Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 6
________________ याविषयी एका जैन डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार वरील इंद्रियविषयक मान्यता आजच्या प्राणिशास्त्राशी सुसंगत नाहीत. द्रव्येंद्रिये व भावेंद्रिये ही जैन विभागणी सांगून सर्व प्रश्नांमधून सुटका करून घेता येणार नाही. मूलद्रव्यांची संख्या : जैन सिद्धान्तानुसार प्रत्येक पुद्गलावर एक वर्ण, एक रस, एक गंध व दोन स्पर्श राहतात. एकंदरित सर्व वर्ण, रस, गंध, स्पर्शांचा गुणाकार करून मूलद्रव्यांची संख्या २२० येते. स्पर्शांचा विचार करताना 'बंध' (Bonds) हा शब्दही महत्त्वाचा आहे. आत्ता उपलब्ध अणुविज्ञानानुसार मूलद्रव्यांची (Elements) संख्या ११४ आहे. महत्त्वाची बाब अशी की ‘नवीन मूलद्रव्य शोधून काढताना वर्ण-गंध-रस-स्पर्श या चार गुणांचा विचार केला जातो का ?' याची चिकित्सा रसायनशास्त्रज्ञाच्या मदतीने करणे आवश्यक आहे. तिर्यंचसृष्टीचा विचार : जैन शास्त्रानुसार तिर्यंचसृष्टीत एकेंद्रिय ते पंचेंद्रिय सर्व जीव येतात. येथे मात्र मर्यादित अशा पशुपक्षीसृष्टीचा विचार करणार आहोत. गेल्या २० वर्षात जीवसृष्टीच्या निरीक्षणाचे विज्ञान विशेषच प्रगत होत चालले आहे. स्थलचर, नभचर, जलचर असे विविध पशुपक्षी, कीटक, प्राणी यांच्यावर आधारित अभ्यास आणि फिल्म्स् या नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी इ. चॅनेलवर चोवीस तास प्रदर्शित होत असतात. प्रायः यांचे अभ्यासक विदेशीच असतात. भारतातील डॉ. सलीम अली, नीलिमकुमार खैरे, डॉ. किरण पुरंदरे इ. काही मोजकेच निसर्गनिरीक्षक प्रसिद्ध आहेत. भारतातही हा अभ्यास हळूहळू प्रगत होत आहे. जैन शास्त्रातून मिळणारे तिर्यंचविषयक वर्णन अतिशय सूक्ष्म, विस्तृत आणि स्तिमित करणारे आहे. इंद्रिये, गती, आहार, ज्ञान, संयम, लेश्या, कषाय, गुणस्थान व संलेखना इ. अनेक अंगांनी तिर्यंचांची जैन शास्त्रात निरीक्षणे दिली आहेत. एका फिल्ममध्ये जेव्हा Pride, Anger, Cruelty, Soberness अशी शीर्षके देऊन विविध प्राण्यांचे व्यवहार नोंदविण्यात आले तेव्हा साहजिकच जैन शास्त्राप्रमाणे हे कषायांचे आविष्कार आहेत असे वाटले. हिंस्र पशू कडकडून भूक लागल्याखेरीज शिकार करीत नाही. अन्नाचा परिग्रह करीत नाही. सिंह, वाघ हे पकडलेल्या पशूचे शरीर पूर्ण निष्प्राण झाल्याखेरीज आहार करीत नाहीत. अनेक पशुपक्ष्यांना मृत्यूची चाहूल लागल्यावर ते दूर एकांतत निघून जातात. जवळजवळ सर्वच प्राण्यांमधील वात्सल्यभावना अतिशय प्रबळ असते. स्थलांतर करणारे पक्षी विशिष्ट दिशेनेच जातातव परत येतात. पशुपक्ष्यांचे व्यवहार प्राय: अंत:प्रेरणेने चालत असले तरी प्रत्येकाची वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्येही दिसतात. तिर्यंचांना असलेले जातिस्मरण, त्यांनी धारण केलेली संलेखना, त्यांची गुणश्रेणींमध्ये चौथ्या गुणस्थानांपर्यंत प्रगती, असे उल्लेख विविध जैन ग्रंथांत विखुरलेले दिसतात. तिर्यंचांचे जैन शास्त्रनिर्दिष्ट वर्तन प्राण्यांच्या मनोवैज्ञानिक भाषेत नक्कीच मांडता येईल. सम्मूर्च्छिम जीव : जैन शास्त्रानुसार मुंग्या, किडे, अळ्या, ढेकूण, डास, माशी, भुंगा इ. अनेक कीटक सम्मूर्च्छिम आहेत म्हणजे मातापित्यांच्या संयोगाशिवाय ते उत्पन्न होतात. आधुनिक विज्ञानानुसार या सर्व कीटकांची सूक्ष्म अंडी असतात. मात्र माणसांच्या मलमूत्र इ. १४ अशुचिस्थानातून निर्माण होणारे 'सम्मूर्च्छिम मनुष्य' ही संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्याही विशेष लक्षणीय आहे. Genetic Science च्या आधुनिक संशोधनानुसार माणसाच्या मलमूत्र, गर्भजल इ. पासून त्या मनुष्याचा DNA मिळविता येतो. असा DNA विकसित करून कदाचित कृत्रिम मनुष्य तयार करण्यापर्यंत विज्ञान प्रगती करू शकेल. जनुकीय शास्त्राचा शोधनिबंध लिहिताना जैन शास्त्रातील एतद्विषयक विचार मांडले गेले पाहिजेत असे प्रामाणिक जैन अभ्यासकाला मनापासून वाटते.Page Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25