Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 7
________________ १३. जैन पुराणातील राजे (इतिहास-संकलन-परिषद, पुणे येथे वाचलेला शोधनिबंध, २०१०) लेखक : श्री. सुमतिलाल भंडारी मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी 'सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च । वंशानुचरितं चैव पुराणं पञ्चलक्षणम् ।।' अर्थात् पुराण पाच प्रकारचा विचार करते. उत्पत्ति, प्रलय, वंश, मन्वन्तर मनु व वंशाचा इतिहास. 'पुराण' शब्दाची हिंदू साहित्यातील ही परिभाषा जैन पुराणांनाही लागू पडते. रामायण, महाभारत, हरिवंशपुराण आदि हिंदूंचे ग्रंथ 'पुराण' या स्वरूपात मोडतात. पुराण याचा अर्थ प्राचीन. ही हिंदूंची पुराणे जेव्हा लोकप्रिय होऊ लागली तेव्हा जैन विद्वानांनाही पुराण लिहावेसे वाटू लागले. मग त्यांनी पुराणांतर्गत जैन महापुरुषांची चरित्रे लिहिली. तीर्थंकरांची तसेच राम, श्रीकृष्ण आदि प्रभावी पुरुषांची चरित्रे लिहिली. (राम आणि श्रीकृष्ण हे जैनांमध्ये आदरणीय मोक्षगामी पुरुष आहेत. 'त्रिषष्टिशलाकापुरुष' या चरित्रग्रंथात राम व श्रीकृष्ण यांना अनुक्रमे बलदेव व वासुदेव असे संबोधले आहे.) श्रुतकेवली भद्रबाहू स्वामी यांनी अर्धमागधी भाषेत रचलेल्या 'कल्पसूत्र' या ग्रंथात ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ व महावीर या तीर्थंकरांची चरित्रे दिली आहेत. 'हरिवंशपुराण' हे महाकाव्य २२ वे तीर्थंकर नेमिनाथ अथवा अरिष्टनेमी यांचे चरित्र वर्णन करणारे आहे. त्यामुळे या महाकाव्याचे दुसरे नाव 'अरिष्टनेमिपुराणसंग्रह ' असेही आहे. याचे कर्ता पुन्नाटसंघीय जिनसेन असून निर्मितीकाल अंदाजे ८ वे शतक आहे. वसुदेवहिंडी या आचार्य संघदासगणि व धर्मसेनगणि यांनी इ. स. च्या ६ व्या शतकामध्ये लिहिलेल्या ग्रंथात, ऋषभदेवांचे तसेच श्रीकृष्णपिता वसुदेव यांचे चरित्र दिले आहे. विमलसूरि या आचार्यांनी 'पउमचरिय' हे रामचरित्र, महाकाव्य या रूपाने इ.स.च्या तिसऱ्या शतकात म्हणजे वाल्मीकि रामायणानंतर जवळ जवळ २०० वर्षांनी लिहिले आहे. हे जैन रामायण आहे. अशाकरिता की यातील घटना व क्रम वाल्मीकि रामायणाप्रमाणेच आहे. पण त्यांना वाटणाऱ्या विपरीत, असंभवनीय गोष्टींना तर्काचा, तत्त्वांचा व कर्मसिद्धांतांचा आधार देऊन त्यांनी काही फेरबदल केले आहेत. विमलसूरि, या महाकाव्याला 'पुराण' असे संबोधतात. ज्ञातृधर्मकथा, अंतकृद्दशा, उत्तराध्ययनसूत्रावील सुखबोधाटीका या ग्रंथात अनेक राजांच्या कथा आल्या आहेत. जैन पौराणिक महाकाव्यांची कथावस्तू जैन धर्मातील ६३ शलाकापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारलेली आहे. शलाकापुरुष म्हणजे स्तुत्य पुरुष, सर्वोत्कृष्ट महापुरुष अथवा सृष्टीत उत्पन्न झालेले वा उत्पन्न होणारे सर्वश्रेठ महापुरुष. हे शलाकापुरुष म्हणजे २४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ वासुदेव, ९ प्रतिवासुदेव व ९ बलदेव हे होत. या ६३ पुरुषांमध्ये भरत, ब्रह्मदत्त, श्रीकृष्ण, राम, बलराम, जरासंध, रावण आदींचा समावेश आहे. या महापुरुषांनी भरत क्षेत्राच्या इतिहासात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ६३ शलाकापुरुष हे एक धार्मिक काव्य आहे व कथेद्वारा धर्मोपदेश देणे हाच याचा उद्देश आहे. ६३ शलाकापुरुष ही रचना पुराण याकरिता आहे की यामध्ये प्राचीनांचे इतिवृत्त आहे. हे वर्णन प्राचीन कवींनी केले आहे. हे महान याकरिता आहे की यात महापुरुषांचे वर्णन आहे. हे महान याकरिताही आहे की हे महान शिकवण देते. ६३ महान पुरुषांचे वर्णन करणारे काव्य म्हणून हे 'महापुराण' आहे. त्यामुळे जैनांमध्ये या महाषाणाचे महत्त्व तेवढेच आहे जितके रामायण, महाभारताचे आहे. ‘त्रिषष्टिमहापुरुषगुणालंकार' हा महाकाय काव्यग्रंथ 'पुष्पदंत' या कवीने अपभ्रंश भाषेत लिहिला. याचा निर्मितीकाळ इसवी सनाचे १० वे शतक असा आहे. आचार्य जिनसेन यांनी 'आदिपुराण' हा ग्रंथ ९ व्या शतकात लिहिला. तिसरा ग्रंथ ‘त्रिषष्टिशलाकापुरुषचरित' हा आचार्य हेमचंद्रांनी (श्वेतांबर जैन मुनी) संस्कृतमध्ये इ.स.च्या १२ व्या शतकात लिहिला. अशा पुष्कळ लेखकांनी ६३ शलाकापुरुषांवर ग्रंथ लिहिले आहेत.

Loading...

Page Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26