Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune
View full book text
________________
पहात आहेत. काहीजण हळहळत आहेत, तर काहीजण मारणाऱ्यास अडवीत आहेत. आता प्रत्यक्ष मारणाऱ्यास म्हणजे द्रव्यहिंसा करणाऱ्याला वेगळा पापबंध तर ते बघून मनात उसळणाऱ्या भावनांप्रमाणे त्या त्या व्यक्तींना वेगवेगळा तीव्र-मंद पापबंध होतो.
(६) स्थूल हिंसेचे रूढ चार प्रकार केलेले आहेत. (अ) संकल्पी हिंसा म्हणजे ठरवून केलेला घात. कोणत्याही निरपराध प्राण्याची जाणूनबुजून केलेली हिंसा ‘संकल्पी हिंसा' आहे. ही गृहस्थासाठी सर्वथा त्याज्य मानली आहे. (ब) घर-दुकान-भोजन, या जीवन जगण्याच्या अनिवार्य आणि अपरिहार्य गोष्टी आहेत. शेती करून धान्य पिकविणे, स्वयंपाक-स्वच्छता करणे, घर बांधणे इ. क्रिया करताना त्या जीवांविषयी करुणाभाव ठेवून अणि खबरदारी घेऊन झालेली हिंसा आरंभी हिंसा' आहे. (क) उद्योग-व्यवसायासाठी आणि अर्थार्जनासाठी केलेली हिंसा उद्योगी हिंसा' होय. तीही अनिवार्यपणे होतेच.(ड) आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी केलेली हिंसा ही विरोधी हिंसा' आहे. यासाठी श्रेणिकमहाराजा आणि भगवान महावीर यांचा संवाद अतिशय बोलका आहे. श्रेणिकमहाराज परराष्ट्रधोरणासंबंधी प्रश्न विचारतात तेव्हा महावीर म्हणतात की, “राज्यविस्तारासाठी केलेले युद्ध ही 'हिंसा' आहे पण आपल्या राज्याच्या आणि प्रजेच्या संरक्षणासाठी केलेले युद्ध हे अन्यायाच्या प्रतिकारासाठी केलेली हिंसा' आहे. ती क्षम्य आहे."
जैन शास्त्रांमध्ये विरोधी हिंसेचे उदाहरण म्हणून प्रभावक-आचार्य ‘कालका'चे उदाहरण देतात. गर्दभिल्ल राजाने आपल्या साध्वी झालेल्या बहिणीला अंत:पुरात कोंडून ठेवलेले समजताच, तिच्या रक्षणासाठी स्वत: कालकाचार्य साधुवस्त्रे काढून ठेवतात. इतर राजांच्या मदतीने गर्दभिल्ल राजाबरोबर युद्ध करतात, बहिणीला सोलून आणतात. प्रायश्चित्त घेऊन पुन्हा साधुधर्मात स्थित होतात.
(७) गृहस्थांसाठी बारा अणुव्रते सांगितली आहेत. त्यातील एक आहे, 'अनर्थदण्डविरति'. अर्थात् विनाकारण निरर्थक हालचालींचा त्याग. 'प्रमादचर्या' या नावाने जैन शास्त्रात प्रसिद्ध असलेले हे नियम नागरिकशास्त्राचा उत्तम नमुना' आहे.
(अ) पापोपदेश न देणे - दुसऱ्याला पापाचा उपदेश न करणे, दारू-जुगार इत्यादि व्यसनांच्या नादी लागणे व इतरांना लावणे, अफवा पसरविण्यात सहभाग घेणे, काहीतरी गैरकाम किंवा गुन्हा करविण्यासाठी उकसविणे - हाही अनर्थदण्ड होय. (ब) हिंसेची उपकरणे न बनविणे, ती एकमेकांना न देणे, चाकू-सुरी-ब्लेड इत्यादि जी-जी म्हणून हिंसेची उपकरणे समजली जातात ती जैन परंपरेत भेटवस्तू म्हणून दिली जात नाहीत. (क) विनाकारण 'चाळा' म्हणून केलेल्या क्रिया, या स्वत:चे प्रयोजन तर साधत नाहीतच आणि इतरांना मात्र उपद्रव होतो. यासाठी शेकडो उदाहरणे देता येतील. जसे - बसल्याबसल्या पाय जोरजोराने हलविणे, अनावश्यक हातवारे करणे, झाडाखालून जात असताना फांदी उगाचच उखडणे, उगीचच फुले-पाने कुस्करणे, विनाकारण जमीन उकरणे, हिरवळ उपटणे, काठी हातात घेऊन दिसेल त्या वस्तूवर मारत जाणे, आळसाने किंवा बेफिकिरीने कचरा खिडकतन भिरकाविणे, कचऱ्याचे पाण्यात विसर्जन करणे, इत्यादि.
जैन परंपरेत कचऱ्याचे पाण्यात विसर्जन करायला मनाई आहे. स्थंडिल भूमीवर विसर्जन करावयास सांगितले आहे. याला जैनशास्त्राप्रमाणे परिष्ठापनिकी समिति' असे संबोधण्यात येते.
रोजच्या जीवनव्यवहारासाठी केलेली हिंसा असो वा आध्यात्मिक, वैयक्तिक असो वा सामूहिक, स्थूल हिंसा असो वा सूक्ष्म, साधूने केलेली हिंसा असो वा श्रावकाने, अनिवार्यपणे करावी लागणारी हिंसा असो वा निरर्थक - हिंसा हे 'पाप'च आहे. पाप हे 'कर्म' आहे. प्रत्येक कर्माचा बंध आपल्याबरोबर म्हणजे प्रत्येक जीवाबरोबर होणार आहे. ज्या प्रकारचे कर्म आपण बांधले, ते किती काळ जीवाबरोबर राहणार ती कालमर्यादा ही त्या कर्माची स्थिती' आहे. कर्मे बांधताना ती किती तीव्रतेने अगर मंदतेने बांधली याला 'विपाक' म्हणतात. त्या कर्माचा 'उदय' झाला की त्याचे फळ मिळतेच, हा जैनांचा कर्मसिद्धांत आहे.
(८) भ. महावीरांनी आपल्या उपदेशाच्या माध्यमातून, सूत्रकृतांगात क्रियास्थानांच्या वर्णनात, समाजातील