________________
त्रिमंत्र
प्रश्नकर्ता : ते म्हणण्याने हळूहळू आत्म्याची शुद्धी होते का ?
दादाश्री : पण आम्हाला आत्म्याची शुद्धी करायची नाही. आत्मा तर शुद्धच आहे. नवकार मंत्र तर चांगल्या माणसांना नमस्कार केल्याने, दर्शन केल्याने तुम्हाला उच्च पातळीवर नेतो. परंतु समजून बोललात तर! म्हणून नवकार मंत्राचा अर्थ समजून घ्यावा लागेल. हे तर पोपट राम राम बोलतो, म्हणून काय तो रामाला समजू शकेल ? पोपट 'राम राम' नाही का बोलत ? अशा प्रकारे हे लोक नवकार मंत्र बोलतात. त्याचा काय अर्थ? नवकार मंत्र तर ज्ञानी पुरुषांकडून समजून घेतला पाहिजे.
कोणत्या समजूतीने नवकाराची भजना करावी ?
नवकार मंत्र काय आहे, त्यास समजणारे किती असतील ? नाहीतर हा नवकार मंत्र तर असा मंत्र आहे की एकच वेळा नवकार मंत्र म्हटला तरी त्याचे फळ येणाऱ्या कितीतरी दिवसांपर्यंत मिळत राहते. म्हणजे ज्यापासून रक्षण मिळते, असे नवकार मंत्राचे फळ आहे, परंतु कोणीही एकदा सुद्धा नवकार मंत्र खऱ्या रुपात समजून म्हटला नाही. हे तर जाप जपत राहतात, परंतु खरा जप कोणी जपलाच नाही ना!
40
शिवाय नवकार मंत्र तर तुम्हास म्हणता तरी कुठे येतो? असेच आपले बोलत राहता. नवकार मंत्र बोलणाऱ्याला चिंता ग्रासत नाही. नवकार मंत्र इतका सुंदर आहे की, फक्त चिंताच नाही, परंतु होणारा क्लेश सुद्धा निघून जातो त्याच्या घरातून. पण बोलताच येत नाही ना ! जर बोलता आले असते तर असे झाले नसते.
कोणी पण नवकार मंत्र दिला आणि आम्ही बोलू लागलो त्याला अर्थ नाही.
प्रश्नकर्ता : ते तर आम्ही आपणाकडून घेणार.
दादाश्री : लायसन्सवाले दुकान असेल आणि तेथून घेतला असेल तर चालेल, जर बिन लायसन्सवाल्याकडून घेतला तर काय होईल ?