Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi
View full book text
________________
वेगवेगळ्या गतीत जन्मलेले असतात. अशा परिस्थितीत कोणाला आपले पितर मानून श्राद्ध, तर्पण अथवा पिंड प्रदान करणार ? असा कळीचा मुद्दा आहे.
* पंचमहाभूते व पाच एकेंद्रिय जीव *
वैदिक मान्यतेनुसार पृथ्वी, अप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. ती जड अर्थात् निर्जीव आहेत.४८ तैत्तिरीय उपनिषदात त्यांचा एक विशिष्ट क्रम सांगितला आहे. तो असा - आत्मन: आकाश: संभूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अभ्यः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः ।४९
सांख्यदर्शनात प्रकृति, महत्, अहंकार, पंचतन्मात्रे व क्रमाक्रमाने पंचमहाभूते असा क्रम वर्णिला आहे.५०
जैन परंपरेला हा दृष्टिकोण सर्वथा अमान्य आहे. त्यांनी पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजस्कायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक यांना एकेंद्रिय जीव मानले आहे. पहिला फरक असा की हे जड नाहीत. दुसरा फरक असा की आकाश हे जड म्हणजे अजीव आहे. परंतु त्याची गणना षद्रव्यांमध्ये केली आहे.५१ वनस्पतिकायिकाला पृथ्वी इ. चारांच्या जोडीने एकेंद्रिय मानले आहे. शिवाय चैतन्यमय आत्म्यापासून, चेतनाहीन पंचमहाभूते निर्माण होण्याचा वैदिकांवर असलेला अतयं प्रसंग, जैनांनी टाळला आहे. पृथ्वी इ. ना एकेंद्रिय मानल्यामुळे, अहिंसा तत्त्वाला भक्कम आधार मिळाला आहे. त्यामुळे जैनधर्म पर्यावरण रक्षणालाही अनुकूल बनला आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी परमेश्वराचे अस्तित्व मानण्यापेक्षा, जैनांनी खरोखरीचे चैतन्यरूपच त्यांच्याठिकाणी कल्पिले आहे.
* पाण्याचा वापर *
स्नान, संध्या, पूजा, स्वच्छता, पाण्यात उभे राहून केलेली पुरश्चरणे हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. याउलट पाणी हे एकेंद्रिय जीव असल्याने, त्याचा अगदी गरजेपुरता, कमीत कमी वापर, हे जैन आचाराचे वैशिष्ट्य दिसते. त्यामुळे अर्थातच पाण्यात निर्माल्य अथवा अस्थींचे विसर्जन जैन आचाराच्या चौकटीत बसत नाही. 'पाण्याने शुद्धी मिळत असती तर सर्व जलचर जीव केव्हाच स्वर्गात पोहोचले असते', असे उपहासात्मक उद्गार, ‘सूत्रकृतांगा'सारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथातही आढळतात.५२
* विज्ञानानुकूलता *
प्राचीन जैन प्राकृत ग्रंथात, त्या काळाच्या मानाने कितीतरी प्रगत वैज्ञानिक धारणा आढळून येतात. उदा. षद्रव्यांमधील धर्म, अधर्म या द्रव्यांमध्ये अपेक्षित असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती ; एका परमाणूवर राहणारे चार गुण, त्यांचे उपप्रकार व त्यातून निष्पन्न होणारी मूलद्रव्यांची संख्या ; तिर्यंचगतीच्या विवेचनात अंतर्भूत असलेला वनस्पतिविचार, प्राणिविचार व पक्षीविचार ; ध्वनी अर्थात् शब्दाला आकाशाचा गुण न मानता पौद्गलिक मानणे - हे सर्व विचार वस्तुतः आजच्या विज्ञानालाही त्यामानाने कितीतरी अनुकूल आहेत. अभ्यासक हेही मान्य करतात की जैनांचा पुद्गल व स्कंध विचार कणादांच्या परमाणूवादापेक्षा अर्थात् वैशेषिकांच्या परमाणूवादापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे. हीच गोष्ट इतरही उदाहरणांबाबत सांगता येईल. प्रयोगशील विकासाची जोड या विचारांना न मिळायामुळे, प्रगत शास्त्रनिर्मितीची संभावना असूनही, जैन परंपरेत त्या त्या प्रकारची विज्ञाने निर्माण होऊ शकली नाहीत. याउलट आयुर्वेद, खगोल, भूगोल, ज्योतिष, गणित, परमाणुवाद, अर्थशास्त्र अशी शास्त्रे वैदिक परंपरेत तयार झाली व तत्कालीन शिक्षण पद्धतीत अंतर्भूतही झाली.
* पुरुषार्थविचार * ___प्राच्यविद्यांचे अभ्यासक साक्षेपाने नोंदवतात की, प्रवृत्तिपर वैदिक परंपरेत आरंभी धर्म, अर्थ व काम हे तीनच

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25