________________
पाप-पुण्य
७१
पुण्याने पण वाढतो संसार....
प्रश्नकर्ता : पुण्याच्या बंधनाने संसार तर वाढतो, असा त्याचा भावार्थ होतो ना?
दादाश्री : पुण्य असे हितकारी नाही. पुण्य तर एका प्रकारे हेल्प करते. पाप असेल तर ज्ञानी पुरुष भेटतच नाहीत. ज्ञानी पुरुषांना भेटायचे असेल पण संपूर्ण दिवस मिलमध्ये नोकरी करत असेल तर तो कशाप्रकारे भेटू शकेल? म्हणजे अशाप्रकारे पुण्य हेल्प करते, आणि तेही पुण्यानुबंधी पुण्य असेल तरच हेल्प करते.
प्रश्नकर्ता : जसे पापाने संसार वाढतो तसे पुण्याने पण संसार वाढतो
ना?
दादाश्री : पुण्याने पण संसार तर वाढतो, पण इथून जे मोक्षाला गेले आहेत ना, ते जबरदस्त पुण्यशाली होते. त्यांच्या आजूबाजूला जर राण्या बघितल्या तर दोनशे-पाचशे तर राण्या होत्या, आणि राज्यही खूप मोठे होते. स्वत:ला माहितही नसायचे की केव्हा सूर्यनारायण उगवले आणि केव्हा मावळले, अशा थाटामाटात तर पुण्यशाली जन्मला येतात ! खूप साऱ्या राण्या असतात, ऐश्वर्य असूनही ते कंटाळून जायचे की या संसारात सुख तरी काय आहे? पाचशे राण्यांमध्ये पन्नास राण्या त्यांच्यावर खुश असायच्या. बाकीच्या तोंड फुगवून फिरत असायच्या, कित्येक राण्या तर राजाला मारून टाकण्यासाठी प्रयत्न करायच्या. अर्थात हे जग तर अतिशय कठीण आहे. यातून पार येणे खूप कठीण आहे. ज्ञानी पुरुष भेटले तर ते एकमेव आपली मुक्ती करवून देतात, बाकी इतर कुणीही मुक्त करू शकत नाही. ज्ञानीपुरुष बंधन मुक्त झालेले आहेत, म्हणून आपली मुक्तता करू शकतात. ते तरणतारण झालेले आहेत, म्हणून ते सोडवू शकतात.
हत् पुण्यशाली, नाही भेटू शकत ज्ञानींना !
प्रश्नकर्ता : आम्ही पुष्कळ लोकांना समजावतो की 'दादां' जवळ या, पण ते येत नाहीत.