________________
वाणी, व्यवहारात.
प्रश्नकर्ता : पण या जन्मात सतत असे बोलत राहिल्याने की 'बस, स्याद्वाद वाणीच हवी आहे' तर तशी वाणी होईल का?
दादाश्री : पण हे 'स्याद्वाद' समजून बोलेल तरच. तो स्वतः समजतच नसेल आणि बोलत राहिला किंवा गात राहिला तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
कोणाची वाणी चांगली निघते? की जो उपयोगपूर्वक बोलत असेल त्याची. उपयोगवाले कोण असतात? तर ज्ञानी असतात. त्यांच्याशिवाय कोणीही उपयोगवाले नसतात. हे जे मी 'ज्ञान' दिले आहे, ज्यांना हे 'ज्ञान' असेल, त्यांची वाणी उपयोगपूर्वक निघू शकते. त्याने जर पुरुषार्थ केला तर उपयोगपूर्वक होऊ शकते. कारण की 'पुरुष' झाल्यानंतरचा हा पुरुषार्थ आहे. 'पुरुष' होण्यापूर्वी पुरुषार्थ नसतो.
प्रश्नकर्ता : या जन्माची समजूत वाणी सुधारण्यासाठी कशा प्रकारे मदत करते. हे जरा उदाहरण देऊन समजावून सांगा.
दादाश्री : आता जर कोणी तुला एक शिवी दिली, तर त्याचा आत परिणाम होतो. मनातल्या मनात तू थोडेफार बोलतो सुद्धा की 'तुम्ही नालायक आहात.' पण त्यात तू नसतोस. वेगळा झालास म्हणून तू त्यात नसतोस. आत्मा वेगळा झाला आहे म्हणून तो एकाकार होत नाही. म्हणजे एखाद्या आजारी माणसासारखे तू बोलतोस.
प्रश्नकर्ता : तर आता ज्याचा अहंकार गेला नाही, आत्मा वेगळा झाला नाही, त्याला त्याची समजूत मदत करते का?
दादाश्री : हो. आधी तो जसे आहे तसे बोलतो आणि मग बोलल्यानंतर पश्चाताप करतो.
वाणी सुधारायची असेल तर लोकांना न आवडणारी वाणी बंद करा. आणि मग कोणाची चूक काढली नाही, संघर्ष केला नाही, तरीही वाणी सुधारते.
प्रश्नकर्ता : वाणीत सुधार आणायचा असेल तर त्यासाठी काय करावे?