Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune
View full book text
________________
प्रत्याख्यान - प्रति + आ + ख्यान = निश्चितपणे त्याविषयी सांगणे. अर्थात् प्रत्याख्यान म्हणजे विरती, त्याग, प्रतिज्ञा, संकल्प.
प्रत्याख्यान ही अतिशय प्राचीन परंपरा आहे. १३ क्रियास्थानांच्या पलीकडे जाऊन ही क्रिया आहे. प्रत्याख्यान हे आत्म्याशी निगडित आहे. तसेच ते कर्मसिद्धांत व पुनर्जन्माशीही निगडित आहे. त्यामुळे विवेकपूर्वक सावक्रीयांचा त्याग करावा. पाप हे नेहमी आपल्या मर्जीने होत असते आणि त्याला चालना देत राहिलो तर विनाशतेतच त्याचे परिणाम होतात. म्हणून प्रत्याख्यान हे १८ पापस्थानांचे करायचे, विशेषतः कषायांचे करायचे.
भूतकालीन जीवनाचे प्रामाणिकपणाने निरीक्षण करून जो काही पापरूपी कचरा आत पडला आहे, त्याचा सद्गुरू, अंतरात्म्याच्या साक्षीने पश्चात्ताप करावा (प्रतिक्रमणाद्वारे) व भविष्यात पुन्हा या दुष्प्रवृत्तीमुळे होणाऱ्या पापबंधापासून मुक्त होण्यासाठी संकल्प करावा.
संसारात आहोत तोपर्यंत राग, द्वेषरूपी कषाय हे (कर्माच्या उदयामुळे) राहणारच. पण त्याची तीव्रता, उग्रता राहता कामा नये. हीच सावधानता, जागरूकता यायला हवी.
मनात सतत केलेल्या पापाचे स्मरण ही ग्लानीला जन्म देते आणि हीच ग्लानी हीन भावना निर्माण करते. या पापामुळे परलोक व इहलोक दोन्हीकडे निंदानालस्ती, दुःख भोगावे लागते. दुर्विचार, कुसंस्कार यापासून दूर रहाण्याकरिता प्रत्याख्यान' ही एक आध्यात्मिक साधना आहे. याने आत्मा हलका (भारहीन) होतो, शुद्ध होतो. म्हणून पापाचे, परिग्रहाचे, गुप्तीचे, समितीचे, परिषहाचे प्रत्याख्यान घेणे याला जैन साधनेत खूप महत्त्व आहे.
या पंचम काळात मोठमोठे व्रत घेऊ शकत नाही, पण छोटे मोठे खानपानविषयक नियम तसेच इतरही नियम जसे, 'आज रागवायचे नाही', 'कोणाचीही निंदा करायची नाही', 'मौन धारण करायचे', 'एकेंद्रिय हिंसा टाळता येणार नाही पण संकल्पपूर्वक त्रसहिंसा करायची नाही'. यथाशक्ती अशा नियमाने त्या प्रत्याख्यानाचे ओझे वाटणार नाही. पण प्रत्याख्यान घेतलेच नाही तर कर्मबंधही चुकणार नाहीत.
प्रत्याख्यानाला प्रयत्नपूर्वक आणि तीव्र आत्मशक्तीची जोड लागते. विचार करणाऱ्या मनुष्य योनीतच ही सर्व क्षमता आहे. प्रत्याख्यान हे चेतनच घेऊ शकतात, अजीव ते घेऊ शकत नाहीत. पंचेंद्रिय मनुष्य इच्छा असल्यास बऱ्याच प्रमाणात आणि पंचेंद्रिय तिर्यंच हे अल्प प्रमाणात प्रत्याख्यान घेऊ शकतात. क्षेत्राच्या प्रभावामुळे नारकी व देवगतीतले जीव प्रत्याख्यान घेऊ शकत नाहीत.
उपसंहार :
* जैन धर्मात सर्वात महत्त्वाचा सिद्धांत. महावीरांनी प्रत्याख्यान व प्रतिक्रमणाला नित्य आचारात स्थान दिले आहे.
* आहाराच्या मर्यादा घ्या, असा संकेत मिळाला नसून १८ पापस्थाने व कषाय यांची जाणीव करून दिली आहे.
* सर्व साधुआचार प्रत्याख्यानाशी जोडलेला आहे. * शुभसंकल्प हेच प्रत्याख्यानाचे सार होय. * प्रत्याख्यान हे फक्त आहाराचेच नसून भावशुद्धीला महत्त्व आहे. * सुखासमाधानात असलेल्या व्यक्तीने, 'कुठे थांबायचे' हे ठरवावे आणि हेच प्रत्याख्यान शिकविते.
* आपल्यात असलेली प्रमादता, अविवेकता नष्ट करणे आणि जागरूकता निर्माण करणे हाच प्रत्याख्यान घेण्यामागील हेतू होय.
* प्रत्याख्यान घेणे, संयम पाळणे हे मोक्षप्राप्तीचे साधन होय.
* ही १८ पापस्थाने असली तरी त्या अंत:प्रवृत्ती आहेत. मानवी स्वभावात दडलेल्या भावभावना आहेत. त्या नाकारून चालत नाहीत. त्यांचा नाश करता येत नाही. त्या योग्य, उचित, संयत ठेवाव्यात. या भावनांना थोडीही उत्तेजना दिली. थारा दिला तर तो प्रत्याख्यानाचा भंग होईल.