Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 61
________________ कार्यक्रमातून मिळते. यातून संयमभावना जागृत होते. ७) दान देणे हे जैनांचे वैशिष्ट्य आहे. या काळात तर ती भावना प्रबळ होते. या दानाच्या प्रक्रियेमुळे अहंकारकमी होतो. नम्रता येते. आजकाल तर बरेच जण गुप्तदानाला प्राधान्य देऊ लागले आहेत. चातुर्मासाच्या चार महिन्याच्या काळात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांकरिता सकाळ-संध्याकाळ अन्नदान चालू असते. समाजातील दानशूर व्यक्ती हा खर्च उचलतात. सर्वांना धर्मध्यानात पूर्ण वेळ देता यावा याकरिता पर्युषणकाळात तर सकाळ-संध्याकाळ सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली असते. ८) पर्युषण पर्वामध्ये अंतगडसूत्र व कल्पसूत्र यांचे वाचन होते. अंतगडसूत्रात श्रीकृष्णाची तसेच अर्जुनमाळी, गजसुकुमाल व अतिमुक्तकुमार यांच्या कथा दिलेल्या आहेत. यातून एक वेगळाच संदेश मिळतो. तो असा की, 'घृणा पापाची करा. पाप करण्याची करू नका. कारण पाप करणारा माणूस, जाणीव झाल्यानंतर, अंतर्बाह्य बदलू शकतो. आचरण सुधारून व कर्मनिर्जरा करून मोक्षाप्रत जाऊ शकतो. त्यामुळे त्यांची घृणा करू नका.' अंतगडसूत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात स्त्री-दीक्षा मोठ्या प्रमाणात दाखविल्या आहेत. या दीक्षा घेणाऱ्या स्त्रियांमध्ये, राण्यांपासून ते गरीब गृहिणीपर्यंत, सर्व थरातील स्त्रिया आहेत. ___कल्पसूत्रात महावीरांचे संपूर्ण चरित्र दिले आहे. तसेच ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ आदि तीर्थंकरांची माहितीही दिली आहे. कल्पसूत्र हा आगम ग्रंथ आचार व तप यांना प्राधान्य देणारा आहे. तसेच कल्पवृक्षाप्रमाणे ऋद्धिसिद्धी, बुद्धी व सुखशांती प्रदान करणारा आहे. देवदेवतांच्या सहाय्याशिवाय, पुरुषार्थ करून, मोक्षप्राप्ती व कर्ममुक्ती प्राप्त करता येते हे कल्पसूत्र शिकविते. ९) श्वेतांबर जैनांचे आगमग्रंथ हे श्रीकृष्णाच्या जीवनाला, त्याच्या परिवाराला प्राधान्य देणारे आहेत असे दिसते. अंतगडसूत्रात श्रीकृष्णाचे वर्णन आढळते. (जैनांचे २२ वे तीर्थंकर अरिष्टनेमी हे श्रीकृष्णाचे चुलत बंधू होत.) अंतगडसूत्रात श्रीकृष्णाने सामाजिक एकतेचा व समरसतेचा संदेश एका विटेच्या प्रसंगावरून दिला आहे. एकदा श्रीकृष्ण आपल्या परिवारासह व सैन्यासह तीर्थंकरांच्या दर्शनाला चालला असताना, वाटेत एक वृद्ध आपल्या घराकरिता, एक एक वीट वाहताना दिसला. दया येऊन श्रीकृष्णाने विटांच्या ढिगाऱ्यातून एक वीट उचलून त्याच्या घरी नेऊन ठेवली. सर्व सैन्याने त्याचे अनुकरण केले व वृद्धाचा वीट वाहण्याचा त्रास वाचविला. १०) पर्युषण काळात काही श्रावक-श्राविकाही स्वाध्यायी बनून आपले योगदान देतात. जेथे साधु-साध्वी नसतात, त्या गावात हे स्वाध्यायी जातात. आठ दिवस धर्मस्थानात राहून गावातील लोकांबरोबर प्रार्थना, सूत्रवाचन, प्रतिक्रमण हे उत्साहात करतात. गावाला साधु-साध्वींची अनुपस्थिती जाणवू देत नाहीत. अशा स्वाध्यायींकडे, लोक आपल्या धार्मिक शंकांचेही निरसन करून घेतात. जैन धर्म टिकून राहण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. ११) स्वाध्यायींमुळे म्हणा अथवा गावात चालणाऱ्या पाठशाळेमुळे म्हणा, लहान वयात भक्तामरासारखी काही स्तोत्रे कंठस्थ केली जातात. त्याचा फायदा वृद्धापकाळात होतो. इंद्रिये जेव्हा क्षीण होतात, वाचन शक्य होत नाही तेव्हा कंठस्थ स्तोत्रे हा धर्मस्मरणाचा मुख्य आधार ठरतात. १२) पर्युषण-काळातल्या आठ दिवसातील शेवटचा दिवस 'संवत्सरी' म्हणून ओळखला जातो. कळत-नकळत आपण रोजच्या जीवनात चुका करीत असतो. दुसऱ्यांना हानी पोहोचवीत असतो. त्यांना दुखवीत असतो. या दिवश वर्षभरात सर्व जीवांप्रती अशाप्रकारे केलेल्या चुकांबद्दल, मनापासून क्षमायाचना केली जाते. यालाच 'आलोयणा' असे म्हणतात. आलोयणा वाचताना आपण कोणकोणत्या प्रकारे चुका करीत होतो याची जाणीव होते व भविष्यकाळात त्या कमी करण्यास मदत होते. या दिवसाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गत वर्षात काया, वाचा, मनाने कोणाचे मन दुखावले असेल तर त्याची लहानथोर सर्वजण एकमेकांकडे क्षमायाचना करतात. अहंभाव, शत्रुत्व विसरून क्षमायाचना करतात. हा सर्वश्रेष्ठ संस्कार फक्त जैन धर्मियांमध्येच दिसतो.

Loading...

Page Navigation
1 ... 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72