Book Title: Pashu Pakshi Srushti Don Vibhinna Drushtikon
Author(s): Anita Bothra
Publisher: Anita Bothra

View full book text
Previous | Next

Page 6
________________ प्रकारच्या द्रव्यांचे तेथे वर्णन येते. त्यात अष्टांगआयुर्वेदाची नावेही नमूद केली आहेत. चरकसंहितेत सेव्यमसासाठी उपयुक्त अशा बहुतांशी सर्व पशु-पक्ष्यांचा उल्लेखही येतो. अर्थात् हिंसेचे दुःखरूपविपाक सांगणाऱ्या या विपाकसूत्रात, सर्व प्रकारची चिकित्सा आणि पंचकर्मे इ. विधींचा पूर्णत: निषेध केलेला दिसतो.४६ द्वितीय स्तर : वैद्यकीय चिकित्सेविषयीचा दृष्टिकोण स्पष्ट करणाऱ्या अर्धमागधी ग्रंथातील द्वितीय स्तर 'व्याख्याप्रज्ञप्ति'च्या १५ व्या प्रकरणात व ज्ञाताधर्मकथे'च्या ५ व्या अध्ययनात व्यक्त झालेला दिसतो. 'व्याख्याप्रज्ञप्ति'मध्ये भ. महावीरांनी रेवती' श्राविकेच्या मदतीने त्यांच्या पित्तज्वराची आणि रक्ताच्या उलट्यांची चिकित्सा केलेली दिसते.४७ ज्ञाताधर्मकथेतील ५ व्या अध्ययनात 'शैलक' मुनींची चिकित्सा करणाऱ्या चिकित्सकांना, मंडूक राजा असा आदेश देतो की, 'आपण शैलक मुनींची चिकित्सा प्रासुक, एषणीय अशा औषध, भेषज्य व भक्तपानाने करावी'.४८ प्रासुक व एषणीय औषधांनी साधूंची चिकित्सा करावी हा दृष्टिकोण तृतीय स्तराचा सूचक मानावा लागेल. तृतीय स्तर :सहाव्या-सातव्या शतकात जैनपरंपरेत रुढ झालेल्या कल्प-निशीथ-व्यवहार या छेदसूत्रांच्या भाष्यांमध्ये, 'वैद्य व वैद्यांनी केलेली साधूंची चिकित्सा'-यांचे विपुल उल्लेख आढळून येतात. रोगचिकित्सेच्या दुसऱ्या स्तरप्तील प्रासुक, एषणीय औषधांचा निकष कायम ठेवलेला दिसतो. परंतु चिकित्सेच्या संपूर्ण निषेधाच्या दृष्टिकोनातमूलगामी बदल झालेला दिसतो. व्यवहारभाष्यात म्हटले आहे की - अम्मापितीहि जणियस्स, तस्स आतंकपउरदोसेहिं । वेज्जा देंति समाधिं, जहिं कता आगमा होति ।।४९ व्यवहारभाष्येच्या नियुक्तीत त्रिविध चिकित्सेचा उल्लेख दिसतो.५० व्यवहारभाष्य व त्यावरील मलयगिरिची टीका यांमध्ये चिकित्सा, औषधी आणि आरोग्यविषयीचे उल्लेख प्रचुर प्रमाणात आढळून येतात. साधुपरंपरेत या तृतीय स्तरात झालेले चिकित्सेचे प्रचलन, त्यात दिलेल्या विषयांच्या यादीवरूनही जाणवल्याशिवाय रहात नाही. त्यातील काही उल्लेख पुढे दिले आहेत : __ प्रतिकूल भोजनाचा परिणाम, अंगमर्दन आणि विश्रांती, वमन-विरेचन आदि चिकित्सेचे प्रयोजन, रात्रीचे जागरण आणि अजीर्ण, कंटकविद्ध पायाची चिकित्सा, वाक्पाटवासाठी ब्राह्मी वनस्पतीचा वापर, शरीराचे जाड्य आणि लघुता, मेधा-धारणा आणि ऊर्जा यांची वृद्धी, वात-पित्त-कफ-शोथ यांनी होणारे विकार व त्यावरील उपाय, वर्षाकालातील तपाचे लाभ, मलमूत्राने होणारी हानी, गरिष्ठ भोजनाने होणारी कामोत्तेजना, मिताहाराचे लाभ, व्रणचिकित्सा आणि व्रण शिवण्याचे उल्लेख, मुख-दंत-प्रक्षालनाने होणारे लाभ, संक्रामक रोगांबाबतची सावधानता, विषबाधेची चिकित्सा, मधुमेहाची पथ्ये, संतुलित आहार.५१ इ.इ. प्राय: अशाच प्रकारचे उल्लेख बृहत्कल्प व निशीथभाष्य-चूर्णीतही आढळून येतात. आदर्शवत् साधुआचारात जरी सर्व प्रकारच्या चिकित्सेचा निषेध असला तरी, समाजात अतिशय प्रचलित असलेल्या व ज्याचे विधायक दृश्यपरिणाम स्पष्टत: दिसून येत आहेत, अशा चिकित्सा व आरोग्यशास्त्रापासून जैन परंपरा सुद्धा दूर राहू शकली नाही, हे व्यवहारभाष्य इ. ग्रंथांवरून स्पष्ट होते. शरीर हे धर्माचे साधन असल्यामुळे ते सुस्थितीत ठेवण्यासाठी वैद्यकीय चिकित्सेचा आधार तर घेतला, परंतु प्रत्यक्ष प्राणहिंसेचा आधार न घेता. ती चिकित्सा प्रासुक व एषणीय औषधांनीच करावी, असा कटाक्ष कायम ठेवला. ___ वरील विवेचनात चिकित्सेला अनुलक्षून केलेले तीन स्तर श्वेतांबर ग्रंथांच्या आधारे केलेले आहेत. दिगंबर परंपरेत चिकित्सेचा विशेष बलपूर्वक निषेध नाही. साधुआचारातील उद्गम-उत्पादन-एषणा या दोषांच्या अंतर्गत चिकित्सा-निषेधाचे तुरळक उल्लेख आढळतात.५२ फारसा विचार दिसत नाही. किंबहुना ‘भगवती आराधना' सारख्या प्राचीन ग्रंथातही (३-४ शतक) संलेखनाधारी व्यक्तीने केलेल्या वमन, विरेचन, बस्ती इ. चा उल्लेख आढळतो.५३

Loading...

Page Navigation
1 ... 4 5 6 7 8 9