Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 14
________________ अतिशय सूक्ष्म बनली. एकेंद्रियांच्या रक्षणाचा खूप विचार केल्याने पर्यायाने पर्यावरणरक्षणाचाही विचार अंतर्भूत झाला आहे. ___ (२) दुसरे महत्त्वाचे द्रव्य आहे पुद्गल अर्थात् जडद्रव्ये किंवा भौतिक द्रव्ये. पुद्गलांचे परमाणू असतात व स्कंधही असतात. प्रत्येक परमाणूवर रंग, चव, गंध आणि स्पर्श हे चार गुणधर्म रहातात. विश्वातील सर्व दृश्यमान (मूर्त) पदार्थ, जीवांची स्थूल आणि सूक्ष्म शरीरे पुद्गलांपासूनच बनलेली असतात. 'कर्मा'चे सुद्धा परमाणू असतात. ते अतिसूक्ष्म' असतात. ते जीवाला चिकटल्यामुळेच मुळात उर्ध्वगामी असलेला जीव 'जड' होतो. जैनांचे परमाणुविज्ञान वैशेषिकांपेक्षा वेगळे आणि अधिक मूलगामी आहे असे अभ्यासकांचे मत आहे. 'तत्त्वार्थाधिगमसूत्र' नावाच्या जैन दार्शनिक ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात जैनांचे परमाणु-विज्ञान सूत्रबद्ध करून मांडले आहे. (३)(४) तिसरे द्रव्य आहे 'धर्म' (धर्मास्तिकाय) आणि चौथे आहे 'अधर्म' (अधर्मास्तिकाय). येथे 'धर्म' आणि 'अधर्म' हे शब्द रूढ अर्थाने वापरलेले नाहीत. पारिभाषिक अर्थाने वापरलेले आहेत. धर्म हे द्रव्य गतिशील अशा जीव व पुद्गलांच्या गतीस सहाय्य करते. गती निर्माण करीत नाही परंतु गतीस मदत करते. पाणी जसे माशाला पोहोण्यास मदत करते तसे हे द्रव्य आहे. हे द्रव्य अमूर्त आहे. पूर्ण लोकाकाशात व्याप्त आहे. 'अधर्म' द्रव्य स्थिर राहणाऱ्या जीव व पुद्गलांच्या स्थितीस सहाय्य करते. स्वत:हून त्यांना रोखत मात्र नाही. पृथ्वी जशी पदार्थांना स्थि राहण्यास आधार, आश्रय देते तसे 'अधर्म' द्रव्य आहे. याबाबत छाया-पथिकाचाही दृष्टान्त दिला जातो. हे द्रव्यही अमूर्त असून सर्व लोकाकाशात व्याप्त आहे. विश्वातील ग्रहगोल, तारे यांची एकाच वेळी दिसून येणारी गतिशीलत आणि त्याच वेळी त्यांच्या गतीची नियमितता यांच्या निरीक्षणातून जैन विचारवंतांना 'धर्म' आणि 'अधर्म' ही दोन तत्त्वे स्फुरली असावी. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचेही सूचन त्यातून होते. सृष्टीचा कर्ता, धर्ता, नियंता असा ईश्वर जैन दर्शनास मान्य नसल्याने 'गति' आणि 'स्थिति' यांना उदासीनपणे सहाय्य करणाऱ्या स्वतंत्र तत्त्वांची अवधारणा त्यांनी केली असावी. (५) पाचवे अस्तिकाय द्रव्य आहे 'आकाश'. ते सर्व जीवांना आणि जड द्रव्यांना राहण्यासाठी वाव देते. सर्वांना सामावून घेते. हे आकाश अनंत आहे. या आकाशाच्या ज्या भागात जीव आणि पुद्गल राहतात, तो आकाशाचा भाग मात्र ‘सान्त' म्हणजे मर्यादित आहे. या भागाला जैनांनी 'लोकाकाश' म्हटले आहे. त्यापलिकडील अनंत पोकळीत जीव, पुद्गल, धर्म, अधर्म-यापैकी कशाचेही अस्तित्व नाही. त्या आकाशाला 'अलोकाकाश' म्हटले आहे. मोक्ष प्राप्त केलेला जीव (आत्मा) त्याच्या स्वभावानुसार लोकाकाशाच्या वरच्या टोकास जाऊन 'सिद्धशिले'वर स्थिरावतो. (६) सहावे 'काल' हे अजीव द्रव्य ‘अस्तिकाय नाही. तो एकप्रदेशी आहे. अमूर्त आहे. वर्तना' हे कालद्रव्याचे लक्षण आहे. आजुबाजूच्या जीव आणि पुद्गलांमध्ये जे बदल, परिणाम, अवस्थांतरे घडून येतात, त्यामुळे अनुमानाने आपल्याला कालाचे अस्तित्व जाणवते. इतर द्रव्यात बदल घडवून आणणारे ते सहकारी कारण आहे. 'वर्तना' लक्षणाने युक्त असा 'काल' हा मुख्य अथवा पारमार्थिक काल होय. ____समय, मुहूर्त, निमिष, क्षण, अहोरात्र, महिना, ऋतू, संवत्सर इ. प्रकारांनी व्यक्त केला जाणारा, चंद्र-सूर्य इत्यादींच्या गतींनी व्यक्त होणारा आणि मोजला जाणारा काल हा ‘गौण' अथवा 'व्यावहारिक काल' आहे. मनुष्यलोकातील हा व्यावहारिक काल, भूत-वर्तमान-भविष्य - असा तीन प्रकारचा दिसून येतो. जैनांचा द्रव्यविचार विस्तृत आणि सूक्ष्म आहे. त्यांनी केलेली परमाणुवादाची मांडणी वैशेषिकांच्या तसेच डेमोक्रिट्सच्या परमाणुवादाच्या तोडीस तोड किंबहुना काही बाबतीत त्यापेक्षाही सरस आहे असे मानले जाते. संख्यात, असंख्यात, अनन्त, अनन्तानन्त आणि 'उपमित काळ' या परिमाणांचा जैनांनी केलेला विचार ही प्राचीन गणितशास्त्राला दिलेली मोलाची देणगी मानली जाते. आकाश, काल या द्रव्यांचा त्यांनी केलेला विचार त्यांच्या सूक्ष्म विज्ञानाभिमुख दृष्टिकोणाचा द्योतक आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28