Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 21
________________ पुरुषार्थ होते. निवृत्तिवादी श्रमण परंपरांच्या प्रभावाने 'मोक्ष' हा चौथा पुरुषार्थ त्यात दाखल झाला. ५३ वैदिकांनी या चारही पुरुषार्थासंबंधी विपुल लेखन केले. धर्मशास्त्रे व मोक्षशास्त्रे तर निर्माण केलीच पण कामशास्त्रे व अर्थशास्त्री निर्माण केली. याउलट जैन परंपरेत 'मोक्ष' या पुरुषार्थाचेच सदैव प्राधान्य राहिले. अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थांसंबंधी फारसा गंभीर विचार झालाच नाही. * योग शब्दाचा विशेष अर्थ पातजंलयोगदर्शनाचा 'योग' म्हणजे 'चित्तवृत्तिनिरोध'. ५४ ' यमनियमादि आठ अंगांनाही' तेथे 'योग' म्हटले आहे.५५ भगवद्गीतेत योग शब्द वेगवेगळ्या अर्थांनी येतो. 'समत्वं योग उच्यते ' ५६, 'योग: कर्मसु कौशलम्' ५७ ही वचने तर सुप्रसिद्ध आहेत. त्याखेरीज भगवद्गीतेत अध्यायाच्या प्रत्येक नावालाही 'योग' शब्द लावला आहे. ५८ जैन परंपरेनेही आ. हरिभद्रकृत योगबिंदु, योगशतक इ. ग्रंथांच्या शीर्षकामध्ये वैदिक परंपरेतील हाच अर्थ दिसून येतो. पण याखेरीज मन-वचन-कायेच्या सर्व हालचाली म्हणजे कर्मे म्हणजे 'योग' होय. ५१ ह्या व्याख्येतून 'युज्' धातूशी जुळणाऱ्या, योग शब्दाच्या वेगळ्याच अर्थावर प्रकाश टाकला आहे. मन-वचन-कायेच्या हालचाली या अर्थाने योग शब्द वापरून, तीन योगांनी व तीन करणांनी अर्थात् 'तिविहं तिविहेणं' ही पदावली जैन तत्त्वज्ञानात व आचारातही अतिशय रूळली आहे. वैदिक परंपरेत रूढ असलेल्या अनेक शब्दांना जैन परंपरा वेगळेच पारिभाषिक अर्थ प्राप्त करून देते. त्यापैकी योग ही एक विशेष संकल्पना आहे. * 'सती' शब्दाचा विशेष अर्थ * हिंदू पौराणिक परंपरेत 'पतिव्रता' ह्या अर्थाने वापरण्यात येणारा सती हा शब्द, मध्ययुगीन काळात पतीच्या चितेवर आरूढ होणाऱ्या, पतिव्रता स्त्रीसाठी वापरण्यात येऊ लागला. गेल्या दोन-तीन शतकात तरी, हिंदू परंपरेत तो याच अर्थाने रूढ झालेला दिसतो. 'राजा राममोहन रॉय' आदि सुधारकांनी, या अनिष्ट रूढीबद्दल खूप आवाज उठवला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात, या अनिष्ट रूढीला उत्तेजन देणाऱ्यांविरूद्ध कडक कायदा केलेला दिसतो. जैन परंपरेत काळाच्या कोणत्याच टप्प्यावर, अशा प्रकारच्या सती प्रथेला स्थान नाही. आदरणीय साध्वींना जैन परंपरा, सती अगर महासती संबोधते. अशा प्रख्यात सोळा महासतींचा गौरव, जैन परंपरेने आदरपूर्वक केला आहे. * संस्कृत आणि लोकभाषा * वेदांपासून आरंभ करून पुराणांपर्यंत वैदिक, ब्राह्मण अथवा हिंदू परंपरेत नेहमीच संस्कृतला अग्रस्थान मिळत राहिले. मराठी साहित्याबाबत बोलायचे झाले तर सुमारे दहाव्या-अकराव्या शतकापासून मुकुंदराज महानुभाव पंथ आणि नंतर बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी समकालीन धार्मिक रचनांना आरंभ केला. जैन परंपरेत मात्र लोकभाषेत धर्मोपदेश करण्याचा प्रघात आरंभापासूनच होता. केवळ महावीरांनीच नव्हे तर आधीच्या सर्व तीर्थंकरांनी सुद्धा, लोकभाषेतून उपदेश केला असावा. म्हणूनच जैनांचे इसवी सनापूर्वीचे आगम किंवा आम्नायग्रंथही, अर्धमागधी व शौरसेनी या लोकभाषातून लिहलेले दिसतात. म्हणजेच धार्मिक वाड्.मय लोकभाषेत असावे, ही संकल्पना जैन परंपरेत, हिंदू परंपरेपेक्षा १००० वर्षांनी जुनी दिसते. अर्थात् आम समाजाच्या मनोरंजनाचे साधन असलेली संस्कृत नाटके व काव्य यांच्यासाठी, हिंदू परंपरेनेही प्राकृत अर्थात् लोकभाषांचा वापर केलेला दिसतो.

Loading...

Page Navigation
1 ... 19 20 21 22 23 24 25