Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 5
________________ मनोगत सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाची स्थापना १७ जुलै १९७६ रोजी झाली. अध्यासनाच्या मूळ उद्दिष्टात नोंदवल्याप्रमाणे, 'जैनविद्येच्या विविध शाखांमध्ये मूलगामी संशोधन' हे उद्दिष्ट जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विविध व्याख्याने, पुस्तिका, चर्चासत्रे, स्पर्धा इत्यादींच्याद्वारे 'जैनविद्येविषयी लोकजागृति'-हे उद्दिष्टही महत्त्वाचे आहे. २ जुलै २००७ रोजी माझी मानद नियुक्ती, 'जैन अध्यासन प्राध्यापिका' म्हणून पुणे विद्यापीठातर्फे करण्यात आली. २००७ ते २०१० या कालखंडात अध्यासनाच्या अंतर्गत झालेले संशोधनकार्य प्रकाशित केले आणि देशीपरदेशी अभ्यासकांना यथाशक्ती वितरितही केले. _ 'जैनविद्येचे विविध आयाम' या पुस्तकाद्वारे अध्यासनाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या उद्दिष्टाच्या पूर्तीचा आनंद अनुभवीत आहे. भांडारकर-प्राच्य-विद्या-मंदिर आणि सन्मति-तीर्थ या संस्थांशी विशेष निगडित असल्याने जैन समाजाशी आणि विशेषत: जैन महिलावर्गाशी माझा संपर्क गेल्या २५ वर्षांपासून राहिला आहे. पर्युषणपर्व आणि महावीरजयंती या दोन विशेष प्रसंगी स्थानकात, मंदिरात, स्वाध्यायी शिबिरात, सामाजिक संस्थांत, मासिक पत्रिकंस, वृत्तपत्रांत आणि आकाशवाणीवर अनेक भाषणे, व्याख्याने, लेख, चर्चासत्रे घडून आली. जैन अध्यासनाच्या द्वारे व्याख्यान-मालिका आणि ‘फाउंडेशन कोर्सेस' घेतले. विशेष खबरदारी अशी घेतली की जैनविद्येची विविध अंगे त्यातून लोकांसमोर यावीत. महाराष्ट्रातल्या जैन समाजाने व्याख्याने आणि लेखमालांना उदंड प्रतिसाद दिला. स्फुट-चिंतनाचा हा रंगीबेरंगी पुष्पगुच्छ त्यातुनच तयार झाला. या पुस्तकात एकूण २१ लेखांचा समावेश आठ विभागात करून दिला आहे. जैनविद्येचा विचार येथे मुख्यतः तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, समाज आणि तौलनिक चिंतनाच्या द्वारे मांडला आहे. लोकप्रिय पद्धतीचे लेखन असल्याने अर्थातच संदर्भक्रमांक, ग्रंथसूची, क्लिष्ट पारिभाषिक संकल्पनांचा वापर हेतुपूर्वक टाळला आहे. परंतु यातील चिंतन मूलगामी आधारांना सोडून असणार नाही याची काळजी घेतली आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की जैनविद्येची कितीतरी अंगे अगर आयाम या पुस्तिकेत समाविष्ट नाहीत. जैन मंदिरे व शिल्पे, शिलालेख, हस्तलिखिते, जैन न्याय, जैन पंथोपंथांचा इतिहास - ह्या आणि अशा अनेक आयामांनी जैनविद्येचे देशी-परदेशी अभ्यासक आजमितीस जैनविद्येच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य करीत आहेत. कालिदासाच्या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे हा प्रयत्न म्हणजे, 'छोट्या होडीने समुद्र तरून जाण्याचे साहस' करण्यासारखे आहे. तरीही आत्तापर्यंत लेख-व्याख्यानांना मिळालेल्या प्रतिसादावरून असे वाटते की जैन व जैनेतर जिज्ञासू वाचक या प्रयत्नाची नक्की दखल घेतील. वेगवेगळे विषय वेळोवेळी सुचवून चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या महाराष्ट्रातील जैन समाजाला मन:पूर्वक धन्यवाद जय जिनेंद्र नलिनी जोशी जैन अध्यासन-प्रमुख पुणे विद्यपीठ

Loading...

Page Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28