Book Title: Pashu Pakshi Srushti Don Vibhinna Drushtikon Author(s): Anita Bothra Publisher: Anita Bothra View full book textPage 1
________________ पशु-पक्षी-सृष्टी : दोन विभिन्न दृष्टिकोण (जैन तत्त्वज्ञान आणि चरकसंहितेच्या संदर्भात) (महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, अधिवेशन २७, मालाड (मुंबई), ११ ते १३ नोव्हेंबर २०१०) विषय व मार्गदर्शन : डॉ. नलिनी जोशी, जैन अध्यासन, पुणे विद्यापीठ शोधछात्रा : डॉ. अनीता बोथरा, सन्मति-तीर्थ, पुणे ४ प्रस्तावना : श्रमणपरंपरा व वैदिकपरंपरा यांच्यातील साम्यभेद पहात असताना, अनेक अभ्यासकांनी त्यावर अनेक अंगांनी प्रकाश टाकला आहे. अंतिम सत्याचा शोध, ईश्वराचे स्थान, कर्मसिद्धांत, यज्ञसंस्थेला विरोध, चातुर्वर्ण्याचे स्थान - अशा अनेक मुद्यांनी या दोन परंपरांमधील तफावत स्पष्ट केली जाते. परंतु याखेरीज अनेक दुय्यम मुद्दे देखील असे आहेत की जे जैन परंपरेची पृथगात्मकता विशद करतात. त्यापैकी एक मुद्दा आहे, ‘जैन तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून स्पष्ट होणारी पशु-पक्ष्यांविषयीची अवधारणा'. 'चरकसंहिता' हा आयुर्वेदशास्त्राचा आद्यग्रंथ वाचत असताना, त्यात पशुपक्ष्यांविषयी व्यक्त झालेले जे विचार आहेत, ते वैदिक अथवा हिंदुपरंपरेचा जीवनाकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोण अधोरेखित करतात. या दोन दृष्टिकोनातील मूलभूत भेद अंकित करण्याचा प्रयत्न, या शोधनिबंधात केला आहे. (१) जैनदृष्टीने तिर्यंचगति, तिची व्याप्ती आणि त्यात पशु-पक्ष्यांचे नेमके स्थान : जैन तत्त्वज्ञानानुसार संसारी जीव आपापल्या कर्मानुसार नरक-तिर्यंच-मनुष्य आणि देव या चार गतींमध्ये संसरण करतात. या चार गतींची अवधारणा त्यासंबंधीच्या जैनग्रंथात समानरूपतेने दिसून येते. जैनशास्त्रानुसार तिर्यंचगति' ही देव-मनुष्य आणि नारकी जीवांपेक्षा सर्वथा भिन्न आहे. तिर्यंचगतीतील सर्व जीव एकेंद्रिय ते पंचेंद्रिय असतात. पृथ्वीकाय, अप्काय, तेजस्काय, वायुकाय आणि वनस्पतीकाय हे 'एकेंद्रिय तिर्यंच' आहेत. शंख, लट, जळू इ. 'द्वींद्रिय तिर्यंच' आहेत. मुंगी, ढेकूण, कोळी इ. 'त्रींद्रिय तिर्यंच' आहेत. मशी, डास, भुंगा इ. 'चतुरिंद्रिय तिर्यंच' आहेत. घोडा, गाय, हरीण, सिंह, बेडूक, मासा, मोर, पोपट, कुत्रा, मांजर इ. 'पंचेंद्रिय तिर्यंच' आहेत. तिर्यंच पंचेंद्रियांचे दोन भेद आहेत - संज्ञी व असंज्ञी. मनसहित तिर्यंच्यांना 'संज्ञी तिर्यंच' म्हणतात. मनरहित तिर्यंच्यांना असंज्ञी तिर्यंच' म्हणतात. 'मन कोणाला असते ?', याबाबत जैनांची धारणा सुनिश्चित आहे. गर्भज जीवांना मन असते. गर्भज जीवांचे तीन प्रकार आहेत - जरायुज, अंडज व पोतज.५ शिवाय उत्पत्तिस्थानानुसार त्यांचे रसज, स्वेदज इ. प्रकारही निर्दिष्ट केलेले दिसतात. जन्म घेण्याच्या प्रकारानुसार तिर्यंच्यांचा जन्म हा 'गर्भजन्म' तसेच 'सम्मूर्च्छनजन्म' असतो. तिर्यंच्यांच्या हालचालीच्या क्षेत्रानुसार त्यांचे जलचर, स्थलचर, खेचर, उरपरिसर्प आणि भुजपरिसर्प हे प्रकार ‘पन्नवणा' या ग्रंथात नोंदविलेले दिसतात. 'स्थानांगा'त पंचेंद्रियांचे विभाजन एकखुर, द्विखुर, गंडीपद आणि सनखपद अशाप्रकारे केलेले दिसते.' स्थानांगातच चर्मपक्षी, रोमपक्षी, समुद्वपक्षी आणि विततपक्षी - असे पक्ष्यांचे चार प्रकारही दिसतात.१० सामान्यत: असे म्हणता येईल की सर्व अरण्यवासी व पाळीव पशुपक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासे हे 'पंचेंद्रिय तिर्यंच' आहेत. या सर्व तिर्यंचपंचेंद्रियांची सूक्ष्म विचारणा १४ मार्गणास्थानांच्या माध्यमातून, षट्खंडागम, धवलाटीका, गोम्मटसार (जीवकांड), पन्नवणा, जीवाभिगम इ. ग्रंथांमध्ये केलेली दिसते. ती १४ मार्गणास्थाने याप्रमाणे - गति, इंद्रिय, काय, योग, वेद, कषाय, ज्ञान, संयम, दर्शन, लेश्या, सम्यक्त्व, भव्यत्व, संज्ञी आणिPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9