________________
(१०) जैन धार्मिक उत्सव आणि व्रते :
* आषाढ शुद्ध चतुर्दशीपासून (अथवा पौर्णिमेपासून) कार्तिक शुद्ध चतुर्दशीपर्यंतचा (अथवा पौर्णिमेपर्यंतचा) काळ पवित्र 'चातुर्मास्य काळ' समजला जातो. हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे सगळीकडे तृण, बीज, अंकुर इ. उगवलेल्या असतात. तसेच दमटपणामुळे जीवजंतूंचाही पुष्कळ प्रादुर्भाव होतो. जैनधर्मात अतिशय प्राचीन काळापासूनच या चार महिन्यात साधु-साध्वी विहार न करता एके ठिकाणी मुक्काम करतात. साधूंचे सान्निध्य लाभल्यामुळे श्रावकवर्ग त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक उत्सव साजरे करतात.
* चातुर्मास्यातील महत्त्वाचा पर्वकाळ म्हणजे 'पर्युषणपर्व' होय. श्वेतांबरीय समाज हे पर्व श्रावक कृष्ण द्वादशी (अथवा त्रयोदशी) पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी (अथवा पंचमी) पर्यंत साजरे करतो. दिगंबरीय समाज भाद्रपद शुद्ध पंचमी पासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे पर्व, 'दशलक्षणपर्व' या नावाने साजरे करतो. पर्युषणपर्वात सामान्यतः प्रवचन, तप, जप, स्वाध्याय, उपवास यांची प्रधानता असते. पर्युषणपर्वातील शेवटचा दिवस 'संवत्सरी' या नावाने साजरा केला जातो. स्थानकात अथवा मंदिरात या दिवशी जैन समाज बहुसंख्येने एकत्रित येऊन उपासना करताना दिसतो. संवत्सरीनंतरचा दुसरा दिवस 'क्षमापना ' 'म्हणून साजरा करतात. 'बोले चाले मिच्छामि दुक्कड' असे म्हणू क्षमा मागण्याचा प्रघात आहे.
* चैत्र शुद्ध त्रयोदशीला प्राय: सर्व जैन संप्रदाय - उपसंप्रदाय एकत्रित होऊन 'महावीर जयंती' साजरी करतात. कृष्णाष्टमीप्रमाणेच जन्म, पाळणा इ. विधी करून काही संप्रदायांनी याचे रूप उत्सवी केले आहे. या दिवशी प्रायः उपवास न करता गोडाधोडाचे जेवण करण्याचा प्रघात आहे.
* 'अक्षयतृतीये'चा दिवस हा जैन परंपरेप्रमाणे ऋषभदेवांच्या वर्षीतपाच्या पारण्याचा दिवस असतो. या दिवशी श्रेयांस राजाने ऋषभदेवांना उसाचा रस दिला म्हणून आजही साधर्मिक जैन एकमेकांना उसाचा रस देतात. वर्षीतप केलेले अनेक साधक या दिवशी आपल्या उपवासाचे पारणे करतात.
* दिगंबरीय लोक ज्येष्ठ शुद्ध पंचमीला 'श्रुतपंचमी'चे व्रत करतात. त्या दिवशी 'षट्खंडागम' या ग्रंथाची पूजा अर्थात् श्रुतपूजा व सरस्वती पूजा केली जाते. 'ज्ञानपंचमी' हे एक व्रत असून त्याचा आरंभ कार्तिक महिन्यातील शुद्ध पंचमीपासून करतात. दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला विधियुक्त उपवास करून हे व्रत पाच वर्षे, पाच महिने एवढ्या कालावधीसाठी करतात. त्यानंतर उद्यापनात ज्ञानोपकरणांचे दान केले जाते.
* कार्तिक कृष्ण अमावस्येला महावीरांचा निर्वाणोत्सव साजरा केला जातो. जैन दृष्टीने हीचदीपावली होय. या दीपावलीतील पहिल्या दिवशी महावीरांच्या निर्वाणानिमित्त शुभसूचक दीपप्रज्वलन केले जाते. दुसऱ्या दिवशी महावीर शिष्य गौतम गणधर यांच्या केवलज्ञान प्राप्तीच्या प्रीत्यर्थ पाडवा साजरा केला जातो. तिसऱ्या दिवशी महावीरांच्या बहीण आपले बंधू नंदीवर्धन यांच्या भेटीला येते, तो दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.
* याखेरीज अष्टाह्निकाउत्सव, सिद्धचक्र पूजन, नवपद ओळी (आयंबिल ओळी) इ. अनेक प्रकारची विधि-विधाने साजरी केली जातात. रत्नत्रय व्रत, पंचमेरु व्रत, सोळाकारण व्रत, भक्तामर व्रत, मौनएकादशी व्रत, सर्व तीर्थंकरांची पंचकल्याणके, अष्टमी-चतुर्दशी इ. महत्त्वपूर्ण तिथींना पौषध व्रत अशी अनेक प्रकारची व्रते करण्याची प्रथा आहे. त्या त्या प्रदेशामध्ये जैन समाजातील लोक इतरही स्थानिक व्रते करताना दिसतात.
(११) जैन धर्माची व्याप्ती :
पूर्वी म्हटल्याप्रमाणे वर्तमान कालचक्रात आदिनाथ ऋषभदेवांनी जैनधर्मास आरंभ केला. वेळोवेळी सर्व तीर्थंकरांनी त्या धर्माचे पुनरुज्जीवन केले. वर्तमान जैनधर्म हा चोविसावे तीर्थंकर भ. महावीरांची देणगी मानला जातो. बिहार, गुजरात आणि कर्नाटक ही प्राचीन काळापासूनच जैनधर्माची सुदृढ केंद्रे मानली जातात. सामान्यतः उत्तर भारतात श्वेतांबरीयांचे आणि दक्षिण भारतात दिगंबरीयांचे प्राबल्य असलेले दिसते. आचाराच्या काटेकोर नियमावलीमुळे इसवी सनाच्या १८ व्या शतकापूर्वी भारताबाहेर जैनधर्माचा प्रसार झाला नाही. १८-१९ व्या