हा ग्रंथ मी स्वतः तीन वर्षापूर्वी वाचला तो मला अत्यंत आवडला, आणि सर्वांनी तो वाचावा असे वाटत राहीले. या वर्षीच्या (१९९० ई.) चातुर्मासामध्ये प.पू. जयकीर्ती महाराजांच्या प्रेरणेने मी या ग्रंथावर सतत एक महिना प्रवचन केले तेवढ्यात श्री. हेरवाडे यांचे पत्र आले की जैन साहित्य संमेलनामध्ये 'मूकमाटी' ग्रंथाचा परिचय द्यावयाचा आहे. म्हणून हा थोडासा प्रयत्न.
या ग्रंथाचे लेखक आचार्य विद्यासागर महाराज यांचा जन्म 'सदलगा' या ग्रामी, कर्नाटकांत १० आक्टोबर १९४६ मध्ये झाला. २० व्या वर्षी ब्रम्हचर्य व्रत त्यांनी घेतले व वयाच्या २२ व्या वर्षी दिगंबर मुनी दिक्षा घेतली. विद्यासागर महाराजांना हिंदी अजिबात येत नव्हति . स्वत: हिंदीचा अभ्यास करून 'मूकमाटी' हे महाकाव्य त्यानी हिंदी भाषेत लिहिले.
जैन साहित्यामध्ये शतकानुशतके जैन आचार्यांनी साहित्य निर्मिती केली आहे या विसाव्या शतकामध्ये नग्नता पाळून मग्नतेने साहित्य निर्मिती करणारा हा संत पाहिला म्हणजे माझ्या सारख्या साहित्यकालाही आत्मानंद होतो. मी विद्यासागरजींना पाहिलेले नाही. पण त्यांच्या काव्यातूत त्यांच्या प्रतिभेची, प्रगल्भतेची उंची काय असेल याचे अनुमान सहज काढता येते. 'मूकमाटी' या काव्याचा इतका प्रभाव आणि आंतरिक आनंद मला लाभला आणि असे वाटते की या काव्यासंबंधी मूकताच पाळावी आणि बोलूच नये.
स्वतः
'मूकमाटी' हे महाकाव्य, खंडकाव्य की फक्त काव्य आहे. याच्या वादात शिरू नये असे वाटते. पण या कृती साहित्यिक मूल्यमापन करताना हे महाकाव्यच आहे असेच म्हणावेसे वाटते. कारण या काव्यामध्ये निसर्गाचे वर्णन, सामाजिक समस्यांचे विश्लेषण, मानवजातीचे मनोविश्लेषण, असंख्य उपमांची पेरणी, जैन व इतर भारतीय दर्शनांची तुलनात्मक मांडणी, अध्यात्म या सर्व विषयांचा ऊहापोह दिसून येतो. या काव्यामध्ये रोमांस सुद्धा आलेला आहे पण त्याचे स्वरूप मात्र तात्त्विक आणि बैठक अध्यात्मिक आहे.
या महाकाव्याच्या विषयात मातीसारख्या तूच्छ वस्तूला घेवून लिहिण्याची कल्पनाच विचित्र वाटते. मातीच्या तुच्छतेमधून भव्यतेचे दर्शन घडविणारी ही एक मंगल यात्रा आहे. तुच्छ जीवनाला भव्यता प्राप्त करून देण्याची प्रक्रिया आणि त्या भव्यतेतून मुक्तीची मंगल यात्रा घडविणारे हे महाकाव्य आहे.
'मूकमाटी' ही अशी एक अनुपम साहित्य कलाकृती आहे, जी अध्यात्माचा खजिना घेवून सरळ सोप्या भाषेमध्ये वाचकाला आपल्या बरोबर बांधून घेते. हे महाकाव्य असे आहे जे बेहद्द सरळ व व्यावहारिक वाटते. पण साहित्यिक प्रांगणामध्ये या महाकाव्याने कितीतरी कवींच्या प्रतिभेला आपल्या लेखणीने फिके पाडले आहे ह्या काव्यामध्ये अत्यंत स्पष्टता, सक्षमता व सहजता आहे. अर्थ, छंद, अलंकार, बंध विविधता, व्यंग, सौष्ठव आणि भरपूर प्रसंग त्यात प्रस्तुत केलेले आहेत.
"मन्त्र न ही अच्छा होता है / ना ही बुरा / अच्छा, बुरा तो अपना मन होता है / स्थिर मन ही वह / महामन्त्र होता है / और अस्थिर मन ही / पापतन्त्र स्वच्छन्द होता है।” (पृ. १०८ - १०९)