________________
वाणी,
व्यवहारात...
३७
दादाश्री : क्रोध - मान - माया - लोभामुळे करतो तो. काहीतरी मिळवायचे आहे, एक तर मान मिळवायचा आहे, किंवा लक्ष्मी मिळवायची आहे, काहीतरी हवे आहे. ते प्राप्त करण्यासाठी खोटे बोलतो. किंवा मग भीती आहे, भीतीमुळे तो खोटे बोलतो. आत दडलेली भीती आहे की, 'कोणी मला काय म्हणेल?' अशी काहीतरी भीती असते. नंतर हळूहळू खोटेपणाची सवयच पडते. नंतर भीती नसली तरीही खोटे बोलत राहतो.
प्रश्नकर्ता : या समाजात खूप लोक खोटे बोलतात आणि चोरी, लबाडी वगैरे पण करतात, पण तरीही खूप चांगल्या प्रकारे राहतात. आणि जो खरे बोलतो, त्याला सर्व अडचणी येतात. तर आता कोणती लाईन पकडावी ? खोटे बोलून स्वतःला थोडी शांती राहील असे करावे की मग खरे बोलावे ?
दादाश्री : असे आहे ना, पूर्वी खोटे बोलले होते त्याचेच तर हे फळ आले आहे, तेच येथे चाखत आहात निवांतपणे ! आणि तो थोडेसे खरे बोलला होता, त्याचे फळ त्याला मिळाले. आणि आता तो खोटे बोलतो, त्याचे फळ त्याला मिळेलच. तुम्ही खरे बोलाल तर त्याचे फळ मिळेल. हे तर फळ चाखतात. न्याय आहे, निव्वळ न्याय आहे.
एका माणसाच्या परीक्षेचा आज रिझल्ट आला, तो पास झाला आणि आपण नापास झालो. पास होणारा माणूस आज जरी रखडत असेल, परंतु त्याने परीक्षा देतेवेळी करेक्ट दिली होती. म्हणजे हे सर्व जे येत आहे, ते फळ येत आहे, त्या फळाला शांततेने भोगून घ्यावे, याला म्हणतात पुरुषार्थ.
प्रश्नकर्ता: कित्येक जण खोटे बोलतात तरी पण सत्यात मोडते. आणि कित्येक जण खरे बोलतात तरी पण ते असत्यात मोडते. हे काय पझल (कोडे) आहे ?
दादाश्री : हे त्याच्या पाप आणि पुण्याच्या आधारे घडत असते. त्याचा जर पापाचा उदय असेल तर तो खरे बोलला तरी देखील खोटे ठरते. आणि जेव्हा पुण्याचा उदय असेल तेव्हा खोटे बोलला तरी देखील लोक त्याचे खरे म्हणून स्वीकारतील. वाटेल तसे खोटे करेल तरीही चालून जाते.