Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi
View full book text
________________
* तिर्यंचगतीचा विशेष विचार *
जैन परंपरेत सैद्धांतिक दृष्ट्या तिर्यंचगतीची व्याप्ती पुष्कळच आहे. प्रस्तुत ठिकाणी आपण केवळ पशु-पक्षी सृष्टीचा विचार करीत आहोत. आधुनिक काळात जगभरातील प्रणिशास्त्राचे अभ्यासक, वैविध्याने नटलेल्या पशुपक्षी सृष्टीचा, अनेकविध अंगांनी अभ्यास करून, त्यांचे चित्रीकरण करून, त्यांवर आधारित अशा उत्कृष्ट वैज्ञानिक ग्रंथांची निर्मिती करत आहेत.
आश्चर्याची गोष्ट अशी की, प्रज्ञापना, जीवाभिगम यांसारख्या अर्धमागधी ग्रंथात आणि त्रिलोकप्रज्ञप्ति, गोम्मटसार (जीवकांड) सारख्या शौरसेनी ग्रंथात, प्राणिसृष्टीविषयीचे मौलिक विचार नोंदविलेले दिसतात. बियांच्या देखील गति, जाति, इंद्रिये, शरीर, लिंग, पर्याप्ति, प्राण, कषाय, लेश्या, ज्ञान, आयुष्य इ. विविध अंगांनी विचार केला आहे. मुख्य म्हणजे कर्मसिद्धांतही त्यांच्याबाबत उपयोजित करून दाखविलेला आहे. केवळ सिद्धांतग्रंथातच नव्हे तर कथाग्रंथातही त्याची उदाहरणे सापडतात. ६० जैन ग्रंथातील हे मार्गदर्शन, प्राणिशास्त्राच्या आधुनिक अभ्यासाला पूरक ठरू शकेल असे वाटते. हिंदू ग्रंथांतून अशा प्रकारचे मार्गदर्शन अतिशय अल्प आढळते.
* मुक्त जीवांचे अस्तित्व
चार्वाक सोडून प्राय: सर्व भारतीय दार्शनिकांनी अथवा विचारवंतांनी मोक्ष संकल्पना मांडली आहे. मोक्षानंतर मुक्त जीवांचे अस्तित्व, स्वतंत्र स्वतंत्र स्वरूपात कायम राहते, हा सिद्धांत मात्र केवळ जैनांचाच आहे. अशा प्रकारे सिद्ध किंवा मुक्त जीवांची व्यवस्था, ब्राह्मण परंपरेत कुठेही लावलेली दिसत नाही. एकदा प्रत्येक जीवाची स्वतंत्र सत्ता अर्थात् अस्तित्व मानल्यानंतर, ती सत्ता नाहीशी करणे किंवा दुसऱ्यात विलीन करणे, जैन सिद्धांताला धरून नसल्याने मुक्त जीवांचे अशा प्रकारचे अस्तित्व मानले आहे.
* व्यक्तिमत्वांचे जैनीकरण
जैनांच्या समन्वयवादाचे एक बोलके उदाहरण म्हणजे त्यांनी राम, लक्ष्मण, रावण, हनुमान, कृष्ण, नारद, पांडव, जरासंध, सीता, अंजना, मंदोदरी, कैकेयी, द्रौपदी, रुक्मिणी या आणि अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या जैनीक्णाचे प्रयत्न आपल्याला पुराणकाव्य व चरितग्रंथातून केलेले दिसते. २४ तीर्थंकर वगळता, शलाकापुरुष, कामदेव इ. ची जैन परंपरेने तयार केलेली चौकट, बहुधा या सर्व अजैन व्यक्तिरेखांचे जैनीकरण करण्यासाठीच, योजलेली युक्ती असावी असे वाटते. जैनांनी या सर्व व्यक्तींना कितीही आपलेसे केले तरी जैनेतरच काय, जैनांच्या मनातही त्यंच्यावर असलेला हिंदुधर्माचा प्रभाव कायम आहे. म्हणून वाल्मीकि रामायण हे मुख्य प्रवाहातील रामायण ठरले आणि जैन रामायणे त्याच्या प्रतिकृती ठरल्या.
* वर्गीकरणाची सूक्ष्मता
कोणताही एखादा मुद्दा विचारार्थ घेतल्यानंतर जैन परंपरेत त्याचे विवेचन अनेक प्रकार, उपप्रकार सांगून, तार्किकतेच्या शेवटच्या टोकापर्यंत, अतिशय सूक्ष्मतेने केले जाते. विचारांचा कोणताही धागा अपूरा ठेवणे, ही जैनधर्माची प्रकृति नाही. कर्मसिद्धांत सांगायला लागल्यानंतर, कर्माचे आठ प्रकार म्हणजे मूल प्रकृति, त्या प्रत्काच्या उत्तर प्रकृति, घाति-अघाति कर्म, कर्म आणि गुणस्थान या आणि अशा अनेक प्रकारे कर्मसिद्धांत सांगितला आहे? इतकेच नव्हे तर याविषयीची एक स्वतंत्र कर्मसाहित्यविषयक शाखाच तयार झाली आहे. दुसरे उदाहरण जीवतत्त्वाच्या विचारासंबंधीचे घेता येईल. जीवांचे संसाराच्या दृष्टीने, हालचालीच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, इंद्रियांच्या दृष्टीने, गतीच्या दृष्टीने, शरीरांच्या प्रकारांच्या दृष्टीने, वेद अर्थात् लिंगांच्या दृष्टीने, योनि अर्थात् जन्मस्थानाच्या दृष्टीने वर्गीकरण आणि विवेचन केलेले दिसते. ६२
याउलट वैदिक परंपरेत वर वर्णन केलेली कर्मसिद्धांताची व जीवविचाराची संकल्पना, एवढ्या सूक्ष्मतेने स्पष्ट

Page Navigation
1 ... 20 21 22 23 24 25