________________
आहारक. याशिवाय भाषा, शरीर, संज्ञा, उपयोग, समुद्घात इ. अनेक मुद्यांनीही तिर्यंचपंचेंद्रियांचा विचार केला आहे. तिर्यंचपंचेंद्रियांच्या विषयी जैनांची विशेष आत्मीयता व सजगता वरील वर्णनाने सिद्ध होते. ____ जैनांची पशु-पक्षीसृष्टी ही मानवसृष्टीच्या सर्वात जवळची सृष्टी आहे. त्यांच्यामध्ये तरतमभावाने मति, श्रुत ही दोन ज्ञाने तसेच काही अंशाने अवधि व मन:पर्यायज्ञानही असते. त्यातील काही पशु-पक्ष्यांना जातिस्मरणज्ञान देखील होऊ शकते.१२
पशु-पक्ष्यांमधील क्रोध, कपट, आहारसक्ती इ. विकारांबरोबरच त्यांच्यामधील प्रेम, वात्सल्य, संघभावना, अपरिग्रह, निरासक्ती, संयमित प्रवृत्ती इ. सद्गुणात्मक भावनाही जैनग्रंथांमध्ये चर्चिलेल्या दिसतात.१३ ।।
औत्पतिकी, वैनयिकी, कर्मजा आणि परिणामिकी या चार प्रकारच्या बुद्धी जैनग्रंथात निर्दिष्ट केल्या जातात? 'पशु-पक्ष्यांमध्ये या चतुर्विध बुद्धी आहेत', असे साक्षात निर्देश जरी जैनग्रंथात नसले तरी कासव, स्थलांतरित पक्षी, विशिष्ट प्रजातीचे मासे, मार्जार कुलातील प्राणी, हत्ती इ. संबंधीची जी निरीक्षणे आधुनिक निरीक्षकांनी चित्रित केली आहेत, त्यावरून पशु-पक्ष्यांमध्ये असलेल्या चतुर्विधबुद्धीचा शोध घेता येतो.
तिर्यंचसृष्टीच्या अंतर्गत असलेल्या पशु-पक्ष्यांच्या ध्वनिसंकेताधार असलेल्या भाषावर्गणेचा केलेला सैद्धांतिक विचार, ही जैन तत्त्वज्ञानाची विशेष उपलब्धी मानावी लागेल.
जैनांनी पशु-पक्ष्यांचे सर्व व्यवहार केवळ संज्ञा अर्थात् अंत:प्रवृत्तींवर आधारलेले न मानता, त्यांच्यातील ज्ञान, भावना व विचारशक्तीचा केलेला विचार, हा आधुनिक निसर्ग निरीक्षकांच्या निष्कर्षाच्या खूपच जवळ पोहोचतो.
निसर्गाने प्रत्येक पशु-पक्ष्याला आखून दिलेल्या मर्यादांचे तो सामान्यतः पालन करीत असल्याने, जैनग्रंथांत पशु-पक्ष्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची शक्यता सुद्धा वर्तविलेली दिसते.
(२) चरकसंहितेतील तिर्यंच विचार, विशेषत: पशु-पक्षी सृष्टी :
भारतीय आयुर्वेदशास्त्रातील कायचिकित्सा व शल्यचिकित्सेचे प्रतिनिधित्व करणारे 'चरकसंहिता' आणि 'सुश्रुतसंहिता' हे ग्रंथ प्राय: समकालीन मानले जातात. त्यापैकी प्रस्तुत शोधनिबंधात संदर्भित असलेल्या चरकसंहिा या ग्रंथाची कालमर्यादा सामान्यत: इ.स.पूर्व ५०० ते इ.स.२०० अशी नक्की केलेली दिसते.
'अथातो दीर्घजीवितीयमध्यायं व्याख्यास्यामः ।।' या सूत्राने चरकसंहितेचा आरंभ होतो. यातून स्पष्ट होते की चरकसंहिता हा दार्शनिक ग्रंथ नसून, अथर्ववेदाचा उपवेद मानला गेलेला हा ग्रंथ,१५ आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कायचिकित्सेवर आधारित आहे. चरकसंहितेतील अनेक सूत्रे व भाष्य यावरून स्पष्ट होते की, या ग्रंथाला वैशेषिक व सांख्य ह्या दोन दर्शनांची पृष्ठभूमी आहे.६ तत्त्वज्ञानाच्या चौकटीनुसार पशुपक्षीसृष्टीचा विचार करताना चरकसंहितेतील सूत्रात 'तिर्यंच' या शब्दाचा साक्षात उपयोग केलेला दिसत नाही. भाष्यामध्ये देखील तो केवळ एकदाच आलेला दिसतो.१७ तिर्यंच ही संज्ञा आणि त्याचा थोडा अधिक विस्तार सांख्यदर्शनात दिसतो. त्यामळे प्रथम ती पार्श्वभमी समजावन घेऊ.
प्राय: सर्व प्राचीन वैदिक ग्रंथात देव, मनुष्य व तिर्यंच या तीन योनींचा उल्लेख आहे. नरकयोनीची स्वतंत्र गणना क्वचितच दिसून येते.१८
महाभारतांतर्गत सांख्यविचारात कीट, पक्षी, पतंग यांच्याखेरीज तिर्यंच्यांचा वेगळा निर्देश दिसतो.१९ याचा अर्थ असा की याठिकाणी तिर्यंच म्हणजे पशुसृष्टी होय. सांख्यकारिका ‘माठरवृत्तीत' पशु, पक्षी, मृग, सरिसृप आणि स्थावर या पाचांचा समावेश तिर्यंचयोनीत केला आहे.२० येथे स्थावर म्हणजे संपूर्ण वनस्पतीसृष्टी होय. सांख्यकारिका ‘सुवर्णसप्तती'त अधोगमनाची पाच स्थाने दिली आहेत - चतुष्पाद, पतंग, उरग, तिर्यक् आणि स्थावर.२१ मनुस्मृतीच्या कुल्लूक'प्रणीत टीकेत तिर्यंच आणि स्थावरांचा उल्लेख वेगवेगळा आहे.२२
प्राचीन वैदिक ग्रंथांतील वर्णनावरून तिर्यंचगतीची नेमकी व्याप्ती ध्यानात येत नाही. त्यांनी तिर्यंचगतीत