Book Title: Pashu Pakshi Srushti Don Vibhinna Drushtikon
Author(s): Anita Bothra
Publisher: Anita Bothra

View full book text
Previous | Next

Page 5
________________ मन, आध्यात्मिक प्रगतीची योग्यता - हे सर्व लक्षात घेऊन पशु-पक्ष्यांच्या हिंसेचा पूर्ण निषेधात्मक दृष्टिकोन आचारांगासारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथात स्पष्टत: दिसून येतो. (३) जैन साधुआचारातून दिसून येणारा रोगचिकित्साविषयक दृष्टिकोण, त्याची कारणे व त्यात दिसून येणारी कालानुसारी स्थित्यंतरे : रोगचिकित्साविषयक दृष्टिकोनाचे तीन स्तर आपल्याला जैनग्रंथांमध्ये दृष्टोत्पत्तीस येतात. पहिल्या स्तरात आचारांग, उत्तराध्ययन आणि दशवैकालिक या ग्रंथातील रोगचिकित्सेविषयक विचार येतात. दुसऱ्या स्तरात व्याख्याप्रज्ञप्ति आणि ज्ञातृधर्मकथा यांचा विचार करावा लागतो. तिसऱ्या स्तरात साधुआचारातील रोगचिकित्सेचा बदलता दृष्टिकोन मुख्यत: व्यवहारभाष्य, बृहत्कल्पभाष्य आणि निशीथभाष्यचूर्णीत दिसून येतो. प्रथम स्तर : आचारांगाचे प्रथम अध्ययन शस्त्रपरिज्ञा' उघडल्याबरोबर प्रथमतः ‘एकेंद्रिय पृथ्वीकायिक जीवांचे वर्णन दिसते. त्यात म्हटले आहे की, पृथ्वीकायिकजीव अव्यक्त चेतनायुक्त असले तरी, शस्त्राने छेदन-भेदन केल्यावर, इंद्रियविकल मनुष्यांप्रमाणेच त्या जीवांनाही कष्टाची अनुभूती होते. याच प्रकारची विधाने भ. महावीरांनी पाचही एकेंद्रियांविषयी केली आहेत.३८ त्रसकायिकजीवांच्या वेदनांचा विचार करताना, पंचेंद्रिय पशु-पक्ष्यांच्या शरीराच्या अवयवांचा निर्देश विशेष लक्षणीय दिसतो. ते म्हणतात - काही व्यक्ती चर्म, मांस, रक्त, हृदय, पित्त, वसा, पंख, पुच्छ, केश, शृंग, दंत, नख, स्नायु, अस्थि, अस्थिमज्जा - इत्यादींसाठी प्राण्यांचा वध करतात.३९ या यादीतील वस्तूंचे चरकसंहितेतील जांगम द्रव्याशी असलेले साम्य विशेष लक्ष वेधून घेणारे आहे. ___ आचारांगातीलच लोकविजय' अध्ययनात म्हटले आहे की, 'चिकित्साकुशल वैद्य चिकित्सेसाठी अनेक जीवांचे हनन, छेदन, भेदन, लेपन, विलेपन आणि प्राणवध करतात.' देहासक्ती सोडलेल्या मुनीला या चिकित्सेचा काय लाभ ? अनगार अशा प्रकारची चिकित्सा करीत नाही.४० ____ याच ग्रंथाच्या नवव्या अध्ययनात, ‘णो से सातिज्जति तेइच्छं' असे म्हणून संशोधन (विरेचन), वमन, स्नान, गात्रअभ्यंगन, दंतप्रक्षालन व मर्दन यांचा सर्वथा निषेध केला आहे.४१ दशवैकालिकसूत्रातील साधूंच्या अनाचार विषयक तिसऱ्या अध्ययनात वमन, विरेचन, बस्ती इ. पंचकर्मांचा तसेच चिकित्सेचा पूर्णत: निषेध केलेला दिसतो.२ साधूंच्या खानपानविधीत निषिद्ध मानलेल्या वनस्पतींचा, रोगचिकित्सेसाठी सुद्धा वापर करू नये - असे दशवैकालिक्ने एकंदर मत दिसते. उत्तराध्ययनातील १५, १९ आणि २० या तीनही अध्यायांमध्ये चतुष्पाद चिकित्सेचा आणि पंचकर्म तसेच वैद्यांद्वारे मंत्र, मूल इ. च्या सहाय्याने केलेल्या चिकित्सेचा निषेध व्यक्त झालेला दिसतो. मृग इ. पशु जसे निर्सेपचाराने बरे होतात, तशाप्रकारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून साधूने विचरण करावे, असे मत 'मृगापुत्रीय' अध्ययनात व्यक्त केलेले दिसते. याच सूत्रातील दुसऱ्या अध्ययनात परिषहांचे वर्णन करीत असताना, म्हटले आहे की, 'कर्मांच्या उदयाने रोग उत्पन्न होतात असे जाणून वेदनेने पीडित झाल्यावर दीन बनू नये.'व्याधीने विचलित न होता, बुद्धी स्थिर ठेवावी व प्राप्त झालेली पीडा समभावाने सहन करावी. आत्मगवेषक मुनीने चिकित्सेचे अभिनंदन करू नये व करवूही नये, हेच मुनीचे श्रामण्य आहे.४३ वरील ग्रंथात आलेला चतुष्पाद चिकित्सा हा शब्द चरकसंहितेत वैद्य, औषधीद्रव्य, परिचारक व रोगी ही चार स्थाने सांगून, सूत्रस्थानात वर्णित केलेला आहे.४४ 'विपाकसूत्र' हा ग्रंथ अर्धमागधी ग्रंथरचनेच्या शेवटच्या टप्प्यातला मानला जातो. विपाकसूत्रातील वैद्यकीय चिकित्सेचे उल्लेख वाचल्यानंतर, हे स्पष्टच होते की चरकसंहितेतील चिकित्सा आता समाजात अतिशय रूढ व प्रचलित झाली आहे. त्यातील वैद्यांचा, चिकित्सकांचा आणि विशेषतः धन्वंतरीवैद्याचा उल्लेख विशेष लक्षणीय आहे. विपाकसूत्रातील ७ वे अध्ययन या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जांगम, पार्थिव व औद्भिद अशा तीनही

Loading...

Page Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9