________________
वरीलपैकी कोणतीही व्युत्पत्ती आणि स्पष्टीकरण बरोबर असो, एक खरे की व्यवहारात प्राकृत वैयाकरणांनी केल्याप्रमाणे, मूळ संस्कृत शब्द मानून, त्यापासून प्राकृत शब्दाची सिद्धि केली जाते. या संदर्भात काहींचे म्हणणे असे आहे की संस्कृत म्हणजे वैदिक भाषा व तत्कालीन सर्व बोली भाषा असे मानले तर संस्कृतपासून प्राकृतची सिद्धि हे म्हणणे बरोबर आहे. तर इतरांचे म्हणणे असे आहे की प्राकृतचे मूळ म्हणून जी संस्कृत रूपे आपण घेतो, ती प्राचीन भारतीय आर्यभाषेचे प्रतिनिधि म्हणून घेतो. ते कसेही असो, एक गोष्ट नक्की आहे की प्राकृतमधील ९५ टक्क्यापेक्षा अधिक शब्दांची मूळे संस्कृत भाषेत आढळतात.
प्राकृत शब्दाने सूचित होणाऱ्या भाषा
प्राकृत हा शब्द कधी फार व्यापक अर्थाने घेतला जातो तर कधी संकुचित अर्थाने घेतला जातो : (१) भारतातील प्राचीन आर्यांच्या बोली भाषा; महावीर आणि बुद्ध यांनी आपापल्या
धर्मोपदेशासाठी वापरलेल्या भाषा; जैन आणि बौद्ध यांनी वाङ्मयीन कार्यासाठी उपयोजिलेल्या भाषा; प्रवरसेन इत्यादी लेखकांनी आपल्या ग्रंथांत उपयोगात आणलेल्या भाषा; शिलालेखांतील संस्कृतेतर भाषा; संस्कृत नाटकांतील संस्कृतेतर भाषा; ज्यांतून भारताच्या वर्तमानकालीन मराठी, हिंदी इत्यादी आर्यभाषा निघाल्या त्या भाषा; व भारतात सद्य:काळी बोलल्या जाणाऱ्या व लेखनांत वापरल्या जाणाऱ्या आर्य भारतीय भाषा; या सर्वांनाच कधीकधी प्राकृत म्हटले जाते.
या प्राकृतांचे काहीजण तीन स्तर मानतात :- वैदिक काळात प्रचलित असणाऱ्या आर्यांच्या अनेक बोली भाषा म्हणजे प्राथमिक प्राकृत, या प्रथम स्तरात येतात. या प्राकृतांत पुढे अनेक फेरबदल होऊन त्यांतून द्वितीय स्तराच्या प्राकृत भाषा निघाल्या. या प्राकृतापासूनच भिन्न प्रदेशांत अपभ्रंश भाषा उत्पन्न झाल्या. या द्वितीय स्तरातील प्राकृतांपासून-विशेषत: अपभ्रंशभाषांपासून आधुनिक आर्य भारतीय भाषा झाल्या; त्या तृतीय स्तरातील प्राकृत भाषा होत. काहींच्या मते तर हिंदु, जैन व बौद्ध यांनी वापरलेली 'अपभ्रष्ट संस्कृत' ही सुद्धा प्राकृतमध्ये घालावी.