Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 10
________________ अंगीकार केला. सर्वोच्च ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणार्थ धर्मोपदेश दिला. प्रत्येक तीर्थंकरांचे प्रमुख शिष्य ‘गणधर' या नावाने संबोधले जातात. त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी ही निर्ग्रथ परंपरा अव्याहतपणे जपली. प्रत्येक तीर्थंकरांची विशिष्ट चिह्ने (जसे ऋषभदेवांचा वृषभ, महावीरांचा सिंह इ.), यक्ष-यक्षिणी आणि चैत्यवृक्ष (जसे वृषभदेवांचा वटवृक्ष, महावीरांचा शालवृक्ष इ.) यांची जैन इतिहास पुराणात नोंद केलेली दिसते. यक्ष-यक्षिणी तीर्थंकरांच्या रक्षक देवता आहेत. तीर्थंकरांविषयीच्या स्नेहाने त्या विविध आपत्तीत त्यांचे रक्षण करतात. विविध चित्रे आणि मंदिरांवर कोरलेली शिल्पे यांमध्ये त्या त्या तीर्थंकरांच्या यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती कोरलेल्या असतात.सर्व तीर्थंकरांना त्या त्या विशिष्ट वृक्षाखाली ध्यानस्थ असताना केवलज्ञानाची अर्थात् बोधीची प्राप्ती झाली. या अर्थाने हे चैत्यवृक्ष बोधिवृक्षच होत. सर्व तीर्थंकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या घटना पंचकल्याणक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे गर्भावतरण, जन्म, दीक्षा, केवलज्ञान व निर्वाण या सर्वांच्या तिथी जैन इतिहासात नोंदविलेल्या आहेत. हे सर्व प्रसंग उत्सवरूपाने साजरे करण्याचा प्रघात आहे. (५) चार तीर्थंकरांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य : (१) ऋषभदेव : निष्क्रिय भोगभूमीत जीवनक्रम व्यतीत करणाऱ्या मानवी समाजाला ऋषभदेवांनी सक्रिय कर्मभूमीत जगण्यासाठी अनेक कला व विद्यांचे शिक्षण दिले. शेती, अन्न शिजविणे, वस्त्रे विणणे, ग्राम-नगर निर्माण, विवाह पद्धती, अपत्यांचे पालन-पोषण यांचे योग्य मार्गदर्शन करून मानवाला सुसंस्कृत बनविण्याचे काम केले. गुणानुसारी वर्णव्यवस्थेचा सूत्रपात, हेही ऋषभदेवांच्या महान कार्यातील एक कार्य होय. सुमंगला नावाच्या स्त्रीच्या पतिनिधनानंतर तिच्याशी विवाह करून, विवाहाचा वेगळाच आदर्श घालून दिला. ब्राह्मी व सुंदरी या आपल्या कन्यांना त्यांच्या रुचीनुसार लिपी व गणिताचे शिक्षण दिले. म्हणजेच स्त्री शिक्षणाचाही आदर्श त्यांनी घालून दिला. ऋषभदेवांच्या अनेक पुत्रांपैकी भरत आणि बाहुबली हे पुत्र अतिशय पराक्रमी व प्रख्यात होते. भरत हे भारताच्या इतिहासातील पहिले चक्रवर्ती होऊन गेले. त्यांच्या नावावरूनच आपल्या भारतवर्षाला ‘भारत' हे नाव पडले. द्वितीयपुत्र बाहुबली हे आरंभी महान योद्धा व नंतर खडतर तपस्वी होते. त्यांची ‘श्रवणबेळगोळ' येथे असलेली भव्य प्रतिमा भारतीय मूर्तिकलेचा प्रकर्ष दर्शविते. उत्तर आयुष्यात संसार व राज्यकारभारातून पूर्ण निवृत्त होऊन ऋषभदेवांनी एक वर्षभर निरंतर - निराहार राहून संयमयोगाची साधना केली. साधु-साध्वी- श्रावक-श्राविका या सर्वांना व्रत-नियम- सदाचाराचा उपदेश केला. भ. ऋषभदेवांचे मौलिक जीवनकार्य जैन आणि वैदिक या दोन्ही परंपरांनी गौरवपूर्वक अंकित केले आहे. (२) नेमिनाथ (अरिष्टनेमि ) : महाभारतात सुप्रसिद्ध असलेल्या वासुदेव कृष्णाचे ज्येष्ठ चुलतबंधू अरिष्टनेमि हे होते. ते जैनधर्माचे बावीसावे तीर्थंकर होत. त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या पुशक्ष्यांचे करुण आक्रंदन ऐकून नेमिकुमारांच्या मनात अहिंसा व करुणाभाव विशेष जागृत झाले. त्यांनी सर्व पशुपक्ष्यांना बंधनमुक्त केले. मांसनिवृत्तीच्या रूपाने अहिंसेचा संबंध भोजनाशी जोडण्याचे ऐतिहासिक काम नेमिनाथांनी केले. छांदोग्य उपनिषदातील उपदेशानुसार देवकीपुत्र कृष्णाला घोर अंगिरस ऋषींनी अहिंसाधर्माचा उपदेश दिला. बौद्ध दर्शनाचे विद्वान स्व. धर्मानंद कौशाम्बी यांच्या मतानुसार अहिंसाधर्माचे हे उपदेशक जैन तीर्थंकर भ. नेमिनाथच होते. (३) पार्श्वनाथ : ईसवीसनापूर्वी सुमारे आठव्या शतकात होऊन गेलेल्या पार्श्वनाथ या तेविसाव्या तीर्थंकरांचा काळ, ‘तापसयुगा’चा काळ होता. भयंकर कायक्लेशांना महत्त्व देणाऱ्या अनेक प्रकारच्या तपश्चर्या व क्रियाकांडे अस्तित्वात होती. अहिंसा, दया, क्षमा आणि शांतीचे अवतार असलेल्या पार्श्वनाथांनी विवेकशून्य क्रियाकांडाला विरोध केला. कमठ तापसाने धुनीसाठी जमविलेल्या जीर्ण लाकडाच्या ओंडक्यातून त्यांनी एका प्रचंड नागाला

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28