Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 58
________________ अशी जैन मान्यता आहे की परदेशी जाण्यापूर्वी गांधीजींना त्यांच्या आईने जैन साधूंकडे नेले होते. त्यांनापाच अणुव्रतांची दीक्षा दिली होती. पण अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही सार्वकालीन धर्मनिरपेक्ष तत्त्वे आहेत, हे जैन सहजी मान्य करीत नाहीत. पूर्ण गांधीवादी असलेल्या सुखलालजींनी आपल्या लेखात मांडले आहे की, गांधीजींना समकालीन जैनधर्माची काय स्थिती होती ? - स्त्री - उद्धार सांगत असताना स्त्रियांना धर्मक्षेत्रातसुद्धा 'अबला' मानून व्यवहार केला जात होता. यज्ञीय हिंसेपासून ते वाचले पण उच्चनीचता, स्पृश्यास्पृश्यता न मानणारा जैनधर्म जातिवादी ब्राह्मण परंपरेच्या प्रभावाखाली आला होता. जैन समाजातील संप्रदायफूट विशेषत्वाने उठून दिसत होती. जैनधर्म म्हणजे त्याग, निवृत्ती असा सतत मोक्षकेंद्री उपदेश साधुवर्ग करत होता. निवृत्तीच्या नावावर निष्क्रियता जैनांमध्ये वाढली होती. सत्यअहिंसा आणि अपरिग्रहाचे शुद्ध पालन आणि परिवर्तन यासंबंधी, साधुवर्ग गृहस्थांकडे आणि गृहस्थ साधुवर्गाकडे बोट दाखवत राहिले. समकालीन जैनधर्मात निवृत्तीचे प्राबल्य मात्र अधिकच वाढलेले दिसत होते. आता अहिंसा, सत्य, अपरिग्रह, स्त्री- समानता, स्त्री-शक्ती, शाकाहार, रात्रिभोजनत्याग, जातिव्यवस्था, स्पृश्यास्पृश्यतेला विरोध, उपवास, पौषध, अठाई-आयंबिल - अनशनाचे महत्त्व, दान ही जी जैन तत्त्वे होती, ती कौशल्याने गांधीजींनी सामाजिक क्षेत्रात वळविली. अनेकान्तवादी असलेल्या जैनांमध्ये - 'ब्रह्मा वा विष्णुर्वा हरो जिनो वा नमस्तमै ।' असे म्हणून किंवा 'राम कहो रहिमान कहो', म्हणत गांधीजींनी जणू प्राण फुंकले. अध्यात्मक्षेत्रात जाऊन बसलेली तत्त्वे स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयाशी जोडली. राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली येऊन एकजूट प्रस्थापित केली. आपलीच तत्त्वे घेऊन हा महात्मा राष्ट्रीय समाजजीवनात प्रयोग करतो आहे, हे बघून जैनांमध्येच नव्याने चेतना जागृत झाली. * सर्व आंदोलने अहिंसक मार्गाने केली. अहिंसा हीच शस्त्रासारखी वापरली. अहिंसेला एक शास्त्र बनविले. * 'माझे सत्याचे प्रयोग' हा ग्रंथ लिहून व्यापक राष्ट्रहितासाठी 'सत्याग्रहा'चा उपयोग केला. * 'अपरिग्रहा'ला गांधीजींनी, ट्रस्टीशिप (विश्वस्त) सारख्या सिद्धांतात रूपांतरित केले. * जैन समाजातील विधवा, परित्यक्ता, लाचार कुमारी, स्त्रिया मंदिरात, स्थानकात जाऊन जपमाळ घेऊन बसत होत्या किंवा दीक्षा घेत होत्या. त्यांच्यासाठी एकमेव मुक्तिमार्ग 'साध्वी बनणे' हाच होता. पण गांधीजींच्या स्त्रियांच्या सबलत्वाच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक जैन स्त्रियांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या सक्रिय लढ्यात भाग घेतला. निराश झालेल्या अनेक जैन स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. * जैनांच्या शाकाहार आणि रात्रिभोजनत्यागाचा एकंदरीतच संपूर्ण गुजरातवर प्रभाव पडला. गांधीजींनी शाकाहार आणि रात्रिभोजनत्यागाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले. याचा प्रभाव स्वातंत्र्यसेनानींवरही पडला. * ‘सर्वजीवसमानता' हा जैनांचा प्राण आहे. मात्र जिनसेन आचार्यांच्या आदिपुराणाने स्पृश्यास्पृश्यता जैनधर्मात नकळत शिरली होती. गांधीजींनी अस्पृश्यतेविरूद्ध प्रत्यक्ष आंदोलन उभे केले. स्पृश्य-अस्पृश्य भेद समाजातून मिटविला. * उपवास-अनशन-आयंबिल ही तपे धार्मिक-आध्यात्मिक आत्मोन्नतीसाठी आतापर्यंत जैन समाजात केली जात होती. आता ती प्रत्यक्ष सत्याग्रह आंदोलनातील अनिवार्य भाग ठरली. ' आमरण उपोषण' हे शस्त्रासारखे वापरले. जैन लोक उपवास करण्यात इतके तरबेज आहेत की १ दिवस उपवास, १५ दिवस उपवास, १ महिना उपवास ते सहजतेने गरम पाणी पिऊन करतात आणि या उपवासाने आत्म्याची उन्नती होते, कर्मनिर्जरा होते अशी त्यांची धारणा आहे. पण हेच उपवास राष्ट्रासाठी करता येतील, हा प्रयोग करून जणू गांधीजींनी उपवासातच प्राण फुंकले. * जैनधर्मात दानाला नुसते सामाजिक परिमाण म्हणून स्थान नाही तर त्याला सैद्धांतिक आधार आहे. राष्ट्राप्रीत्यर्थ उद्योगपतींनी संपत्ती अर्पण केली. उद्योगपती आपल्या उद्योग-व्यवसायातून राष्ट्रासाठी नफ्याचा भाग अर्पण करू लागले.

Loading...

Page Navigation
1 ... 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72