________________
वाणी, व्यवहारात...
म्हणून भगवंतांनी सांगितले आहे की जिवंतपणीच मेल्यासारखे राहा. बिघडलेले सुधारु शकतो. बिघडलेल्याला सुधारणे हे 'आमच्याने' होऊ शकते, तुम्ही ते करायचे नाही. तुम्हाला आमच्या आज्ञेनुसार चालायचे. जो स्वतः सुधारला असेल तोच दुसऱ्यांना सुधारु शकेल. स्वत:च सुधारलेला नसेल तो दुसऱ्याला कसा सुधारु शकेल?
प्रश्नकर्ता : सुधारलेल्याची व्याख्या काय?
दादाश्री : समोरच्या व्यक्तिला तुम्ही रागावले तरी त्याला त्यात प्रेम दिसून येईल. तुम्ही ठपका दिला तरी त्याला तुमच्यात प्रेम दिसेल की 'ओहोहो! माझ्या वडिलांचे माझ्यावर केवढे प्रेम आहे !' ठपका द्या, पण प्रेमाने द्या, तर सुधारेल. या कॉलेजात जर प्रोफेसर ठपका द्यायला गेले तर प्रोफेसरांना सगळे मारतील!
समोरचा सुधारावा यासाठी आपले प्रयत्न असायला पाहिजेत, पण जे प्रयत्न 'रिअॅक्शनरी' असतील अशा प्रयत्नात पडू नये. आपण त्याला रागावले आणि त्याला वाईट वाटले त्यास प्रयत्न म्हणत नाही. प्रयत्न आतून करायला हवेत. सूक्ष्मरित्या ! स्थूलरित्या जर आपल्याला जमत नसेल तर सूक्ष्मरित्या प्रयत्न करायला हवेत. जास्त ठपका द्यायचा नसेल तर थोडक्यात सांगायचे की, 'आपल्याला हे शोभत नाही.' बस इतकेच सांगून बंद करावे. सांगावे तर लागते पण सांगण्याची पद्धत असते.
स्वतः सुधारले नाही आणि लोकांना सुधारण्यास गेले, त्यामुळे तर लोक उलट बिघडले. सुधारण्यास गेलो की बिघडतातच. स्वतःच बिघडलेला असेल तर काय होईल? स्वतः सुधारणे अगदीच सोपे आहे. आपण स्वतः सुधारलेले नसू आणि दुसऱ्याला सुधारण्यास गेलो तर हे निरर्थक आहे.
रागावल्यामुळे माणूस खरे सांगत नाही आणि कपट करतो. हे सर्व कपट रागावल्यामुळेच जगात उभे राहिले आहे. रागावणे हा सर्वात मोठा अहंकार आहे, वेडा अहंकार आहे. रागावणे केव्हा उपयोगी ठरेल? पूर्वग्रह न ठेवता रागावले तेव्हाच.