Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
पशु-पक्षी-सृष्टी : दोन विभिन्न दृष्टिकोण
(जैन तत्त्वज्ञान आणि चरकसंहितेच्या संदर्भात) (महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, अधिवेशन २७, मालाड (मुंबई), ११ ते १३ नोव्हेंबर २०१०)
विषय व मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी, जैन अध्यासन, पुणे विद्यापीठ शोधछात्रा : डॉ. अनीता बोथरा, सन्मति-तीर्थ, पुणे ४
प्रस्तावना :
श्रमणपरंपरा व वैदिकपरंपरा यांच्यातील साम्यभेद पहात असताना, अनेक अभ्यासकांनी त्यावर अनेक अंगांनी प्रकाश टाकला आहे. अंतिम सत्याचा शोध, ईश्वराचे स्थान, कर्मसिद्धांत, यज्ञसंस्थेला विरोध, चातुर्वर्ण्याचे स्थान - अशा अनेक मुद्यांनी या दोन परंपरांमधील तफावत स्पष्ट केली जाते. परंतु याखेरीज अनेक दुय्यम मुद्दे देखील असे आहेत की जे जैन परंपरेची पृथगात्मकता विशद करतात.
त्यापैकी एक मुद्दा आहे, ‘जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून स्पष्ट होणारी पशु-पक्ष्यांविषयीची अवधारणा'. 'चरकसंहिता' हा आयुर्वेदशास्त्राचा आद्यग्रंथ वाचत असताना, त्यात पशुपक्ष्यांविषयी व्यक्त झालेले जे विचार आहेत, ते वैदिक अथवा हिंदुपरंपरेचा जीवनाकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोण अधोरेखित करतात. या दोन दृष्टिकोनातील मूलभूत भेद अंकित करण्याचा प्रयत्न, या शोधनिबंधात केला आहे.
(१) जैनदृष्टीने तिर्यंचगति, तिची व्याप्ती आणि त्यात पशु-पक्ष्यांचे नेमके स्थान :
जैन तत्त्वज्ञानानुसार संसारी जीव आपापल्या कर्मानुसार नरक-तिर्यंच-मनुष्य आणि देव या चार गतींमध्ये संसरण करतात. या चार गतींची अवधारणा त्यासंबंधीच्या जैनग्रंथात समानरूपतेने दिसून येते.
जैनशास्त्रानुसार तिर्यंचगति' ही देव-मनुष्य आणि नारकी जीवांपेक्षा सर्वथा भिन्न आहे. तिर्यंचगतीतील सर्व जीव एकेंद्रिय ते पंचेंद्रिय असतात. पृथ्वीकाय, अप्काय, तेजस्काय, वायुकाय आणि वनस्पतीकाय हे 'एकेंद्रिय तिर्यंच' आहेत. शंख, लट, जळू इ. 'द्वींद्रिय तिर्यंच' आहेत. मुंगी, ढेकूण, कोळी इ. 'त्रींद्रिय तिर्यंच' आहेत. मशी, डास, भुंगा इ. 'चतुरिंद्रिय तिर्यंच' आहेत. घोडा, गाय, हरीण, सिंह, बेडूक, मासा, मोर, पोपट, कुत्रा, मांजर इ. 'पंचेंद्रिय तिर्यंच' आहेत. तिर्यंच पंचेंद्रियांचे दोन भेद आहेत - संज्ञी व असंज्ञी. मनसहित तिर्यंच्यांना 'संज्ञी तिर्यंच' म्हणतात. मनरहित तिर्यंच्यांना असंज्ञी तिर्यंच' म्हणतात. 'मन कोणाला असते ?', याबाबत जैनांची धारणा सुनिश्चित आहे. गर्भज जीवांना मन असते. गर्भज जीवांचे तीन प्रकार आहेत - जरायुज, अंडज व पोतज.५ शिवाय उत्पत्तिस्थानानुसार त्यांचे रसज, स्वेदज इ. प्रकारही निर्दिष्ट केलेले दिसतात. जन्म घेण्याच्या प्रकारानुसार तिर्यंच्यांचा जन्म हा 'गर्भजन्म' तसेच 'सम्मूर्च्छनजन्म' असतो.
तिर्यंच्यांच्या हालचालीच्या क्षेत्रानुसार त्यांचे जलचर, स्थलचर, खेचर, उरपरिसर्प आणि भुजपरिसर्प हे प्रकार ‘पन्नवणा' या ग्रंथात नोंदविलेले दिसतात. 'स्थानांगा'त पंचेंद्रियांचे विभाजन एकखुर, द्विखुर, गंडीपद आणि सनखपद अशाप्रकारे केलेले दिसते.' स्थानांगातच चर्मपक्षी, रोमपक्षी, समुद्वपक्षी आणि विततपक्षी - असे पक्ष्यांचे चार प्रकारही दिसतात.१०
सामान्यत: असे म्हणता येईल की सर्व अरण्यवासी व पाळीव पशुपक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासे हे 'पंचेंद्रिय तिर्यंच' आहेत. या सर्व तिर्यंचपंचेंद्रियांची सूक्ष्म विचारणा १४ मार्गणास्थानांच्या माध्यमातून, षट्खंडागम, धवलाटीका, गोम्मटसार (जीवकांड), पन्नवणा, जीवाभिगम इ. ग्रंथांमध्ये केलेली दिसते. ती १४ मार्गणास्थाने याप्रमाणे - गति, इंद्रिय, काय, योग, वेद, कषाय, ज्ञान, संयम, दर्शन, लेश्या, सम्यक्त्व, भव्यत्व, संज्ञी आणि
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
आहारक. याशिवाय भाषा, शरीर, संज्ञा, उपयोग, समुद्घात इ. अनेक मुद्यांनीही तिर्यंचपंचेंद्रियांचा विचार केला आहे. तिर्यंचपंचेंद्रियांच्या विषयी जैनांची विशेष आत्मीयता व सजगता वरील वर्णनाने सिद्ध होते. ____ जैनांची पशु-पक्षीसृष्टी ही मानवसृष्टीच्या सर्वात जवळची सृष्टी आहे. त्यांच्यामध्ये तरतमभावाने मति, श्रुत ही दोन ज्ञाने तसेच काही अंशाने अवधि व मन:पर्यायज्ञानही असते. त्यातील काही पशु-पक्ष्यांना जातिस्मरणज्ञान देखील होऊ शकते.१२
पशु-पक्ष्यांमधील क्रोध, कपट, आहारसक्ती इ. विकारांबरोबरच त्यांच्यामधील प्रेम, वात्सल्य, संघभावना, अपरिग्रह, निरासक्ती, संयमित प्रवृत्ती इ. सद्गुणात्मक भावनाही जैनग्रंथांमध्ये चर्चिलेल्या दिसतात.१३ ।।
औत्पतिकी, वैनयिकी, कर्मजा आणि परिणामिकी या चार प्रकारच्या बुद्धी जैनग्रंथात निर्दिष्ट केल्या जातात? 'पशु-पक्ष्यांमध्ये या चतुर्विध बुद्धी आहेत', असे साक्षात निर्देश जरी जैनग्रंथात नसले तरी कासव, स्थलांतरित पक्षी, विशिष्ट प्रजातीचे मासे, मार्जार कुलातील प्राणी, हत्ती इ. संबंधीची जी निरीक्षणे आधुनिक निरीक्षकांनी चित्रित केली आहेत, त्यावरून पशु-पक्ष्यांमध्ये असलेल्या चतुर्विधबुद्धीचा शोध घेता येतो.
तिर्यंचसृष्टीच्या अंतर्गत असलेल्या पशु-पक्ष्यांच्या ध्वनिसंकेताधार असलेल्या भाषावर्गणेचा केलेला सैद्धांतिक विचार, ही जैन तत्त्वज्ञानाची विशेष उपलब्धी मानावी लागेल.
जैनांनी पशु-पक्ष्यांचे सर्व व्यवहार केवळ संज्ञा अर्थात् अंत:प्रवृत्तींवर आधारलेले न मानता, त्यांच्यातील ज्ञान, भावना व विचारशक्तीचा केलेला विचार, हा आधुनिक निसर्ग निरीक्षकांच्या निष्कर्षाच्या खूपच जवळ पोहोचतो.
निसर्गाने प्रत्येक पशु-पक्ष्याला आखून दिलेल्या मर्यादांचे तो सामान्यतः पालन करीत असल्याने, जैनग्रंथांत पशु-पक्ष्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची शक्यता सुद्धा वर्तविलेली दिसते.
(२) चरकसंहितेतील तिर्यंच विचार, विशेषत: पशु-पक्षी सृष्टी :
भारतीय आयुर्वेदशास्त्रातील कायचिकित्सा व शल्यचिकित्सेचे प्रतिनिधित्व करणारे 'चरकसंहिता' आणि 'सुश्रुतसंहिता' हे ग्रंथ प्राय: समकालीन मानले जातात. त्यापैकी प्रस्तुत शोधनिबंधात संदर्भित असलेल्या चरकसंहिा या ग्रंथाची कालमर्यादा सामान्यत: इ.स.पूर्व ५०० ते इ.स.२०० अशी नक्की केलेली दिसते.
'अथातो दीर्घजीवितीयमध्यायं व्याख्यास्यामः ।।' या सूत्राने चरकसंहितेचा आरंभ होतो. यातून स्पष्ट होते की चरकसंहिता हा दार्शनिक ग्रंथ नसून, अथर्ववेदाचा उपवेद मानला गेलेला हा ग्रंथ,१५ आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कायचिकित्सेवर आधारित आहे. चरकसंहितेतील अनेक सूत्रे व भाष्य यावरून स्पष्ट होते की, या ग्रंथाला वैशेषिक व सांख्य ह्या दोन दर्शनांची पृष्ठभूमी आहे.६ तत्त्वज्ञानाच्या चौकटीनुसार पशुपक्षीसृष्टीचा विचार करताना चरकसंहितेतील सूत्रात 'तिर्यंच' या शब्दाचा साक्षात उपयोग केलेला दिसत नाही. भाष्यामध्ये देखील तो केवळ एकदाच आलेला दिसतो.१७ तिर्यंच ही संज्ञा आणि त्याचा थोडा अधिक विस्तार सांख्यदर्शनात दिसतो. त्यामळे प्रथम ती पार्श्वभमी समजावन घेऊ.
प्राय: सर्व प्राचीन वैदिक ग्रंथात देव, मनुष्य व तिर्यंच या तीन योनींचा उल्लेख आहे. नरकयोनीची स्वतंत्र गणना क्वचितच दिसून येते.१८
महाभारतांतर्गत सांख्यविचारात कीट, पक्षी, पतंग यांच्याखेरीज तिर्यंच्यांचा वेगळा निर्देश दिसतो.१९ याचा अर्थ असा की याठिकाणी तिर्यंच म्हणजे पशुसृष्टी होय. सांख्यकारिका ‘माठरवृत्तीत' पशु, पक्षी, मृग, सरिसृप आणि स्थावर या पाचांचा समावेश तिर्यंचयोनीत केला आहे.२० येथे स्थावर म्हणजे संपूर्ण वनस्पतीसृष्टी होय. सांख्यकारिका ‘सुवर्णसप्तती'त अधोगमनाची पाच स्थाने दिली आहेत - चतुष्पाद, पतंग, उरग, तिर्यक् आणि स्थावर.२१ मनुस्मृतीच्या कुल्लूक'प्रणीत टीकेत तिर्यंच आणि स्थावरांचा उल्लेख वेगवेगळा आहे.२२
प्राचीन वैदिक ग्रंथांतील वर्णनावरून तिर्यंचगतीची नेमकी व्याप्ती ध्यानात येत नाही. त्यांनी तिर्यंचगतीत
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
पशु-पक्ष्यांचा समावेश निश्चितपणे केला आहे परंतु कीट, पतंग इ. क्षुद्र जीव आणि वनस्पती यांच्याबाबतीत एकरूपता दिसत नाही.
__ पशु-पक्ष्यांचे विभाजन स्थूलमानाने जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज्य या चार प्रकारे केलेले दिसते.२३ चरकसंहितेची एकंदर दृष्टी कायचिकित्सेला प्राधान्य देणारी असल्यामुळे त्यांनी वेगळीच परिभाषा वापरून पशुपक्ष्यांचे आठ प्रकारात विभाजन केलेले दिसते. औषधयोजना सुचवताना ते या विभाजनाचा वारंवार आधार घेतात. १) प्रसह - अन्न हिसकावून घेणारे व भक्ष्यांवर तुटून पडणारे - गाय, गाढव, घोडा, वाघ इ. २) बिलेशय - बिळात राहणारे - साप, मुंगूस, बेडूक इ. ३) आनूप - विपुल पाण्याच्या प्रदेशात राहणारे - हत्ती, म्हैस इ. ४) वारिशय - पाण्यात राहणारे - मासे, कासव, मगर इ. ५) जलचर - जलात विचरण करणारे - हंस, बदक, बगळा इ. ६) जांगल - कमी पाणी असलेल्या प्रदेशात राहणारे - हरीण, सांबर, मोर इ. ७) विष्किर - भक्ष्य पायांनी उकरून खाणारे - तित्तिर, कोंबडा, कवडा इ. ८) प्रतुद - चोचीने टोचून खाणारे - चिमणी, पोपट, सुतार इ.२४
___ याखेरीज इतर प्रकारे केलेले पशु-पक्ष्यांचे वर्गीकरण चरकसंहितेत आढळत नाही. या वर्गीकरणाचा आधार चरकसंहिताकार आपल्या विवेचनात कशाप्रकारे घेतात ते पाहू. त्या विषयीची विधाने अशी आढळतात. १) शीतऋतूत जलस्थ प्राण्यांचे मांस भक्षण करावे. २) वर्षाऋतूत डाळीच्या पाण्यात उकडलेल्या, जांगल देशातील जनावरांच्या मांसाचे सेवन करावे.२५ ३) कुष्ठ, जलोदर किंवा प्रमेह रोग झालेल्या मनुष्याने ग्राम्य, जलज जनावरांचे मांस खाऊ नये.२६
जैन तत्त्वज्ञानाने जीवसृष्टीची ज्या अनेक प्रकारे वर्गवारी किंवा चिकित्सा केली आहे, त्याप्रकारची वर्गवारी अगर चिकित्सा चरकसंहितेने थोडीसुद्धा केलेली नाही. वेदना, कषाय, भावभावना, मन, ज्ञान इ. अनेक निकष पशु-पक्षीसृष्टीला लावले असते, तर औषधयोजनेसाठी पशु-पक्ष्यांचा वापर सांगताना त्यांना अर्थातच खूप मर्यादा आल्या असत्या.
(३) आयुर्वर्धन व रोगचिकित्सेसाठी चरकसंहितेत प्रतिबिंबित झालेली पशु-पक्ष्यांची उपयुक्तता :
चरकसंहितेतील सूत्रस्थानात औषधयोजनेसाठी 'द्रव्य' हा शब्द वापरलेला आहे. उत्पत्तिभेदानुसार औषधयोजनेसाठी वापरलेल्या द्रव्यांचे तीन प्रकार होतात. जांगम, औद्भिद आणि पार्थिव. चरकसंहितेत स्पष्टत: म्हटले आहे की मधु, गोरस, (दूध, दही इ.), पित्त, वसा, मज्जा, रक्त, मांस, मल, मूत्र, चर्म, शुक्र, स्नायु, शृंग, नख, खुर, केश, रोम व गोरोचन या ‘जांगम' द्रव्यांचा औषधकार्यात उपयोग केला जातो. जांगम द्रव्यांमध्ये निर्दिष्ट केलेले पशु-पक्ष्यांचे जे अवयव आहेत, ते पशु-पक्षी जैनदृष्टीने 'समनस्क पंचेंद्रिय त्रसजीव' आहेत. चरकसंहितेतील 'पार्थिव' औषधे म्हणजे सुवर्ण, रजत, लोह, चुना, गेरु, क्षार इ. आहेत. जैनदृष्टीने पृथ्वीच्या अंतर्भागात असलेली ही खनिजद्रव्ये 'पृथ्वीकायिक एकेंद्रिय स्थावर' जीव आहेत. चरकसंहितेच्या दृष्टीने 'औद्भिद' द्रव्ये म्हणजे विविध प्रकारच्या वनस्पती होत. औद्भिद द्रव्यांची १८ ग्राह्य अंगे सांगितली आहेत. यांमध्ये प्राय: सर्वच ताज्या वनस्पतींची अंगे आहेत.२७ जैनदृष्टीने सजीव अवस्थेतील सर्व प्रकारच्या वनस्पती म्हणजे 'एकेंद्रिय स्थावर वनस्पतीकायिक' जीवांचे स्कंध होत.
चरकसंहितेतील सूत्रस्थानाच्या दुसऱ्या अध्यायात शिरोविरेचन (नस्य), वमन, विरेचन, आस्थापनबस्ती आणि अनुवासनबस्ती अशी पंचकर्मे सांगितली आहेत. या ग्रंथात विविध ठिकाणी या पंचकर्मांचे उल्लेख विखुरलेले आहेत. या पाचपैकी वमन, विरेचन व मुख्यत: बस्तीसाठी पशु-पक्ष्यांच्या मांसाचा, मांसरसाचा किंवा विविध प्रकारच्या कातड्यांचा वापर केलेला दिसतो.२९
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
पंचकर्माखेरीज इतरत्रही रक्त, मांस, मांसरस, वसा इ. संबंधीची चर्चा दिसते. उदाहरणार्थ :
१) लावा,
,तित्तिर, मोर, हंस, डुक्कर, कोंबडा, बोका, मेंढी, मासे यांचे रस स्नेहात मिसळले असता हितकरहोते. ३० २) ससा, हरीण, लावा, तित्तिर, मोर वगैरे जांगल पशु-पक्ष्यांचे रक्त मधातून चाटावे. ३१
३) रक्तातिस्रावाने प्राणनाशाची स्थिती आली असता ससा, हरीण, कोंबडा, मांजर, म्हैस, मेंढी किंवा बकरा यांच्या ताज्या रक्ताचा बस्ति दिला असता उपयोग होतो. ३२
मांसगुणाची चर्चा :
मांसाचे सेव्यत्व व निषिद्धत्व, त्याची श्रेष्ठता - कनिष्ठता इ. प्रकारचे विवेचन हेही चरकसंहितेत आढळते. सूत्रस्थानातील ‘अन्नपानविधि' अध्यायात मांसाचे अनेक दोष सांगून, त्या दोषांनी रहित असलेले मांस हितकर, पौष्टिक व शक्तिवर्धक आहे असे म्हटले आहे. मांसाचे सेव्यत्व वर्णन करताना म्हटले आहे की 'नित्यं मांसरसाहारा नातुराः स्युर्न दुर्बलाः ।। ३३
याचप्रकारे मांसाचे श्रेष्ठत्व सूत्रस्थानातील 'यज्ज : पुरुषीय' अध्यायात वर्णिले आहे.
३४
चरकसंहितेच्या काळी 'अन्नपानविधि' व 'रोगोपचार' यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मांसाहारी चिकित्सेला प्राधान्य होते, असे चरकसंहितेच्या एकंदर प्रतिपादनावरून दिसून येते.
-
पशु-पक्ष्यांचा औषधासाठी वापर केल्यामुळे अहिंसा शब्दाचा बदलता अर्थ :
अन्नासाठी व औषधयोजनेसाठी मांस इ. चा वापर करताना धर्माचरणाचे सर्वोच्च तत्त्व मानलेल्या अहिंसा तत्त्वाकडे चरकसंहिता कोणत्या दृष्टीने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
सूत्रस्थानातील ३० व्या अध्यायात म्हटले आहे की, आयुर्वर्धक साधनात 'अहिंसा म्हणजे प्राणवध न करणे', हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. यापासून धर्म उत्पन्न होऊन त्याच्या पुण्याने आयुष्य वाढते.३५ या उल्लेखात अहिंसा व त्याने प्राप्त होणारे पुण्यफळ याचा विचार केला आहे. परंतु 'प्राणिहिंसा मुळीच न करणे', हा अहिंसेचा अर्थ तर चरकसंहिताकाराला स्वीकारताच येणार नाही. हिंसा-अहिंसेची चर्चा चरकसंहितेत अतिशय अल्प आहे. सूत्रस्थानातील 'सद्वृत्त' वर्णनाचा उपसंहार करताना ज्ञान, दान, मैत्री, दया इ. गुणांचा निर्देश केला आहे. या सद्गुणांमध्ये हिंसेचा समावेश नाही. मैत्रीगुणाचा विचार करताना पूर्वपक्षाने शंका उपस्थित केली आहे की, 'आयुर्वेदाच्या उपदेष्ट्याने प्राण्यांचे हिंसापूर्वक भक्षण सांगितल्याने हिंसेचा दोष लागतो. ' उत्तर पक्षात म्हटले आहे की, 'सर्वत्रात्मानम् गोायित' या वेदवचनानुसार स्वत:चे म्हणजे स्वत:च्या शरीराचे, आरोग्याचे व आयुष्याचे रक्षण करण्यासाठी जी आयुर्वेदविहित हिंसा आहे, ती आरोग्यसाधनेसाठी असल्यामुळे आणि आरोग्यसाधना अंतिमतः धर्मसाधनेसाठी असल्यामुळे, आयुर्वेदकथित हिंसा ही हिंसा नव्हे. शिवाय हे मांसभक्षण मांसलोलुपतेने केलेले नसल्यामुळे हिंसेचा दोष लागत नाही.३६
एकंदरीत वैदिक परंपरेतून व विशेषतः सांख्यविचारातून पशु-पक्ष्यांसंबंधीची जी मान्यता प्रतिबिंबित होते, त्या पार्श्वभूमीशी चरकसंहितेतील विचार मिळतेजुळते ठरतात.
महाभारत, सांख्यसप्ततिशास्त्र आणि याज्ञवल्क्यस्मृति या सर्वांमध्ये तिर्यंचगतीची तमोप्रधानता, मूढता, अज्ञान व दुःखबहुलता वारंवार प्रदर्शित केलेली दिसते. ३७ हा दृष्टिकोन एकदा स्वीकारला की, आरोग्यरक्षणार्थ केलेल्या पशु-पक्ष्यांच्या वापराला जणू काही अनुकूल पार्श्वभूमीच मिळते. एक गोष्ट येथे विशेष नमूद केली पाहिजे की चरकसंहितेत निर्दिष्ट सर्व पशु-पक्षी जैनशास्त्रानुसार 'समनस्क तिर्यंच पंचेंद्रिय' आहेत.
मानवश्रेष्ठतावाद आणि मानवी जीवनाची दुर्लभता, वैदिक व जैन दोन्ही परंपरांनी अधोरेखित केलेली दिसते. परंतु दुर्लभ नरदेह लाभल्यावर, त्याचे रक्षण करण्यासाठी, पशु-पक्षीसृष्टीला दुय्यम मानून, त्यांच्या केलेल्या व चरकसंहिताकारांना काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. याउलट समनस्क तिर्यंच पंचेंद्रियांचे ज्ञान, बुद्धी, भावभावना,
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
मन, आध्यात्मिक प्रगतीची योग्यता - हे सर्व लक्षात घेऊन पशु-पक्ष्यांच्या हिंसेचा पूर्ण निषेधात्मक दृष्टिकोन आचारांगासारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथात स्पष्टत: दिसून येतो.
(३) जैन साधुआचारातून दिसून येणारा रोगचिकित्साविषयक दृष्टिकोण, त्याची कारणे व त्यात दिसून येणारी कालानुसारी स्थित्यंतरे :
रोगचिकित्साविषयक दृष्टिकोनाचे तीन स्तर आपल्याला जैनग्रंथांमध्ये दृष्टोत्पत्तीस येतात. पहिल्या स्तरात आचारांग, उत्तराध्ययन आणि दशवैकालिक या ग्रंथातील रोगचिकित्सेविषयक विचार येतात. दुसऱ्या स्तरात व्याख्याप्रज्ञप्ति आणि ज्ञातृधर्मकथा यांचा विचार करावा लागतो.
तिसऱ्या स्तरात साधुआचारातील रोगचिकित्सेचा बदलता दृष्टिकोन मुख्यत: व्यवहारभाष्य, बृहत्कल्पभाष्य आणि निशीथभाष्यचूर्णीत दिसून येतो.
प्रथम स्तर : आचारांगाचे प्रथम अध्ययन शस्त्रपरिज्ञा' उघडल्याबरोबर प्रथमतः ‘एकेंद्रिय पृथ्वीकायिक जीवांचे वर्णन दिसते. त्यात म्हटले आहे की, पृथ्वीकायिकजीव अव्यक्त चेतनायुक्त असले तरी, शस्त्राने छेदन-भेदन केल्यावर, इंद्रियविकल मनुष्यांप्रमाणेच त्या जीवांनाही कष्टाची अनुभूती होते. याच प्रकारची विधाने भ. महावीरांनी पाचही एकेंद्रियांविषयी केली आहेत.३८ त्रसकायिकजीवांच्या वेदनांचा विचार करताना, पंचेंद्रिय पशु-पक्ष्यांच्या शरीराच्या अवयवांचा निर्देश विशेष लक्षणीय दिसतो. ते म्हणतात - काही व्यक्ती चर्म, मांस, रक्त, हृदय, पित्त, वसा, पंख, पुच्छ, केश, शृंग, दंत, नख, स्नायु, अस्थि, अस्थिमज्जा - इत्यादींसाठी प्राण्यांचा वध करतात.३९ या यादीतील वस्तूंचे चरकसंहितेतील जांगम द्रव्याशी असलेले साम्य विशेष लक्ष वेधून घेणारे आहे.
___ आचारांगातीलच लोकविजय' अध्ययनात म्हटले आहे की, 'चिकित्साकुशल वैद्य चिकित्सेसाठी अनेक जीवांचे हनन, छेदन, भेदन, लेपन, विलेपन आणि प्राणवध करतात.' देहासक्ती सोडलेल्या मुनीला या चिकित्सेचा काय लाभ ? अनगार अशा प्रकारची चिकित्सा करीत नाही.४० ____ याच ग्रंथाच्या नवव्या अध्ययनात, ‘णो से सातिज्जति तेइच्छं' असे म्हणून संशोधन (विरेचन), वमन, स्नान, गात्रअभ्यंगन, दंतप्रक्षालन व मर्दन यांचा सर्वथा निषेध केला आहे.४१ दशवैकालिकसूत्रातील साधूंच्या अनाचार विषयक तिसऱ्या अध्ययनात वमन, विरेचन, बस्ती इ. पंचकर्मांचा तसेच चिकित्सेचा पूर्णत: निषेध केलेला दिसतो.२ साधूंच्या खानपानविधीत निषिद्ध मानलेल्या वनस्पतींचा, रोगचिकित्सेसाठी सुद्धा वापर करू नये - असे दशवैकालिक्ने एकंदर मत दिसते.
उत्तराध्ययनातील १५, १९ आणि २० या तीनही अध्यायांमध्ये चतुष्पाद चिकित्सेचा आणि पंचकर्म तसेच वैद्यांद्वारे मंत्र, मूल इ. च्या सहाय्याने केलेल्या चिकित्सेचा निषेध व्यक्त झालेला दिसतो. मृग इ. पशु जसे निर्सेपचाराने बरे होतात, तशाप्रकारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून साधूने विचरण करावे, असे मत 'मृगापुत्रीय' अध्ययनात व्यक्त केलेले दिसते. याच सूत्रातील दुसऱ्या अध्ययनात परिषहांचे वर्णन करीत असताना, म्हटले आहे की, 'कर्मांच्या उदयाने रोग उत्पन्न होतात असे जाणून वेदनेने पीडित झाल्यावर दीन बनू नये.'व्याधीने विचलित न होता, बुद्धी स्थिर ठेवावी व प्राप्त झालेली पीडा समभावाने सहन करावी. आत्मगवेषक मुनीने चिकित्सेचे अभिनंदन करू नये व करवूही नये, हेच मुनीचे श्रामण्य आहे.४३ वरील ग्रंथात आलेला चतुष्पाद चिकित्सा हा शब्द चरकसंहितेत वैद्य, औषधीद्रव्य, परिचारक व रोगी ही चार स्थाने सांगून, सूत्रस्थानात वर्णित केलेला आहे.४४
'विपाकसूत्र' हा ग्रंथ अर्धमागधी ग्रंथरचनेच्या शेवटच्या टप्प्यातला मानला जातो. विपाकसूत्रातील वैद्यकीय चिकित्सेचे उल्लेख वाचल्यानंतर, हे स्पष्टच होते की चरकसंहितेतील चिकित्सा आता समाजात अतिशय रूढ व प्रचलित झाली आहे. त्यातील वैद्यांचा, चिकित्सकांचा आणि विशेषतः धन्वंतरीवैद्याचा उल्लेख विशेष लक्षणीय आहे. विपाकसूत्रातील ७ वे अध्ययन या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जांगम, पार्थिव व औद्भिद अशा तीनही
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकारच्या द्रव्यांचे तेथे वर्णन येते. त्यात अष्टांगआयुर्वेदाची नावेही नमूद केली आहेत. चरकसंहितेत सेव्यमसासाठी उपयुक्त अशा बहुतांशी सर्व पशु-पक्ष्यांचा उल्लेखही येतो. अर्थात् हिंसेचे दुःखरूपविपाक सांगणाऱ्या या विपाकसूत्रात, सर्व प्रकारची चिकित्सा आणि पंचकर्मे इ. विधींचा पूर्णत: निषेध केलेला दिसतो.४६
द्वितीय स्तर : वैद्यकीय चिकित्सेविषयीचा दृष्टिकोण स्पष्ट करणाऱ्या अर्धमागधी ग्रंथातील द्वितीय स्तर 'व्याख्याप्रज्ञप्ति'च्या १५ व्या प्रकरणात व ज्ञाताधर्मकथे'च्या ५ व्या अध्ययनात व्यक्त झालेला दिसतो.
'व्याख्याप्रज्ञप्ति'मध्ये भ. महावीरांनी रेवती' श्राविकेच्या मदतीने त्यांच्या पित्तज्वराची आणि रक्ताच्या उलट्यांची चिकित्सा केलेली दिसते.४७
ज्ञाताधर्मकथेतील ५ व्या अध्ययनात 'शैलक' मुनींची चिकित्सा करणाऱ्या चिकित्सकांना, मंडूक राजा असा आदेश देतो की, 'आपण शैलक मुनींची चिकित्सा प्रासुक, एषणीय अशा औषध, भेषज्य व भक्तपानाने करावी'.४८
प्रासुक व एषणीय औषधांनी साधूंची चिकित्सा करावी हा दृष्टिकोण तृतीय स्तराचा सूचक मानावा लागेल.
तृतीय स्तर :सहाव्या-सातव्या शतकात जैनपरंपरेत रुढ झालेल्या कल्प-निशीथ-व्यवहार या छेदसूत्रांच्या भाष्यांमध्ये, 'वैद्य व वैद्यांनी केलेली साधूंची चिकित्सा'-यांचे विपुल उल्लेख आढळून येतात. रोगचिकित्सेच्या दुसऱ्या स्तरप्तील प्रासुक, एषणीय औषधांचा निकष कायम ठेवलेला दिसतो. परंतु चिकित्सेच्या संपूर्ण निषेधाच्या दृष्टिकोनातमूलगामी बदल झालेला दिसतो. व्यवहारभाष्यात म्हटले आहे की -
अम्मापितीहि जणियस्स, तस्स आतंकपउरदोसेहिं ।
वेज्जा देंति समाधिं, जहिं कता आगमा होति ।।४९ व्यवहारभाष्येच्या नियुक्तीत त्रिविध चिकित्सेचा उल्लेख दिसतो.५०
व्यवहारभाष्य व त्यावरील मलयगिरिची टीका यांमध्ये चिकित्सा, औषधी आणि आरोग्यविषयीचे उल्लेख प्रचुर प्रमाणात आढळून येतात. साधुपरंपरेत या तृतीय स्तरात झालेले चिकित्सेचे प्रचलन, त्यात दिलेल्या विषयांच्या यादीवरूनही जाणवल्याशिवाय रहात नाही. त्यातील काही उल्लेख पुढे दिले आहेत :
__ प्रतिकूल भोजनाचा परिणाम, अंगमर्दन आणि विश्रांती, वमन-विरेचन आदि चिकित्सेचे प्रयोजन, रात्रीचे जागरण आणि अजीर्ण, कंटकविद्ध पायाची चिकित्सा, वाक्पाटवासाठी ब्राह्मी वनस्पतीचा वापर, शरीराचे जाड्य आणि लघुता, मेधा-धारणा आणि ऊर्जा यांची वृद्धी, वात-पित्त-कफ-शोथ यांनी होणारे विकार व त्यावरील उपाय, वर्षाकालातील तपाचे लाभ, मलमूत्राने होणारी हानी, गरिष्ठ भोजनाने होणारी कामोत्तेजना, मिताहाराचे लाभ, व्रणचिकित्सा आणि व्रण शिवण्याचे उल्लेख, मुख-दंत-प्रक्षालनाने होणारे लाभ, संक्रामक रोगांबाबतची सावधानता, विषबाधेची चिकित्सा, मधुमेहाची पथ्ये, संतुलित आहार.५१ इ.इ.
प्राय: अशाच प्रकारचे उल्लेख बृहत्कल्प व निशीथभाष्य-चूर्णीतही आढळून येतात.
आदर्शवत् साधुआचारात जरी सर्व प्रकारच्या चिकित्सेचा निषेध असला तरी, समाजात अतिशय प्रचलित असलेल्या व ज्याचे विधायक दृश्यपरिणाम स्पष्टत: दिसून येत आहेत, अशा चिकित्सा व आरोग्यशास्त्रापासून जैन परंपरा सुद्धा दूर राहू शकली नाही, हे व्यवहारभाष्य इ. ग्रंथांवरून स्पष्ट होते. शरीर हे धर्माचे साधन असल्यामुळे ते सुस्थितीत ठेवण्यासाठी वैद्यकीय चिकित्सेचा आधार तर घेतला, परंतु प्रत्यक्ष प्राणहिंसेचा आधार न घेता. ती चिकित्सा प्रासुक व एषणीय औषधांनीच करावी, असा कटाक्ष कायम ठेवला.
___ वरील विवेचनात चिकित्सेला अनुलक्षून केलेले तीन स्तर श्वेतांबर ग्रंथांच्या आधारे केलेले आहेत. दिगंबर परंपरेत चिकित्सेचा विशेष बलपूर्वक निषेध नाही. साधुआचारातील उद्गम-उत्पादन-एषणा या दोषांच्या अंतर्गत चिकित्सा-निषेधाचे तुरळक उल्लेख आढळतात.५२ फारसा विचार दिसत नाही. किंबहुना ‘भगवती आराधना' सारख्या प्राचीन ग्रंथातही (३-४ शतक) संलेखनाधारी व्यक्तीने केलेल्या वमन, विरेचन, बस्ती इ. चा उल्लेख आढळतो.५३
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
उपसंहार :
प्रचलित आयुर्वेदशास्त्रात चरक, सुश्रुत व वाग्भट या वैद्यत्रयीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शास्त्रशाखेत चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व अष्टांगहृदय हे तीनही ग्रंथ विस्ताराने अभ्यासले जातात. चरकसंहितेतील जांगमद्रव्यती केलेली चिकित्सा विस्ताराने पाहिली. परंतु आत्ता प्रचलित असलेल्या आयुर्वेद चिकित्सेत औद्भिद द्रव्ये विशेषत्वान व पार्थिव द्रव्ये त्याखालोखाल वापरली जातात असे दिसते. आयुर्वेदाचार्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून असे समजले की, औषधयोजना आणि पंचकर्मे इ. मध्ये मांस, मांसरस, पशु-पक्ष्यांचे अवयव इ. चा वापर करणे जवळजवळ पूर्णतः थांबले आहे. आयुर्वेद - चिकित्सा पद्धतीत हे स्थित्यंतर येण्याचे कोणते कारण आहे, याचा विचार केला असता आपल्याला असे दिसेल की, हा अनेक भारतीय विचारधारांचा एकत्रित परिणाम आहे.
जैन आणि बौद्ध विचारधारांमध्ये अहिंसा, करुणा आणि दयेला दिलेले अनन्यसाधारण स्थान आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा या मागच्या कारणांचा एक घटक दिसतो.
ज्या वैद्यांनी आयुर्वेदिक चिकित्सेची परंपरा पुढे चालविली, त्यांनाच हळूहळू दया, करुणा, मैत्री व विशेषतः आत्मौपम्य या सदाचरणाच्या नीतिनियमांवर विचार करीत असताना, पशु-पक्ष्यांच्या घातावर आधारित चिकित्सापद्धती, गर्हणीय वाटू लागली असावी. परिणामी जैन सोडून प्राय: इतर भारतीय समाजाच्या, सामान्य अन्नपानविधीत मांसाहाराचा समावेश होत राहिला तरी, औषधयोजनेतून मात्र पशु-पक्ष्याधार चिकित्सेला रजा मिळाली.
जैन परंपरेने मात्र काळाच्या ओघात प्रासुक- एषणीय चिकित्सेचा स्वीकार केला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्यांच्या तिर्यंचविषयक धारणेच्या तत्त्वज्ञानातून लाभलेली होती.
निष्कर्ष :
वेदनीय व आयुष्यकर्माच्या प्रबलतेपेक्षा, पुरुषार्थाला प्राधान्य देऊन जैनपरंपरेने प्रासुक - एषणीय चिकित्सापद्धतीपर्यंत स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतले. तसेच आयुर्वेद विशारदांनीही आरंभी जांगम चिकित्सेला प्राधान्य दिले तरी वर नमूद केलेल्या अनेक कारणांमुळे, स्वत:त योग्य ते बदल घडवून, धर्माचे ‘अहिंसा' हे मूलतत्त्व अबाधित राखले. म्हणजेच चरकसंहितेतील मानवकेंद्री विचारांपासून त्यांनी 'सर्वप्राणिहिते रतः' हा दृष्टिकोन स्वीकारला आणि जैन परंपरेने ‘सर्वप्राणिहिते रतः' या तत्त्वाच्या भक्कम पार्श्वभूमीवर, चिकित्सेच्या पूर्ण निषेधाची आग्रही भूमिका सोडून, आरोग्यरक्षणाला प्राधान्य दिले. पुरुषार्थाची कास धरली. एकंदर भारतीय संस्कृतीचे वस्त्र अशाच विविध वैचारिक परंपरांच्या आदान-प्रदानातून विणत राहिले आहे आणि विणत राहील.
१) तत्त्वार्थसूत्र ८.११
२) तत्त्वार्थसूत्र ४.२७
३) तत्त्वार्थसूत्र २.२४
४) तत्त्वार्थसूत्र २. २५ व त्यावरील टीका
५) तत्त्वार्थसूत्र २.३४
६) आचारांग १. ११८
७) तत्त्वार्थसूत्र २.३२
८) प्रज्ञापनासूत्र १.५४ ते ८१
९) स्थानांगसूत्र ४.५५०
संदर्भ
१०) स्थानांगसूत्र ४.५५१
११) तत्त्वार्थसूत्र १.२३
१२) ज्ञातृधर्मकथा अध्ययन १३.३५ ते ४२
१३) भगवती आराधना १६४४ ; उत्तराध्ययन १४.४६, ४७ ; ३२.३७, ५०, ६३, ७६, ८९; ४.६ ; १४.४४
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
१४) उपदेशपद १५) तत्र भिषजा पृष्टेनैवं चतुर्णामृक्सामयजुरथर्ववेदानामात्मनोऽथर्ववेदे भक्तिरादेश्या । वेदो ह्याथर्वणः स्वस्त्ययनबलिमङ्गलहोमनियम
प्रायश्चित्तोपवासमन्त्रादिपरिग्रहाच्चिकित्साम्प्राह - चिकित्सा चायुषो हितायोपदिश्यते । चरकसंहिता (भा१), सूत्रस्थान, अध्याय ३०.१८, पृ.२२८ १६) सर्वदा सर्वभावनां सामान्यं वृद्धिकारणम् ।
हासहेतुर्विशेषश्च प्रवृत्तिरुभयस्य तु ।। खादीन्यात्मा मन: कालो दिशश्च द्रव्यसंग्रहः । सेन्द्रियं चेतनं द्रव्यं निरिन्द्रियमचेतनम् ।। सार्था गुर्वादयो बुद्धिः प्रयत्नान्ता: परादयः । गुणाः प्रोक्ताः प्रयत्नादि कर्म चेष्टितमुच्यते ।। समवायोऽपृथभावो भूम्यादीनां गुणैर्मतः । स नित्यो यत्रहि द्रव्यं न तत्रानियतो गुणः । --- चरकसंहिता (भाग १) सूत्रस्थान, अध्याय १.४४ ते ५४ सांख्यैः संख्यातसंख्येयैः सहासीनं पुनर्वसुम् ।
जगद्धितार्थं पप्रच्छ वह्निवेश: स्वसंशयम् ।। चरकसंहिता (भाग १) सूत्रस्थान, अध्याय १३.१ ; शारीरस्थान अध्याय १.१५ ते ३४ १७) चरकसंहिता (भाग २), चिकित्सास्थान, अध्याय ३, पृ. ८५ वरील भाष्य १८) यतीन्द्रमतदीपिका ४.४६.७ १९) कीटपक्षिपतङ्गानां तिरश्चामपि केशव ।
महादेवप्रपन्नानां न भयं विद्यते क्वचित् ।। महाभारत १३.१८५.१५ (पॅरा) २०) सांख्यकारिका (माठरवृत्ति) ३९ (पृ.४२) २१) सांख्यकारिका (सुवर्णसप्तति) ४४ (पृ.६२,६३) २२) मनुस्मृति (कुल्लूक टीका) ५.४० २३) भूतानां चतुर्विधा योनिर्भवति जराखण्डस्वेदोद्भिदः । चरकसंहिता, शारीरस्थान, अध्याय ३.२५ २४) प्रसह्य भक्षयन्तीति प्रसहास्तेन संज्ञिताः ।
भूशया बिलवासित्वादानूपानूपसंश्रयात् ।। जलेनिवासाज्जलजा: जले चर्याञ्जलेचराः । स्थलजा जाङ्गला प्रोक्ता मृगा जाङ्गलचारिणः ।। विकीर्य विष्किराश्चेति प्रतुद्य प्रतुदाः स्मृताः ।
योनिरष्टविधा त्वेषां मांसानां परिकीर्तिताः ।। चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २७.५२,५३,५४ २५) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ६, पृ. १०८, ११४ २६) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १३, पृ. २९ २७) चरकसंहिता (चक्रपाणिदत्तकृत), सूत्रस्थान, अध्याय १, पृ. ३२ २८) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २, पृ. ३९ २९) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १५, पृ. ६५%; अध्याय १६, पृ.७४ ; सिद्धिस्थान, अध्याय ३, पृ.३७, पृ.४२; पृ.४३; अध्याय १२, पृ.१७२
ते १७५ ३०) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १३.८१ ३१) चरकसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय ४, पृ. १५९ ३२) चरकसंहिता, सिद्धिस्थान, अध्याय १०.३७ ३३) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २७, पृ.१८३,१८४ ३४) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २५, पृ. ३९,४० ३५) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ३०, पृ. २२५ ३६) चरकसंहिता (चक्रपाणिदत्तकृत), सूत्रस्थान, अध्याय ८, पृ. १३०,१३१ ३७) अपरार्क टीका - याज्ञवल्क्यस्मृति ३.१३८ (१०००,१८); सांख्यसप्ततिशास्त्र, पृ.२४ ; महाभारत ३.२४५.१८ ३८) आचारांग १.१.२८,५१,८२,११०,१६१ ३९) आचारांग १.१.१४० ४०) आचारांग १.२.१४१ ते १४७ ; २.१३.१७३ ४१) आचारांग १.९.१,२ ४२) दशवैकालिक अध्याय ३ ४३) उत्तराध्ययन १५.८; १९.७९ ते ८३ ; २०.२२,२३, २.३२,३३ ४४) चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ९.१ ४५) विपाकसूत्र ७.१५,१६ ; स्थानांग ८.२६ ४६) विपाकसूत्र १.५३ ते ५७
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________ 47) व्याख्याप्रज्ञप्ति 15.114 ते 128 48) ज्ञातृधर्मकथा 5.106 ते 116 49) व्यवहारभाष्य 949 50) व्यवहारभाष्य 178, नियुक्ति 37 51) व्यवहारभाष्य व टीका परिशिष्ट 14 52) भावपाहुड 99 (टीका); भगवती आराधना 232 (टीका) 53) भगवती आराधना 来来来来来来来来来来 संदर्भ-ग्रंथ-सूची 1) अष्टपाहुड : आ. कुंदकुंद, शांतिवीर दिगंबर जैन संस्थान, श्री महावीरजी (राजस्थान) वि.सं. 2494 2) आचारांग (आयारो) : आ. तुलसी, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), वि.सं. 2031 3) उत्तराध्ययन (उत्तरज्झयण) : सं. मुनिपुण्यविजय, महावीर जैन विद्यालय, मुंबई, 1977 4) उपदेशपद : हरिभद्रसूरिविरचित, सं. प्रतापविजयगणि, बडोदा, 1923 5) चरकसंहिता : चक्रपाणिदत्तकृत 'आयुर्वेददीपिका सहित, सं. पांडेय, चौखम्बा संस्कृत सीरीज ऑफिस, वाराणसी, 1969 6) चरकसंहिता (खंड 1,2) : सं. शंकर पदे, गजेंद्र विठ्ठल रघुवंशी, पुणे 7) ज्ञातृधर्मकथा (नायाधम्मकहा) : अंगसुत्ताणि 3, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), वि.सं. 2031 8) तत्त्वार्थसूत्र : उमास्वातिप्रणीत, पार्श्वनाथ विद्याश्रम, वाराणसी 9) दशवैकालिक (दसवेयालिय) : सं. मुनिपुण्यविजय, महावीर जैन विद्यालय, मुंबई, 1977 10) प्रज्ञापना (पण्णवणा) : उवंगसुत्ताणि 4 (खंड 2), जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), 1989 11) भगवती आराधना : आ.शिवार्य, सं.पं.कैलाशचंद्र शास्त्री, हिरालाल दोशी, फलटण, 1990 12) महाभारत : BORI, पुणे, 1942 13) याज्ञवल्क्यस्मृति (भाग 2) : अपरार्क टीका, हरी नारायण आपटे, आनंद आश्रम मुद्रणालय, पुणे, 1904 14) सांख्यकारिका सप्तति (सुवर्णसप्ततिशास्त्र) : ईश्वरकृष्ण, तिरूपति देवस्थान, 1944 15) स्थानांग (ठाण) : आ.तुलसी, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), वि.सं. 2033 16) विपाकसूत्र (विवाग) : अंगसुत्ताणि 3, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), वि.सं. 2031 17) व्यवहारभाष्य : वाचना प्रमुख तुलसी, जैन विश्वभारती, लाडनूं (राजस्थान), 1996 18) व्याख्याप्रज्ञप्ति (वियाहपण्णत्ति) : भाग 2, सं.पं.बेचरदास दोशी, श्री महावीर जैन विद्यालय, मुंबई, 1978